डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार सर्वांत महागडं गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 07:07 IST2025-05-16T07:07:34+5:302025-05-16T07:07:34+5:30

जगात असे काही नेते आहेत, त्यांच्या पंक्तीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अगदी फिट बसतात. त्यांच्या या इमेजमुळेच त्यांना आता जगातलं सर्वांत महाग गिफ्ट मिळणार आहे.

donald trump will receive the most expensive gift | डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार सर्वांत महागडं गिफ्ट!

डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार सर्वांत महागडं गिफ्ट!

माणूस जितका ‘मोठा’, जितका ‘पॉवरफूल’ आणि जितका ‘झाकी’ तितकं लोक त्याला घाबरून राहतात आणि त्याच्या वाटेला फारसं कोणी जात नाही. उलट या व्यक्तीचा भविष्यात आपल्याला त्रास नको म्हणून त्याला जितकं ‘खुश’ ठेवता येईल, तितकं ठेवण्याचा प्रयत्न अनेक जण करीत असतात. जगात असे काही नेते आहेत, त्यांच्या पंक्तीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अगदी फिट बसतात. त्यांच्या या इमेजमुळेच त्यांना आता जगातलं सर्वांत महाग गिफ्ट मिळणार आहे.
 
काय आहे ही भेटवस्तू? - तर ती आहे बोइंग ७४७-८ हे जंबो जेट विमान. आतून अक्षरश: राजमहालासारखं असलेलं हे जेट तब्बल ३४०० कोटी रुपयांचं आहे. कतार सरकार हे लक्झरी जंबो जेट ट्रम्प यांना भेट देणार आहे. या विमानाची किंमत सुमारे ४०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३४०० कोटी रुपये) असून, कोणत्याही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना आजवर मिळालेल्या भेटीपेक्षा ही भेट सर्वाधिक किमती असेल. अर्थात ही भेट ट्रम्प यांना लगेचंच मिळणार नाही आणि भेट मिळाली तरी या जेटचा उपयोग त्यांना लगेच करताही येणार नाही. 

व्हाइट हाउसच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या मते ही भेट जाहीर झाली तरी मिळायला उशीर लागू शकतो आणि ट्रम्प यांचा कार्यकाळ २०२९ मध्ये जेव्हा पूर्ण होईल त्याच्या काही काळ आधी त्यांना हे जेट (खरोखरच भेट मिळालं तर) वापरता येऊ शकेल. सुरक्षेची पूर्ण खात्री झाल्यानंतरच हे जेट वापरायला परवानगी मिळू शकेल. 

हे जंबो जेट अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे जेट आतून अक्षरश: महालासारखं आहे. यात बेडरूम, बाथरूम, किचनच्या आलिशान सोयी आहेत. या जेटची लांबी ७६ मीटर असून, वजन ९७५,००० पाउंड आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकाऱ्यांच्या मते ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतरही हे जेट वापरू शकतील. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी अधिकृतपणे ‘एअर फोर्स वन’ या विमानाचा उपयोग केला जातो. ते त्यांचं अधिकृत विमान आहे. ट्रम्प त्यांच्यासाठी ‘ट्रम्प फोर्स वन’ हे त्यांचं खासगी विमानही वापरतात; जे एक जुनं ७५७ जेट विमान आहे. १९९० मध्ये तयार झालेलं हे विमान २०११ मध्ये खरेदी करण्यात आलं होतं. 

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी वापरण्यात येणाऱ्या सध्याच्या ‘एअर फोर्स वन’ या विमानापेक्षा खूपच अत्याधुनिक आणि आलिशान आहे. अर्थात हे विमान कतार खरोखरच ट्रम्प यांना भेट देत आहे किंवा काय, याबाबत संदिग्धता आहे, कारण त्याबाबतची अधिकृत घोेषणा अद्याप बाकी आहे. पण जाणकारांचं म्हणणं आहे, जेट नक्कीच ट्रम्प यांना भेट दिलं जाणार आहे. कतार सरकारचे प्रवक्ता अली अल अन्सारी यांनीही नुकतंच जाहीर केलं आहे की दोन्ही देशांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे. पण अंतिम निर्णय अजून बाकी आहे. 

अमेरिकेतील डेमोक्रॅटिक सदस्यांनी मात्र या भेटीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांचं म्हणणे आहे, ही भेट ट्रम्प यांच्या व्यावसायिक हितसंबंधांमधील आणि त्यांच्या अध्यक्षीय जबाबदाऱ्यांमधील अंतर दर्शवते. ट्रम्प यांनी मात्र डेमोक्रॅटिक पक्षावर टीका करताना म्हटलं आहे, ४० वर्षे जुन्या ‘एअर फोर्स वन’च्या ऐवजी नवं जेट, तेही फुकटात मिळत असतानाही विरोधकांच्या नाकाला मिरच्या का झोंबाव्यात?..
 

Web Title: donald trump will receive the most expensive gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.