महाविकास आघाडी सरकारमध्ये भूक वाढली किंवा वसुलीतील वाटेकरी दुखावल्याने 'हे' घडले असावं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 04:16 AM2021-03-22T04:16:57+5:302021-03-22T04:18:10+5:30

घाशीराम कोतवाल, अनैतिक, बेबंद कारभार व त्याला असलेल्या नाना फडणवीस यांच्या आशीर्वादाचे उत्तम चित्रण आहे. या सर्व घटना घडून २४४ वर्षे झाली तरी परिस्थितीत तसूभरही बदल झालेला नाही.

Editorial on Param bir Singh letter allegation on Home Minister Anil Deshmukh in Sachin Vaze Case | महाविकास आघाडी सरकारमध्ये भूक वाढली किंवा वसुलीतील वाटेकरी दुखावल्याने 'हे' घडले असावं

महाविकास आघाडी सरकारमध्ये भूक वाढली किंवा वसुलीतील वाटेकरी दुखावल्याने 'हे' घडले असावं

googlenewsNext

 काही प्रवृत्ती कालातीत असतात. भर राजसभेत द्रौपदीची वस्त्रे फेडणाऱ्या दु:शासनाची प्रवृत्ती जशी आपल्याला वरचेवर अनुभवास येते तशीच घाशीराम कोतवाल हीदेखील प्रवृत्ती आहे. पेशवाईतील नाना फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांनी पुण्यात घाशीरामाला पोलीसप्रमुख नेमला होता. मोरोबा कान्होबा या लेखक व इतिहास संशोधकांच्या ग्रंथात घाशीरामाच्या अनैतिक, बेबंद कारभार व त्याला असलेल्या नाना फडणवीस यांच्या आशीर्वादाचे उत्तम चित्रण आहे. या सर्व घटना घडून २४४ वर्षे झाली तरी परिस्थितीत तसूभरही बदल झालेला नाही.

Sachin Vaze drove Mansukh Hiren in SUV to Crime Branch a day after bomb was recovered near Antilia

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘लोकमत’च्या महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर कार्यक्रमात मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांची केलेली बदली ही नैमित्तिक नसून त्यांच्याकडून झालेल्या काही अक्षम्य चुकांमुळे केल्याचे जाहीर केल्यानंतर परमबीर यांच्यातील आक्रमक ‘पोलीसवाला’ जागृत झाला. देशमुख यांनी पोलीस दलातील तुलनेने फारच कनिष्ठ अधिकारी असलेल्या सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते, असा सनसनाटी आरोप करणारे पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री कार्यालयास लिहिले व हेतूत: माध्यमांना दिले. यामुळे देशमुख अडचणीत येणे स्वाभाविक आहे. राज्यातील विरोधी पक्ष भाजपकडे प्रभावी संख्याबळ असून, समाजमाध्यमांवरील बोलक्या मध्यमवर्गाचा त्यांना पाठिंबा आहे. संजय राठोड किंवा सचिन वाझे प्रकरणात जेव्हा सत्ताधारी या दोघांची पाठराखण करू पाहत होते तेव्हा भाजपने याच बळाचा वापर करून सरकार आरोपींना पाठीशी घालत असल्याचे वातावरण निर्माण करून दोघांनाही पायउतार होण्यास भाग पाडले. त्यामुळे भाजप हा मुद्दा तापवत ठेवण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे.  

NIA takes over probe into Mansukh Hiren's death, ATS denied custody of Sachin Vaze | Top Developments - India News

शरद पवार यांनी मोठ्या खुबीने देशमुख यांच्या चौकशीचा व भवितव्याचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवला आहे. अगदी अलीकडे पूजा चव्हाण या तरुणीची आत्महत्या झाली. संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याकरिता भाजपने आंदोलन केले. मात्र आज तेच भाजपचे नेते पूजा चव्हाण हिच्या मृत्यूबाबत गप्प आहेत. त्यामुळे पूजाला न्याय मिळणे दुर्लक्षित राहिले व केवळ राठोड घरी बसले. देशात काही वर्षांत दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशा पुरोगामी विचारवंतांच्या हत्या झाल्या. त्यामध्ये किरकोळ लोकांना अटक केली गेली. मात्र सूत्रधार मोकाट राहिले. ठाण्यातील मनसुख हिरेन यांच्या संशायस्पद मृत्यूबाबत तेच घडण्याची दाट शक्यता आहे.

ANI on Twitter:

भाजपने गेल्या सहा वर्षांत देशात काही नरेटिव्हज सेट केली आहेत. म्हणजे विशिष्ट पक्ष हे भ्रष्ट पक्ष आहेत, अमुक नेता ‘पप्पू’, तर तमुक नेता ‘पार्टी अनिमल’ आहे वगैरे. त्यामुळे भाजपविरोधी सरकारची किंवा व्यक्तींची कुठलीही कृती ही त्या नरेटिव्हला पोषक ठरली की, ते भाजपच्या पथ्यावर पडते. मुंबईतील डान्सबार, बार, हॉटेल यांच्याकडून अनेक नियमांचे उल्लंघन झालेले असल्याने पोलीस, महापालिका यांना नैमित्तिक हप्ते दिले जातात हे वैश्विक सत्य आहे. मागील सरकारच्या कार्यकाळात ही हप्तेबाजी पूर्णपणे बंद होती, असे छातीठोकपणे सांगण्याची हिंमत भाजप नेतेही करणार नाहीत. किंबहुना पोलिसांच्या नियुक्त्या, बदल्यांपासून भ्रष्टाचार सुरू होतो. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये भूक वाढली किंवा वसुलीतील वाटेकरी दुखावल्याने हे घडले असावे. परमबीर सिंग यांनी आयुक्तपदावर असताना हे पत्र लिहिले असते तर ते अधिक सचोटीचे ठरले असते. कारवाई झाल्यानंतर पत्र लिहिणे ही पश्चातबुद्धी आहे. यापूर्वी सुबोध जयस्वाल यांनीही पोलिसांच्या बदल्यांबाबत एक स्फोटक अहवाल दिला होता. मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आपल्या अहवालावर कार्यवाही न झाल्याने जयस्वाल केंद्र सरकारच्या सेवेत गेल्याचा दावा फडणवीस यांनी केला. गेल्या सहा वर्षांत समाजात आमचे-तुमचे हा दुभंग निर्माण झाला आहे तसा तो आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांमध्येही निर्माण झाला आहे. काही अधिकारी हे भाजपच्या खूप जवळ असल्याची उघड चर्चा होते, हे दुर्दैवी आहे. नोकरशहांना राजकीय मते असली तरी ती त्यांच्या वर्तनातून प्रकट व्हायला नको. मात्र गुप्तेश्वर पांड्ये असो की, सत्यपाल सिंह ही त्याची ढळढळीत उदाहरणे आहेत. जगभर प्रतिष्ठा असलेल्या मुंबई पोलीस दलाची मान या घटनांमुळे शरमेने खाली गेली आहे. मुळात हे सर्व प्रकरण ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेली मोटार ठेवण्यातून व मनसुख हिरेन यांच्या हत्येतून उद‌्भवले आहे. या दोन्ही घटनांचा सखोल तपास व्हायला हवा. आणि सर्व संबंधित गुन्हेगारांच्या मुसक्या तात्काळ आवळल्या जायला हव्यात.

Web Title: Editorial on Param bir Singh letter allegation on Home Minister Anil Deshmukh in Sachin Vaze Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.