भाऊ-दादांची खिचडी!

By किरण अग्रवाल | Published: January 24, 2019 08:29 AM2019-01-24T08:29:53+5:302019-01-24T09:03:43+5:30

भिन्न पक्षीयांचे राजकारणेतर मैत्रीचे संबंध असू नयेत, असे कुणीही म्हणणार नाही. किंबहुना अनेकांनी तसे ते जपल्याची उदाहरणेही आहेत.

editorial view on ncp ajit pawar and bjp girish mahajan nashik meeting | भाऊ-दादांची खिचडी!

भाऊ-दादांची खिचडी!

googlenewsNext

किरण अग्रवाल

भिन्न पक्षीयांचे राजकारणेतर मैत्रीचे संबंध असू नयेत, असे कुणीही म्हणणार नाही. किंबहुना अनेकांनी तसे ते जपल्याची उदाहरणेही आहेत. परंतु अशा संबंधांची कसलीही पार्श्वभूमी नसताना आणि राजकीयदृष्ट्यादेखील आरोपांचे अगर वाद-विवादांचे मळभ दाटलेले असताना सहज म्हणून कुणाच्या भेटी घडून आल्या तर सामान्यांच्या भुवया उंचावणे स्वाभाविकच ठरते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारभाजपा नेते गिरीश महाजन यांची नाशिक मुक्कामी झालेली भेट त्यामुळेच चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय बनून गेली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे येथील महानगरपालिकांसह विविध स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपाला लाभलेल्या यशाचे श्रेय राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे नेतृत्व व त्यांच्या व्यूहरचनेला दिले जाते. खान्देशातील बडे प्रस्थ म्हणाविणाऱ्या एकनाथ खडसे यांचे पक्षांतर्गत खच्चीकरण केले गेल्यानंतर महाजन यांचे भाजपातील वजन अधिक वाढले. स्थानिक यशाखेरीज राज्यातील ठिकठिकाणच्या बिकट परिस्थितीत ते पक्षासाठी ‘संकटमोचका’ची भूमिकाही पार पाडीत असतात. या साऱ्या पार्श्वभूमीवर खान्देशातील यशानंतर बारामतीतही नगरपालिका जिंकून दाखवू, असे विधान त्यांनी केल्याने निर्धार परिवर्तन यात्रा करणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खान्देशातीलच चाळीसगाव येथील सभेत बोलताना महाजन यांना बारामतीत येऊन दाखविण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील एका कार्यक्रमानिमित्त आले असता, पक्षाने सांगितल्यास बारामतीतही चमत्कार करून दाखविण्याचा पुनउच्चार महाजन यांनी केला. एकीकडे उभय नेत्यांमध्ये अशी आव्हान-प्रतिआव्हानाची खडाखडी सुरू असताना याच दरम्यान, या दोघांची नाशिक मुक्कामी भेट घडून आल्याने त्याबद्दल चर्चा झडणे क्रमप्राप्त ठरले आहे.

खरे तर अजित पवार व गिरीश महाजन हे दोघेही नेते एकाचवेळी नाशकातील शासकीय विश्रामगृहावर थांबलेले असल्याने त्यांची भेट होणे यात अचंबित होण्यासारखे काही ठरले नसते, कारण विधिमंडळ अधिवेशनादरम्यानही असे भिन्नपक्षीय नेते समारोसमोर येतात व हास्यविनोद करून ते आपापल्या मार्गाला लागलेले पाहावयास मिळतात. पण येथे पहाटे पहाटे महाजन हे अजित पवार यांच्या कक्षात गेलेले व तेथील कार्यकर्त्यांपासून काहीसे बाजूला होत उभय नेत्यांनी गुफ्तगू केलेले उपस्थितांना पाहावयास मिळाले. अनायासे झालेल्या भेटीत औपचारिक चर्चा करून वेळ निभावलेली पाहावयास मिळणे वेगळे व सोबत असलेल्या भाजपाच्या स्थानिक महापौर, आमदार आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष आदींकडे पाठ करून दोन मिनिटे खासगीत बोलणे वेगळे; उभयतांत अवघ्या काही मिनिटात ही कसली खिचडी शिजली असावी, असा प्रश्न म्हणूनच उपस्थित होऊन तो औत्सुक्याचाही ठरून गेला आहे.

विशेषत: बारामतीत जाऊन जिंकून दाखविण्याचे व त्यासाठी त्यांना येऊनच दाखवा, असे आव्हान-प्रतिआव्हान एकीकडे दिले जात असताना, दुसरीकडे भाऊ व दादांमध्ये ही खासगी गुफ्तगू घडून आली, त्यामुळे त्याबाबतचे औत्सुक्य आहे. नाशकात महापालिका भाजपाच्या ताब्यात असून, शहरातील तीनही आमदारदेखील भाजपाचे आहेत. विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस इतर पक्षांच्या तुलनेत प्रबळ आहे. शिवाय, भुजबळच त्या पक्षातील कर्ते-करविते आहेत. त्यामुळे भाजपा व राष्ट्रवादी यांच्यात होऊ घातलेली भविष्यकालीन निवडणुकीच्या रणांगणातील स्पर्धा पाहता कुणी, कुणाला, कसला सल्ला याभेटीत दिला असेल की सबुरीने घ्यायचे सांगितले असेल; हे ते दोन्ही नेतेच जाणोत, मात्र बाहेर जाहीर सभांमध्ये परस्पर विरोधाचे डंके पिटणारे नेतेच खासगीत असे सलगीने वागून अराजकीय मैत्रीधर्म निभावताना दिसतात म्हटल्यावर, आपण तरी का आपसात डोकेफोड करावी, असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडला तर तो गैर कसा ठरावा?  

Web Title: editorial view on ncp ajit pawar and bjp girish mahajan nashik meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.