संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 07:58 IST2025-10-04T07:58:12+5:302025-10-04T07:58:35+5:30
मराठवाड्यात महापुराने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावेळच्या दसरा या मेळाव्यांमध्ये त्याबद्दलची संवेदनशीलता अभावानेच दिसली.

संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
यंदाचा दोन ऑक्टोबर वैशिष्ट्यपूर्ण होता. गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती याच दिवशी असते. विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन हेही अर्थातच एकाच दिवशी येतात. यावेळी मात्र दोन ऑक्टोबरलाच विजयादशमी आली. त्यामुळे हा दिवस वेगळा ठरला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले. दरवर्षी विजयादशमीला शिवसेनेचा मेळावा होतोच. आता शिवसेना दोन झाल्यामुळे दोन मेळावे सुरू झाले आहेत. त्याशिवाय पंकजा मुंडे यांचा मेळावा आता दरवर्षी असतो. हे सगळेजण काय बोलतात, याकडे महाराष्ट्राचे आणि काही प्रमाणात देशाचेही लक्ष असते.
मराठवाड्यात महापुराने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावेळच्या दसरा या मेळाव्यांमध्ये त्याबद्दलची संवेदनशीलता अभावानेच दिसली. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल मात्र वाजले. उद्धव आणि राज एकत्र येणार, असे संकेत उद्धव ठाकरेंनी पुन्हा दिले. खरे हिंदुत्व आमचेच, हेही सांगितले. शिंदेंनी आपली व्होटबँक पक्की करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री असतानाचे आणि आताचे एकनाथ शिंदे हा बदलही या मेळाव्याने स्पष्टपणे दाखविला. दोन्ही शिवसेनांच्या दसरा मेळाव्यांमध्ये महाराष्ट्राच्या व्यापक हिताऐवजी व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप अधिक होते. शिवाय, भाषेचा स्तरही खालावलेला होता. सुसंस्कृत राजकारणासाठी महाराष्ट्र एकेकाळी ओळखला जात होता. सध्या मात्र राजकारणाची परिभाषा बदललेली आहे. सर्व मेळाव्यांमध्ये हे जाणवले.
‘मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण आमच्या ताटातले घेऊ नका’, अशी भूमिका पंकजा मुंडेंनी त्यांच्या मेळाव्यात मांडली. ‘हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर लागू करून, आरक्षण द्या. संपूर्ण कर्जमुक्ती करा’, ही मनोज जरांगे यांची मागणी आहे. पोहरादेवीच्या बंजारा मेळाव्याचीही दखल घ्यायला हवी. महाराष्ट्रामध्ये सध्या सामाजिक समीकरणे बदलू लागली आहेत. त्यामुळे राजकारणाचा पटही बदलत आहे. अशावेळी या सर्व घटकांच्या भूमिका निर्णायक ठरणार आहेत. तिकडे नागपुरात लोकशाही आणि हिंदुत्वाचा अर्थ अधिक व्यापकपणे मांडला तो डॉ. मोहन भागवतांनी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १९२५ मध्ये स्थापन झाला. तो काळ अत्यंत वेगळा होता.
टिळकांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये आणि देशभर गांधी पर्व सुरू झालेले होते. अशावेळी पूर्वी काँग्रेसमध्ये असणाऱ्या काही नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. तेव्हा, ‘हिंदूराष्ट्र’ हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट त्यांनी सांगितले होते. डॉ. भागवत हिंदुत्वाचा उल्लेख करतात. मात्र, ते अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात, ज्या समरसतेविषयी संघ बोलतो, त्याचे समतेशी काय नाते आहे, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो! सलग शंभर वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विस्तारत आहे आणि आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने तो पुढे जातो आहे. अशावेळी संघाची भारतीयत्वाची कल्पना ज्यांना अमान्य आहे, अशा संघटनांनी आपले सामर्थ्य सिद्ध करणे अपरिहार्य आहे.
संघाचा मेळावा होण्यापूर्वीच गाजला तो कमलताई गवई यांच्या उपस्थितीविषयीच्या बातम्यांमुळे. या मेळाव्याला त्या उपस्थित राहणार, न राहणार, अशा उलटसुलट बातम्या आल्या. कमलताई गवई या रा. सु. गवई यांच्या पत्नी. आता त्यांचे पुत्र देशाचे पहिले बौद्ध सरन्यायाधीश झाल्यामुळे या बातम्या देशभर उमटल्या. अखेर या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरमध्येच बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, ती १९५६ मध्ये. तो दिवस विजयादशमीचा होता. त्यामुळे ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून तो साजरा केला जातो. त्यानिमित्त दीक्षाभूमीवर आणि राज्यभर वेगवेगळे कार्यक्रम झाले. युद्धाचे वातावरण जगभर असताना, बुद्धांच्या वाटेने जाण्याचा निर्धार व्यक्त झाला.
गांधी, आंबेडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेना या सगळ्या वेगवेगळ्या विचारधारा आहेत. अशा विविध विचारधारा असणे हे लोकशाहीचे सौंदर्य आहे. राजकीय विचारधारा वेगळ्या असल्या तरी सगळ्यांचा केंद्रबिंदू इथला सर्वसामान्य माणूस आहे, याचा विसर यापैकी कोणालाच पडता कामा नये. लोकशाही प्रणालीतील स्वातंत्र्य, समता आणि धर्मनिरपेक्ष बंधुता हीच आपली खरी शस्त्रे आहेत. दसरा सर्वांनीच साजरा केला. मात्र, व्यक्तिगत हितसंबंधांची चौकट भेदून भारताचा आणि सर्वसामान्य माणसांच्या भवितव्याचा विचार केल्याशिवाय खरे सीमोल्लंघन करता येणार नाही.