शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 08:14 IST

आजार व मृत्यूसाठी कारणीभूत पाणीपुरवठा, स्वच्छता वगैरेचा आढावा घेण्याऐवजी गावकरी एकत्र बसतात. तिला जातपंचायतीचे स्वरूप येते आणि तिथे भलताच विचार होतो.

आदिवासींच्या छोट्याशा खेड्यात एकापाठोपाठ एक असे मृत्यू झाले की, प्रत्येक मृत्यूचे कारण शोधून ते दूर करण्याऐवजी, आजार व मृत्यूसाठी कारणीभूत पाणीपुरवठा, स्वच्छता वगैरेचा आढावा घेण्याऐवजी गावकरी एकत्र बसतात. तिला जातपंचायतीचे स्वरूप येते आणि तिथे भलताच विचार होतो. मंदिरात पूजाअर्चा करणारी गावातील एक महिला व दुसरा पुरुष या दोघांचा जादूटोणा व देवदेवस्कीमुळेच माणसे मरतात, अशा आंधळ्या श्रद्धेचा निष्कर्ष निघतो. दोघांना बेदम मारहाण करून पेट्रोल टाकून जिवंत जाळले जाते. अंगावर शहारे आणणारी ही घटना महाराष्ट्रदिनी गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे घडली. जननी देवाजी तेलामी व देवू कटिया आतलामी या दोघांना जीव गमवावा लागला. खून तसेच अनिष्ट-अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये पोलिसांनी पंधरा जणांना अटक केली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे अंगात सैतान संचारलेल्या त्या झुंडीत महिलेचा पती व मुलगाही आहे. या घटनेच्या आदल्या दिवशी त्याच तालुक्यातील जांभिया गावात जादूटोण्याच्याच संशयावरून एका वृद्धाला समाजमंदिरात बांधून मारहाण करण्यात आली. गरम सळईचे चटके देण्यात आले.

महाराष्ट्रदिनीच तिकडे नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यात जलोला येथील आशा सेविका ही डाकीण असून, मुलांना खाते, जनावरे खाते असा संशय घेत तिला व पतीला मारहाण झाली. बाजूच्याच गावात वृद्धाला मारहाण झाली. राज्यातील आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये हे जे घडतेय ते सारे भयंकर, चिंताजनक आहेच. शिवाय या सगळ्या घटना पाहून आपण कोणत्या विकासाच्या, एकविसाव्या शतकाच्या गप्पा मारतो, असा प्रश्न पडावा. त्यासोबतच अंधश्रद्धेच्या जोखडातून समाजाची मुक्तता करण्याचे, त्या दलदलीतून त्यांना बाहेर काढण्याचे आव्हान किती मोठे आहे, याचीही कल्पना यावी. बारसेवाड्याच्या घटनेला आणखी एक कंगोरा म्हणजे एरव्ही जातबांधव व भगिनींच्या वैयक्तिक अधिकारांमध्ये नाक खुपसणाऱ्या अंधश्रद्ध जातपंचायती आता जादूटोण्याच्या संशयावरूनही निरपराधांचे जीव घ्यायला लागल्या आहेत. त्याचे कारण हे की, रानावनात राहणाऱ्या, दारिद्र्यात खितपत पडलेल्या या निरक्षर माणसांपर्यंत नव्या जगाचे वारे पोहोचलेले नाही. अवतीभोवती, राज्यात-देशात, जगाच्या कानाकोपऱ्यात झालेला शिक्षणाचा प्रसार त्यांच्या झोपड्यांमध्ये झिरपलेला नाही. शिक्षणामुळे आणि त्यातही विज्ञानामुळे तयार होणारा बुद्धिप्रामाण्यवाद, विवेक, आजार व मृत्यूमागील कार्यकारणभाव यापासून ते दूर आहेत.

अरण्य प्रदेशात, निसर्गाच्या सानिध्यात आपण कोणत्या तरी सहाय्यकारी शक्तीमुळे जिवंत आहोत आणि अशाच कुठल्या तरी विनाशकारी शक्तीमुळे आपल्यावर संकटे येतात, माणसे आजारी पडतात किंवा त्यांचा मृत्यू होतो, अशा अनेक अंधश्रद्धांचा पगडा त्यांच्या मनावर आहे. हा पगडा वैयक्तिक असतो तेव्हा कुटुंबातल्या, समाजातल्या विवेकवादी मंडळींकडून सुधारणा घडवली जाऊ शकते. लोकशिक्षणाची कवाडे खुली असतात. परंतु, अंधश्रद्धेला जेव्हा समूहाच्या मानसिकतेचे स्वरूप येते तेव्हा झपाटलेल्या झुंडी तयार होतात. या झुंडीचा अधिक राग खेड्यातल्या, पाड्यावरच्या शिकलेल्या मंडळींवर, विशेषत: सुशिक्षित महिलांवर  असतो. कारण, आधुनिक जगाचे दर्शन तसेच अनुभवातून शिकलेल्यांचा विवेक जागा झालेला असतो. ते इतरांनाही सुधारण्याचा प्रयत्न करतात. झुंडीला मात्र ते अजिबात नकोसे असते. त्यातून होणाऱ्या अघोरी कृत्यावेळी त्यात सहभागी झालेल्या कोण्या एकाच्या मनात चुकीचे भान आले तरी तो उघडपणे बोलू शकत नाही. तसे करण्याचा प्रयत्न केला तर तोदेखील झुंडीच्या रागाचा बळी ठरण्याची शक्यता असते.

गडचिरोली किंवा नंदुरबारमधील घटनांकडे असे इतक्या खोलात जाऊन पाहण्याची गरज आहे. सातपुड्याच्या पश्चिम टोकावरच्या, नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव किंवा अक्कलकुवा तालुक्यात भयंकर डाकीण प्रथा आहे. ती हाणून पाडण्यासाठी सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच प्रशासनाने काही वर्षांपूर्वी पुढाकार घेतला होता. त्यामुळे डाकीण समजून महिलांचे बळी घेण्याच्या, त्यांच्या छळाच्या घटना कमी झाल्या आणि समाजप्रबोधनाचे प्रयत्नही शिथिल झाले. आताच्या घटनांमुळे प्रबोधनाची गती-शक्ती दोन्ही वाढविण्याची गरज आहे. मागास, निरक्षर, दारिद्र्याच्या दुष्टचक्रातून घडणाऱ्या या घटना म्हणजे समाजाचा अंधारलेला कोपरा आहे. त्याबद्दल नुसतेच हळहळून, संताप व्यक्त करून किंवा ‘छे, किती बुरसटलेले लोक’ म्हणून नाक मुरडण्याने भागणार नाही. तो अंधार दूर करण्यासाठी प्रत्येकाने लोकप्रबोधनाचा, लोकशिक्षणाचा दिवा पेटविण्याची गरज आहे.