एलन मस्क यांना X विकून मिळाले २८२३४३७१०००० रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 11:26 IST2025-04-05T11:23:17+5:302025-04-05T11:26:55+5:30
Elon Musk : मस्क यांनी आधी ट्विटर विकत घेतलं, मग त्याच्या निळ्या चिमणीचे पंख कापले, नंतर ट्विटरचं नाव बदलून एक्स ठेवलं आणि आता त्यांनी एक्स हे सोशल मीडिया व्यासपीठ थेट विकूनच टाकलं आहे. होय, ही सोन्याची कोंबडी त्यांनी विकून टाकली आहे!

एलन मस्क यांना X विकून मिळाले २८२३४३७१०००० रुपये!
जगातील सर्वाधिक श्रीमंत एलन मस्क आपल्या विचित्र निर्णयांसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. आपल्या निर्णयांनी जगात सनसनी पसरवणं हा त्यांच्या सवयीचा भाग आहे. मस्क यांनी आधी ट्विटर विकत घेतलं, मग त्याच्या निळ्या चिमणीचे पंख कापले, नंतर ट्विटरचं नाव बदलून एक्स ठेवलं आणि आता त्यांनी एक्स हे सोशल मीडिया व्यासपीठ थेट विकूनच टाकलं आहे. होय, ही सोन्याची कोंबडी त्यांनी विकून टाकली आहे!
ज्या एक्सचा जगात एवढा बोलबाला आहे, ती सोशल नेटवर्किंग सेवा त्यांनी का विकली? कोणाला विकली? - अर्थातच त्यांनी ही सेवा आपल्याच ‘एआय’ कंपनी xAI ला विकली आहे. किती किमतीत त्यांनी एक्स विकावी? - तब्बल ३३ अब्ज डॉलर्स! भारतीय चलनात रूपांतर केल्यास ही किंमत सुमारे २८,२३,४३,७१,००,०० रुपये होते! म्हणजेच सुमारे २.८२ लाख कोटी रुपये! ही रक्कम मोजताना आपल्याला नक्कीच घाम येईल!
असं असलं तरी हा एक ‘घाट्याचा सौदा’ ठरला आहे. इलॉन मस्क यांनी २०२२ मध्ये ट्विटर खरेदी केलं तेव्हा त्यासाठी तब्बल ४४ अब्ज डॉलर्स मोजले होते, पण आता विकताना मात्र ती केवळ ३३ अब्ज डॉलर्सनाच विकली आहे. अर्थातच त्यांचे त्यामागे काही हेतू आहेत. आपल्याच कंपनीशी त्यांनी हा सौदा केला आहे. म्हणजे घरातल्या घरातच हा व्यवहार झाला आहे.
ही एक ‘ऑल-स्टॉक डील’ आहे. याचा अर्थ या व्यवहारात कोणत्याही रोख रकमेचा व्यवहार झालेला नाही. पैशाऐवजी शेअर्सच्या देवघेवीत हा व्यवहार झाला आहे. यासंदर्भात मस्क यांनी एक्सच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, xAI आणि X चं भविष्य एकमेकांशी जोडलेलं आहे. आज आपण अधिकृतपणे डेटा, मॉडेल, कंप्युटिंग, वितरण आणि प्रतिभा एकत्र आणण्याच्या दिशेनं पाऊल टाकत आहोत. xAI ची उत्कृष्ट एआय क्षमता आणि एक्सचा व्यापक संपर्क या दोन्ही गोष्टी एकत्र करून संभाव्यतेच्या अपार शक्यता उघडल्या जातील. यामुळे जगासाठी अनेक नवी क्षितिजं खुली होतील. xAI च्या प्रगत तंत्रज्ञानाला एक्सच्या ६० कोटींहून अधिक सक्रिय युजर्ससोबत जोडण्यासाठी मस्क यांनी हा जुगाड केला आहे. त्यांच्या मते एक्सच्या डेटाचा वापर करून xAI आपली एआय मॉडेल्स, उदाहरणार्थ Grok चॅटबॉटला अधिक सक्षम करू शकेल. यामुळे मानवी प्रगतीला गती मिळेल आणि ‘सत्याचा शोध आणि ज्ञानाची प्रगती’ या संकल्पनेला बळकटी दिली जाईल.
२७ ऑक्टोबर २०२२ रोजी ट्विटर विकत घेतल्यानंतर मस्क यांनी सर्वप्रथम कंपनीच्या चार टॉप अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यात सीईओ पराग अग्रवाल, फायनान्स चीफ नेड सेगल, लीगल एक्झिक्युटिव्ह विजया गड्डे आणि सीन ॲडजेट यांचा समावेश होता. जेव्हा मस्क यांनी एक्सचा ताबा घेतला त्यावेळी कंपनीत सुमारे ७५०० कर्मचारी होते; परंतु आता फक्त २५००कर्मचारी आहेत.
त्यावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पसह अनेक ब्लॉक अकाउंट्स त्यांनी अनब्लॉक केले होते. एक्सवर ट्रम्प यांच्या परतीसंबंधी एक पोलही त्यांनी घेतला होता. सुमारे दीड कोटींहून अधिक युजर्सनी त्यात भाग घेतला होता आणि ट्रम्प यांचं अकाऊंट सुरू करावं, असं मत त्यांनी मांडलं होतं.