ट्रॅफिक जाम आणि अस्वस्थ पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 07:59 IST2024-12-28T07:58:51+5:302024-12-28T07:59:42+5:30
आपल्यामुळे लोकांना जराही त्रास होता कामा नये, याबद्दल डाॅ. सिंग विलक्षण आग्रही असत

ट्रॅफिक जाम आणि अस्वस्थ पंतप्रधान
अशोक चव्हाण
(माजी मुख्यमंत्री, खासदार)
२००९. मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग मुंबईला आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर मी व पंतप्रधान एकाच वाहनाने विमानतळाकडे निघालो. हाजी अली येथे रस्त्याच्या उजवीकडे वरळी नाक्यापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. लोक संतापून रस्त्यावर उतरले होते. त्यांनी आरडाओरड सुरू केली.
हे काय चालू आहे, मलाही समजेना, म्हणून पोलिस आयुक्तांना फोन लावला असता हाजी अली हा चौक ओपन असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने धोका आहे. त्यामुळेच वाहतूक थांबविली, आपण रिस्क घेऊ शकत नाही, असे आयुक्तांनी सांगितले. त्यानंतर मी स्वत: वाहनाबाहेर येऊन हात जोडून माफी मागितली, चूक झाल्याचे सांगितले. त्यानंतर ताफा पुढे निघाला. सुरक्षेच्या कारणावरून जनतेची झालेली ही अडवणूक पाहून मनमोहन सिंग अस्वस्थ झाले. पुढच्या वेळी मुंबई शहरात किमान रात्री तरी कोणताही कार्यक्रम ठेवू नये, दिवसा असेल, तर हेलिकॉप्टरने जाता येईल, अशी सूचना त्यांनी लगोलग केली. यावरून डॉ. सिंग यांची संवेदनशीलता दिसून येते. नंतर ते त्या काळात दोन वेळा मुंबईला आले. मात्र, त्यांनी विमानतळाच्या परिसरातच कार्यक्रम घेण्याची दक्षता घेतली.
नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये, डॉ. सिंग अर्थमंत्री तर शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. या दोघांमध्ये मित्रत्वाचे अतिशय घनिष्ठ नाते होते. मी जेव्हा-जेव्हा डॉ. सिंग यांना भेटलो, तेव्हा ते आवर्जून आस्थेने कौटुंबिक चौकशी करायचे. त्यांच्यातला हा लोभसवाणा, कुटुंबवत्सल माणूस मला नेहमीच खूप उंच वाटत आला. साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा, सचोटी, प्रामाणिकपणे काम करण्याची वृत्ती त्यांनी कायम सांभाळली. कमी बोलायचे पण जे बोलत, ते नेमके असे.
मी मुख्यमंत्री असताना, विधानसभेची निवडणूक लागली. मी एकदाही भोकर मतदारसंघात प्रचाराला गेलो नाही. शेवटच्या दिवशी तरी जावे, म्हणून नियोजन केले. मात्र, नेमके त्याच दिवशी डॉ. सिंग मुंबईत येणार होते. त्यांना एकटे सोडू नका, असा फोन सोनिया गांधी व अहमद पटेल यांच्याकडून आला. एकच दिवस प्रचाराला शिल्लक असताना आता काय करावे, या विवंचनेत मी पडलो. मग थेट डॉ. सिंग यांनाच फोन लावला. ते म्हणाले, माझी काळजी करू नका. तुम्ही निर्धास्तपणे आपल्या कामाला जा.
१४ जुलै २०१६ रोजी शंकरराव चव्हाण मेमोरियलच्या उद्घाटनासाठी सोनिया गांधी यांच्यासह डॉ. सिंग नांदेडला आले होते. नांदेडला त्यांचे अनेकदा येणे झाले. गुरू-ता-गद्दी कार्यक्रमासाठी त्यांनी दोन हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी दिला. मात्र, आपण शीख आहोत आणि गुरूद्वाराला एवढा निधी कसा द्यावा, कोणी आपल्याकडे बोट तर दाखविणार नाही ना, म्हणून त्यांच्या मनात संकोच निर्माण झालेला मी अनुभवलेला आहे.
इतका प्रामाणिक निरलस माणूस भारताच्या राजकीय संस्कृतीमध्ये मिळणे मुश्कील खरेच! काँग्रेस पक्षाचे ते अतिशय निष्ठावान कार्यकर्ते होते. पक्षाच्या सर्व अधिवेशने, मेळावे, बैठकांना ते आवर्जून उपस्थित राहत. मात्र, पक्षात त्यांचा कधीही, कुठेही हस्तक्षेप नसे. गांधी परिवाराचे ते सर्वाधिक विश्वासू होते. चव्हाण परिवारावर त्यांचे अतिशय प्रेम होते. ते सदैव आमच्या स्मरणात राहतील.
‘अरे भाई, कुछ भी हो सकता है’
२००४. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत सरकार स्थापन करण्याची गडबड सुरू झाली होती. आम्ही राजधानीत दाखल झालो. पवार साहेबांचा बंगला गाठला. दिल्ली तापली होती. पारा ४५ डिग्रीपर्यंत गेलेला. राजकीय वातावरणही तप्त होत होते. रस्त्यावर जाणवणारी ही तप्तता त्या बंगल्यात फारशी जाणवली नाही. लोक येत होते. बैठका सुरु होत्या.
सोनिया गांधींनी पंतप्रधानपद न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर झालं आणि वातावरणच अचानक बदलून गेलं. चर्चेचे संदर्भ बदलले. बाहेर रस्त्यावर कार्यकर्त्यांची आंदोलनं सुरू झाली. दिल्लीतल्या प्रमुख राजकीय नेत्यांच्या बंगल्यावर वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे, पत्रकार तळ ठोकून बसले होते. हे सारं आम्ही टीव्हीवर बघत असताना फ्लॅश आला, ‘मनमोहन सिंग शरद पवार को मिलने उनके बंगले पर पहुँचे!’
मी शहानिशा करून घेण्यासाठी बाहेर आलो, तर शरद पवार आणि मनमोहन सिंग खास दालनात चर्चा करत होते. ही चर्चा संपल्यानंतर साहेबांनी आम्हाला आत बोलावलं. त्यावेळेपर्यंत मनमोहन सिंग यांचं नाव पंतप्रधानपदासाठी निश्चित झालेलं होतं. काँग्रेसच्या संसदीय बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची औपचारिकता उरली होती. मी पुढे होत ‘बधाई हो साहब’, अशा शुभेच्छा दिल्या. त्यावर मनमोहन सिंग म्हणाले, ‘काहे की बधाई?’ मी म्हटलं, ‘आप प्रधानमंत्री होने जा रहे हो’! ते मिश्कील हसून म्हणाले, ‘हाँ, मैं होने जा रहा हूँ, हुआ तो नहीं! अरे भाई, यहाँ से वहाँ तक जाने के बीचमे कुछ भी हो सकता है !’
आमच्या शुभेच्छांचा स्वीकार करून ते बाहेर पडले आणि थेट बैठकीच्या ठिकाणी गेले. या छोट्याशा भेटीतही या सत्शील माणसाने भारताचे राजकारण एका ओळीत समजावून सांगितले होते, ते अजून आठवते !
- विठ्ठल मणियार (ज्येष्ठ उद्योजक, लेखक)