किरण अग्रवालकाखेला कळसा असताना गावाला वळसा मारण्याची आपली रीतच पुरानी आहे, त्यामुळे आपल्या आसपास जे आहे ते सोडून आपण भलतीकडेच धुंडाळत बसतो. आजार आपदेच्या स्थितीतही साधे सोपे उपाय करण्याचे सोडून आपण दुसरीकडे नजरा लावून बसतो. कोरोनावरील उपायाबाबतही तोच अनुभव येत असल्यामुळेच भीम राजभर यांच्यासारख्या तज्ज्ञांना पुढे येऊन हे सांगावे लागले, की काही चिंता करू नका; ताडी प्या आणि कोरोनापासून सुरक्षित राहा! म्हणजे बघा इतका सोपा उपाय; परंतु आपण उगाच वेगवेगळ्या लसींकडे डोळे लावून बसलो आहोत आणि संशोधनावर वेळ घालवत आहोत. याला आपल्याकडे घरातल्या आपल्या माणसाबद्दलची गुणग्राहकताच नाही म्हणायचे तर काय म्हणायचे?उत्तर प्रदेशात आमदार असलेल्या भीम राजभर यांनी नुकताच एक मोलाचा सल्ला दिला आहे, तो म्हणजे ताडी प्यायल्याने कोरोनापासून रक्षण होऊ शकते. ताडीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते असाही दावा त्यांनी केला आहे. तेव्हा त्यांचा हा सल्ला व दावा पाहता आपण उगाच आठ-नऊ महिने कोरोनावर उपाय शोधण्याच्या भानगडीत वेळ घालवला म्हणायचे. ते रेमडीसीवर की काय म्हणतात ते इंजेक्शन घेण्यापेक्षा आपली ताडी घेतलेली केव्हाही छानच. शासनही उगाच भलती सलती औषधी रुग्णालयांना पुरवत बसले व त्यावर कोट्यवधीचा खर्च केला, त्याऐवजी ताडीचे ग्लास सर्व ठिकाणी भरून दिले असते तर किती बरे झाले असते! औषधी गुणधर्माच्या झिंकचा डोस घेण्यापेक्षा झिंग आणणारी ताडी कोरोनाग्रस्तही चवीने चाखतील की! कोरोनाचे रुग्ण वाढण्याच्या संभावनेतून जागोजागी जे मोठमोठे कोरोना केअर सेंटर उभारून ठेवले गेले आहेत व अधिकतर ठिकाणी ते रिकामेच राहिल्याचेही आढळून येते, तेथे या ताडीचे उपाय योजले गेल्यास तेही भरभरून वाहतील ! पण साध्या सोप्या उपायांवर आमचा विश्वासच नसतो.
कोरोनापासून रक्षणासाठी राजभर यांचा घोटभर उपाय!
By किरण अग्रवाल | Updated: December 31, 2020 07:32 IST
Bhim Rajbhar And Corona Virus : आमदार असलेल्या भीम राजभर यांनी नुकताच एक मोलाचा सल्ला दिला आहे, तो म्हणजे ताडी प्यायल्याने कोरोनापासून रक्षण होऊ शकते.
कोरोनापासून रक्षणासाठी राजभर यांचा घोटभर उपाय!
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}