या ‘गुरुजीं’ची गय नको! विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना कोठडीत पाठवलं पाहिजे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 08:09 IST2025-11-27T08:09:22+5:302025-11-27T08:09:52+5:30
राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रयोगशील शिक्षणाचे धडे देणारे शिक्षक उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवीत आहेत. त्याचवेळी बोटावर मोजण्याइतक्या शिक्षकांनी, आरोपींनी महिनोनमहिने अभ्यास करून कष्टाने यशाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे काम केले आहे

या ‘गुरुजीं’ची गय नको! विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना कोठडीत पाठवलं पाहिजे
शिक्षणव्यवस्थेचा कणा मजबूत करणारे शिक्षक हे ज्ञान, मूल्य आणि नैतिकतेचे वाहक मानले जातात. त्यांची निवड करणारी प्रक्रिया तितकीच पारदर्शक असायला हवी. प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत समोर आलेली गडबड चिंताजनक आहे. कोल्हापूरमधील ‘महाटीईटी’ पेपरफूटप्रकरणी अटकेतील आरोपींनी ज्या पद्धतीने खुलासे केले आहेत, ते पाहता सबळ पुरावे पोलिसांनी समोर आणले पाहिजेत. ‘टीईटी’बरोबरच ‘सेट’ची प्रश्नपत्रिका फोडल्याची कबुली तर भयंकरच आहे.
नुकत्याच झालेल्या ‘टीईटी’मध्ये फेस स्कॅनिंग, बायोमेट्रिक हजेरी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ‘सीसीटीव्ही’सारख्या उपाययोजनांसह ‘फोटो व्ह्यू’ आणि ‘कनेक्ट व्ह्यू’ या दोन्ही प्रणालींचा वापर करण्यात आला. ज्यामुळे गैरप्रकार टाळण्यास मदत झाली. परीक्षा सुरळीत पार पडली, असा परीक्षा परिषदेचा दावा आहे. मग पेपरफुटीची गडबड शोधताना समोर आलेले गैरप्रकार यापूर्वीचे की आताचे, हे तपास यंत्रणेने स्पष्ट केले पाहिजे. ‘टीईटी’ आणि ‘सेट’ परीक्षांची काठीण्यपातळी लक्षात घेता निकाल कमीच लागतो. त्यात या ना त्या मार्गाने यशस्वी होण्यासाठी काहीजण प्रयत्न करतात. भूलथापांना बळी पडतात. प्रश्नपत्रिका बाहेर आणल्याचा दावा करून काहीजण आपले उखळ पांढरे करून घेतात. उत्तीर्ण होण्याच्या आमिषाने धडपडणारे सावज टिपण्याचे काम टोळ्या करतात. त्यात सर्वांत खोल जखम होते ती मेहनतीने अभ्यास करणाऱ्यांना. पात्रता सिद्ध करण्यासाठी दिवसरात्र झटणारे लाखो उमेदवार अशा भ्रष्ट व्यवस्थेचे बळी ठरतात. त्यामुळे पुन्हा एकदा दलालांचे जाळे, मोबदल्यात लाखोंची उधळण ही सगळी परिस्थिती संताप आणणारी आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रयोगशील शिक्षणाचे धडे देणारे शिक्षक उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवीत आहेत. त्याचवेळी बोटावर मोजण्याइतक्या शिक्षकांनी, आरोपींनी महिनोनमहिने अभ्यास करून कष्टाने यशाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे काम केले आहे. कोणत्याही परीक्षा व्यवस्थेत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात येण्यासाठी लागणारा उशीर, तणाव, गोंधळ आणि त्याचवेळी पेपरफुटीचा संशय परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडविणारा ठरतो. अशावेळी ‘टीईटी’सह ‘सेट’ परीक्षेचा समोर आलेला तपास धक्कादायक आहे. ‘सेट’, ‘टीईटी’ परीक्षांच्या पारदर्शकतेबाबत विद्यार्थ्यांना विश्वास वाटतो. मात्र, २५ ते ३० जणांना पेपर दिले, ५० ते ६० जणांकडून पैसे घेतले, असे आरोपी सांगतात, तेव्हा हे प्रकरण एक-दोन जिल्ह्यांपुरते मर्यादित राहत नाही. प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी शासनाने स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फत अर्थात ‘एसआयटी’ नेमून चौकशी करायला हवी. हा केवळ पाच-पन्नास लाभार्थ्यांचा अथवा दहा-पंधरा आरोपींचा प्रश्न नसून, परीक्षा दिलेल्या व भविष्यात देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा आहे. त्यांच्या मनात परीक्षेची पारदर्शकता टिकून राहिली पाहिजे, यासाठी परीक्षा परिषदेनेही पुढे आले पाहिजे. त्यांनी तपास यंत्रणेला पत्र दिले आहे,
सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या परीक्षेत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, पेपर फुटला नाही, असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे; परंतु गडबड आताची असो की यापूर्वीची; ती मुळासकट उखडून टाकली पाहिजे. शासनाचा निर्णय आणि न्यायालयाच्या निकालानंतर आता सेवेत असणाऱ्या शिक्षकांनाही ‘टीईटी’ द्यावी लागणार आहे. त्याबद्दलची मतमतांतरे आहेत. जिल्हा निवड मंडळाकडून परीक्षा देऊनच शिक्षक सेवेत आहेत. त्यामुळे शिक्षक संघटनांनी ‘महाटीईटी’च्या अनिवार्यतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काठीण्यपातळी, परीक्षेची दोन-तीन वेळा संधी यांसह अनेक मुद्दे चर्चेला येत आहेत. यावर शासन, परीक्षा परिषद यथोचित निर्णय घेईल. त्यात आता पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर असणार आहे.
याशिवाय राज्य प्राध्यापक पात्रता परीक्षा हा स्वतंत्र विषय आहे. त्यातही काहीजणांना प्रश्नपत्रिका दिल्याचा कबुलीजबाब आरोपी देत असतील आणि अशी परीक्षा देऊन कोणी सेवेत लागले असतील तर त्यांची गय करण्याचे कारण नाही. यापूर्वीच्या पेपरफुटीच्या काही प्रकरणांमध्ये पेपर फुटलाच नव्हता, असा शेवट झालेला आहे. मात्र, आरोपी प्रश्नपत्रिका दिल्याचा दावा करतो, पुढे पैशाची देवाणघेवाण झाल्याचे पुरावेही सापडतात; परंतु फोडलेली प्रश्नपत्रिका घेऊन उत्तीर्ण झालेला काही सापडत नाही. काही प्रकरणांत उत्तीर्ण होण्यासाठी पैसे मोजणाऱ्यांचीच फसवणूक झालेली असते. अखेर काहीही असो, सत्य उजेडात आणून विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना कोठडीत पाठविले पाहिजे.