तिसरी लाट उंबरठ्यावर; लसीकरणातील पिछाडीमुळे अधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 08:13 AM2021-07-15T08:13:46+5:302021-07-15T08:15:34+5:30

Coronavirus Third Wave : तिसरी लाट भारताच्याही उंबरठ्यावर उभी आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. जगण्याचे चक्र थांबले हे खरे. पण, लसीकरणातील पिछाडीमुळे धोका मोठा आहे. अशावेळी लोकांनीच अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. 

editorial on coronavirus third wava and behind vaccination process may hit hard | तिसरी लाट उंबरठ्यावर; लसीकरणातील पिछाडीमुळे अधिक धोका

तिसरी लाट उंबरठ्यावर; लसीकरणातील पिछाडीमुळे अधिक धोका

Next
ठळक मुद्देतिसरी लाट भारताच्याही उंबरठ्यावर उभी आहे, हे समजून घेण्याची गरज आहे.लसीकरणातील पिछाडीमुळे धोका मोठा आहे.

भारतीय लोक कोविड विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा इशारा हवामान खात्याच्या इशाऱ्यासारखा सहजपणे घेत आहेत, हे केंद्र सरकारच्या आरोग्य प्रवक्त्याचे विधान अलीकडे कामगिरी सुधारलेल्या हवामान खात्याची टिंगलटवाळी करणारे आहे. सरकारच्याच एका खात्याने अशी दुसऱ्या खात्याची खिल्ली उडविणे योग्यही नाही. परंतु, किमान यामुळे तरी तिसऱ्या लाटेच्या धोक्याकडे देशाचे लक्ष वेधले गेले, हे अधिक खरे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने, विषाणूच्या नव्या अवताराने उडविलेल्या हाहाकाराच्या वेदना अजून शमलेल्या नाहीत. हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सचा तुटवडा, स्मशानभूमीत दहनासाठी कमी पडलेली जागा, गंगा नदीतून वाहिलेली प्रेते, तिच्या किनाऱ्यावर दफन केलेले अभागी हे दु:स्वप्न पूर्णांशाने संपलेले नाही. एप्रिल व मे हे त्या आक्रोशाचे दोन महिने कधीच विसरले जाऊ शकत नाहीत. या पृष्ठभूमीवर, भारतीय असे बहाद्दर, की हॉस्पिटलमध्ये बेडचा तुटवडा ते पर्यटनस्थळी, थंड हवेच्या ठिकाणी हॉटेलमध्ये खोल्यांचा तुटवडा, हा पल्ला महिनाभरात देशाने गाठला. 

आता या गर्दीबद्दलच रोज राज्याराज्यांना व लोकांनाही सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्याची वेळ थेट देशाच्या पंतप्रधानांवर आली आहे. कारण सरकारच्या पातळीवरून ही लाट थोपविण्यासाठी अपेक्षित असलेले प्रयत्न होताना दिसत नाहीत. लसीकरण हाच कोरोना संक्रमणाच्या लाटेमागून येणाऱ्या लाटा थोपविण्याचा मार्ग आहे, हे दुसरी लाट अक्राळविक्राळ रूप धारण करण्यापूर्वीच स्पष्ट झाले होते. जगातील बहुतेक देशांनी या दृष्टीने खूप लवकर पावले उचलली. लस उत्पादक कंपन्यांना खरेदीचे आदेश दिले. त्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद केली. भारत हा खरे तर लस उत्पादनात जगाचा दादा. जगभरातील किमान एकतृतीयांश उत्पादन भारतात होते. तरीदेखील तिसऱ्या लाटेचा रोज इशारा देत असताना लसीकरणाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. दररोज ऐंशी-नव्वद लाख डोस अपेक्षित असताना त्या तुलनेत निम्मेही लसीकरण होताना दिसत नाही. परिणामी, लोकांनीच स्वत:ची काळजी घ्यावी, गर्दी करू नये, अशा आवाहनांचा सपाटा सरकारी यंत्रणा, तसेच केंद्र व राज्य सरकारांनी चालवला आहे. अर्थात, सगळीच राज्ये सावध आहेत असे नाही. श्रावण महिन्यातील शिवभक्तांची कावडयात्रा हा उत्तर भारतातील मोठा उत्सव असतो.

उत्तराखंड सरकारने कोरोनाचा उद्रेक होऊ नये म्हणून यंदाची कावडयात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु, विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असलेल्या उत्तर प्रदेशने मात्र केवळ मतांसाठी ती यात्रा होईल, अशी भूमिका घेतली. आता सर्वोच्च न्यायालयाने त्या प्रकाराची स्वयंस्फूर्तीने दखल घेऊन उत्तर प्रदेश राज्य सरकारला जाब विचारला आहे. थोडक्यात, तिसरी लाट अजून दूर असल्याचे समजून राजकारणी मंडळी व लोकही जीवघेणे धाडस करताहेत. प्रत्यक्षात ही लाट दूर नाही. केंद्र सरकारचे मुख्य आरोग्य सल्लागार व्ही. के. पॉल यांच्या मते तिसरी लाट पोहोचली आहे. दुसरी लाट तीव्रतेच्या टोकावर असताना जगात रोज साधारणपणे नऊ लाख बाधित निष्पन्न होत होते तर आता तीन लाख ९० हजार रुग्ण आढळताहेत. भारतात मुळात दुसरी लाटच वेळेत नियंत्रणात आली नाही. त्यामुळे तिसरीचे आगमन थोडे लांबल्याचे दिसते. पण, इंग्लंड, रशिया, बांगलादेश व इंडोनेशियात झपाट्याने रुग्ण वाढताहेत. 

चिंतेची बाब म्हणजे निम्म्या लोकसंख्येचे लसीकरण होऊनही इंग्लंडमध्ये रुग्ण वाढत आहेत. युरोपीय संघातील अन्य देशांमध्ये ४६ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले गेले आहेत. अमेरिकेत हे प्रमाण ५२ टक्के आहे. भारतात मात्र दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांची संख्या जेमतेम साडेपाच-सहा टक्के इतकीच आहे. दुसऱ्या लाटेचा भयावह प्रवास भारतातून सुरू झाला तर दक्षिण आशियातील इंडोनेशियातून तिसरीचा धोका उभा राहू पाहात आहे. भारतापेक्षाही कमी लसीकरण झालेला हा देश जगभरातील तिसऱ्या लाटेचा केंद्रबिंदू असेल, असे मानले जाते. भारताची लोकसंख्या इंडोनेशियाच्या पाचपट आहे, तरी गेले दहा-बारा दिवस तिथे रोज सरासरी चाळीस हजार बाधित निघत आहेत. हे सर्व पाहता तिसरी लाट भारताच्याही उंबरठ्यावर उभी आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. जगण्याचे चक्र थांबले हे खरे. पण, लसीकरणातील पिछाडीमुळे धोका मोठा आहे. अशावेळी लोकांनीच अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. 

Web Title: editorial on coronavirus third wava and behind vaccination process may hit hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.