‘जिस वजह से मेरी टीम हारी थी, मैं उस वजह को एक बार हराना चाहता हूँ।’ - ‘चक दे’ सिनेमात हॉकी प्रशिक्षक कबीर खानच्या तोंडी असलेलं हे वाक्य. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ते खरं करून दाखवलं! सांघिक खेळात कुणी एकच एक मोठा नसतो, वैयक्तिक विक्रमांच्या दगडांवर नाव कोरण्यापेक्षा देशासाठी चषक जिंकणं आणि विश्वविजेता होणंच जास्त गरजेचं आहे असं सूत्र घेऊन त्यांनी प्रशिक्षकपदाची सूत्रं हाती घेतली आणि ते खरं करून दाखवलं.
शांत-समंजस-सभ्य द्रविडगुरुजींच्या जागी ‘नॉर्थवाला’ ॲटिट्यूड घेऊन, चुकूनही न हसणारे दिल्लीकर गौतम गंभीर प्रशिक्षकपदी येणं हा बदल भारतीय क्रिकेटसाठी सहजसोपा नव्हता. द्रविड आणि लक्ष्मण यांनी मुख्य संघाचे प्रशिक्षक होण्यापूर्वी १९ वर्षांखालील मुलांचे संघ घडवले होते. गंभीर मात्र कोरी पाटी घेऊन आले आणि त्यांनी प्रयोगाचा धडाका लावला. काही प्रयोग फसले, काही चुकले, प्रयोगांच्या नावाखाली संघाची यशस्वी घडी मोडली, न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिकेने देशात येऊन भारतीय संघाला धूळ चारली. रोहित शर्मा-विराट कोहली यांनी (एकदिवसीय क्रिकेट वगळता) संघाचा निरोप घेतला किंवा त्यांना तसं करायला भाग पाडण्यात आलं. कसोटी आणि एकदिवसीय खेळात घसरगुंडी झाली.
गंभीरगुरुजींचं टी-२० वर खास प्रेम. तरुण खेळाडूंना त्यांनी एकच मंत्र दिला : ‘बाद झालात तरी चालेल, घाबरून टुकुटुकु खेळायचं नाही, वैयक्तिक विक्रमांसाठी तर मुळीच खेळायचं नाही!’ खेळाडूंना दिल्या शब्दाला ते जागले. शून्यावर सतत बाद होऊनही अभिषेक शर्मा संघाबाहेर गेला नाही की कप्तान सूर्यकुमार यादव वैयक्तिक फॉर्म नाही म्हणून घाबरला नाही. संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, रिंकू सिंग या सगळ्या खेळाडूंच्या मागे संघव्यवस्थापन उभं होतं. अपयशाची जबाबदारी घ्यायला, प्रयोगांची किंमत मोजायलाही तयार होतं. हा प्रयोगांचा प्रवास यशस्वी झाला आणि गेल्या दोन वर्षांत भारताने तीन आयसीसी ट्रॉफी घरी आणल्या.
अजिबात कच न खाणारा, बेडर क्रिकेट खेळणारा फिअरलेस संघ म्हणून भारतीय संघाची ओळख तयार झाली, विशेषत: टी-२० प्रकारात. एक खेळाडू अपयशी झाला तर दुसरा त्याची जागा घेतो, पुढच्या सामन्यात तिसराच कुणी उत्तम खेळतो. ज्याच्या धावा होत नाहीत, ज्याला बळी मिळत नाहीत तो निदान क्षेत्ररक्षण करून संघाच्या यशात आपला वाटा नोंदवतोच. पूर्वी एक किंवा दोनच खेळाडूंवर मदार ठेवून खेळणारा, कागदावर शेर पण मैदानात प्रेशरखाली कोलमडणारा संघ हा इतिहास या नव्या दमाच्या तरुण भारतीय संघानं मोडीत काढला.
एक जसप्रीत बुमराहचा अपवाद सोडला तर ‘लिजंड’ असा एकही खेळाडू नाही; पण संघभावना सर्वोच्च ही वृत्ती गंभीरगुरुजींनी घोटून घेतली. हे करण्याइतपत ‘ताकद’ त्यांना दिली म्हणून निवड समिती आणि बीसीसीआय यांचंही कौतुक करायला हवं. माणसांकडे काम द्यायचं; पण निर्णयक्षमताच द्यायची नाही, अंमलबजावणीवेळी हातच बांधून ठेवायचे ही टिपिकल भारतीय ‘येस सर’ वृत्ती! या विश्वचषक विजयानं दाखवून दिलं की ती वृत्ती मोडीत काढता येते. गुणी माणसांना त्यांच्या पद्धतीनं काम करू दिलं, फसले तरी प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य दिलं तर ते सर्वोच्च यश मिळवू शकतात!
२०२४ साली भारतानं विश्वचषक जिंकला तेव्हा भारतात आयसीसी ट्रॉफींचा दुष्काळ होता. शर्मा-कोहली पर्व संपता संपता २०२३ साली अहमदाबादच्याच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात हातचा गेला. पण २०२४ नंतर चित्र पालटलं, टी-२० विश्वचषक जिंकलो, चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकलो आणि २०२६ चा टी-२० विश्वचषकही देशाबाहेर जाऊ दिला नाही. भारतीय संघानं टी-२० खेळाची परिभाषाच बदलून टाकली. २००७ मध्ये धोनीच्या तरुण संघानं पहिला विश्वचषक जिंकला होता, टी-२० क्रिकेट विश्वचषकालाच यंदा एकविसावं लागताना तरुण भारतीय संघानं हे जगाला ठणकावून सांगितलं की गरीब, अंडरडॉग, झगडत जिंकणाऱ्या संघाची आणि देशाची ही गोष्ट राहिलेली नाही. आता भारतीय क्रिकेटचा स्वभाव आहे निर्विवाद सत्ता गाजवण्याचा.. ती सत्ता येते मेहनत, गुणवत्ता, प्रयोग आणि संघवृत्तीतून! या विश्वचषकाचं सार एकच, संघापेक्षा मोठा कुणी नाही आणि जिंकण्यापेक्षा मोठं काहीच नाही!
Web Summary : Gautam Gambhir's coaching, emphasizing team spirit over individual records, transformed Team India. Despite initial setbacks and bold experiments with young players, his fearless approach led to multiple ICC trophy wins, establishing India's dominance in T20 cricket and beyond.
Web Summary : गौतम गंभीर की कोचिंग, व्यक्तिगत रिकॉर्ड पर टीम भावना पर जोर, टीम इंडिया को बदल दिया। शुरुआती असफलताओं और युवा खिलाड़ियों के साथ प्रयोगों के बावजूद, उनके निडर दृष्टिकोण ने कई आईसीसी ट्रॉफी जीत दिलाई, टी20 क्रिकेट में भारत का दबदबा स्थापित किया।