घर फिरले की घराचे वासेही फिरतात, अशी एक म्हण आहे. अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पक्षात तशीच काहीशी परिस्थिती दिसते. राष्ट्रवादी एकत्र असताना शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा असले, तरी पक्ष अजित पवारच चालवत होते. त्यांच्यापुढे काही बोलण्याची किंवा करण्याची कुणा नेत्याची हिंमत नव्हती. मात्र, अजितदादांच्या निधनानंतर दोन महिन्यांनीच पक्षातील परिस्थिती बदललेली दिसते. अजितदादांच्या पश्चात पक्षाची सर्व निर्णय प्रक्रिया त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ यांच्या हाती असेल अशी चर्चा होती. सध्याची एकूण रीत पाहता ते स्वाभाविकही होत, मात्र राष्ट्रवादीत काही वेगळे घडू लागल्याचे दिसते. सुरुवात झाली सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथेपासून. पक्ष शरद पवारांच्या ताब्यात जाईल या भीतीने अजितदादांच्या मृत्यूनंतर तिसऱ्याच दिवशीच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी पुढाकार घेतला. शपधविधी संध्याकाळी पार पडण्यापूर्वी त्याचदिवशी दुपारी विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यासाठी आमदारांची बैठक बोलवण्यातही तटकरे आणि पटेल अग्रभागी होते. हे दोघे पक्ष 'हायजॅक' करताहेत की काय, अशी भीती आमदारांना वाटू लागली. तटकरे-पटेल हे सुनेत्रा पवारांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले असतानाच आमदारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करावी असे पत्रच तयार केले.
तटकरे-पटेल यांच्याविरोधातील अविश्वासाची बीजे इथूनच रुजली. त्याला खतपाणी घातले ते विलीनीकरणाच्या मुद्द्याने. पक्षातील अनेक मंत्री, आमदार राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बाजूने बोलत असताना, 'असे काही ठरले नव्हते' हा सूर तटकरे-पटेलांनी लावून धरला. त्याचवेळी भाजपने उडी घेतली. 'आमच्याशी चर्चा केल्याशिवाय विलीनीकरण करता येणार नाही', असे स्पष्ट विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 'हा आमच्या पक्षांतर्गत विषय आहे' असे ना प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले, ना राष्ट्रीय कार्याध्यक्ष पटेल ! महासत्तेपुढे त्यांना ही हिंमत दाखवता आली नाही. त्यातूनच आता हा पक्ष भाजप चालवत असल्याची चर्चा सुरू झाली. तटकरे-पटेल यांच्याविरोधातला हा अविश्वास सुनेत्रा पवार यांनाही असावा. 'अजित पवारांच्या निधनापासून ते या पत्रापर्यंत पक्षातर्फे निवडणूक आयोगाशी कुणीही केलेला पत्रव्यवहार अवैध ठरवावा' असे त्यांनी थेट निवडणूक आयोगाला कळवले. अजितदादांच्या निधनानंतर तटकरे आणि पटेल यांनी फेब्रुवारी महिन्यात आयोगाला पत्र लिहून पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांना निर्णय घेण्याचे सर्वाधिकार देण्यात आल्याचे कळवले होते. त्यापूर्वी सुनेत्रा पवार अथवा पार्थ पवार यांच्याशी चर्चा केली नव्हती, असा आरोप शरद पवार पक्षाचे नेते आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी केला.
ज्याअर्थी सुनेत्रा पवारांनी पटेल-तटकरे यांचे पत्र ग्राह्य धरू नये असे आयोगाला लिहिले आहे, त्याअर्थी रोहित यांच्या या दाव्यात तथ्य असल्याचे गृहीत धरायला वाव आहे. पक्षात हे अविश्वासाचे वातावरण असतानाच भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांचे नाव पुढे आल्याने पक्षाची नाचक्की होऊ लागली. पक्षाने कारवाईबाबत उशीर केला. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. म्हणजे इथे पक्षाचे नेतृत्व निर्णय घ्यायला कमजोर ठरले. त्यानंतर चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टीच्या निर्णयासाठी चार दिवस जावे लागले. त्यावरून सुनेत्रा पवारांना निर्णय घेण्यापासून कोणी तरी रोखत असल्याची चर्चा पक्षातच सुरू झाली. संशय तटकरे-पटेल यांच्यावरच होता. तटकरे यांच्याबद्दल अशी नाराजी वाढत असताना त्यांच्याच रायगड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात लागलेल्या बॅनरवर पवार कुटुंबातील एकाचाही फोटो नव्हता. ही बाब तटकरेंबद्दल अविश्वास वाढवणारीच ठरणार आहे. सातारा जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला राडा आणि मंत्री नरहरी झिरवाळांचा नुकताच बाहेर आलेला कथित वादग्रस्त व्हिडीओ या दोन प्रकरणांनी 'राष्ट्रवादीत नेमके काय चालले आहे?' हा प्रश्न अधिकच गडद केला आहे. सातारा असो वा झिरवाळांचा कथित व्हिडीओ, दोन्ही बाबतीत सुनेत्रा पवार काहीच बोलल्या नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र व्हिडीओची शहानिशा करून राजीनाम्याबाबत निर्णय घेऊ, असे म्हटले आहे. त्यामुळे अजित पवारांच्या निधनानंतर वर्चस्वाच्या लढाईत पक्ष भरकटत चालला आहे की काय, असा प्रश्न पडतो.
Web Summary : Following Ajit Pawar's death, NCP faces internal strife. Factions vie for control, leading to mistrust and questions over leadership decisions, impacting the party's direction and stability.
Web Summary : अजित पवार के निधन के बाद, राकांपा आंतरिक कलह का सामना कर रही है। गुट नियंत्रण के लिए होड़ कर रहे हैं, जिससे अविश्वास और नेतृत्व के फैसलों पर सवाल उठ रहे हैं, जो पार्टी की दिशा और स्थिरता को प्रभावित कर रहे हैं।