ट्रम्प स्वत:च्याच नावाचं उभारणार भव्य गेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 08:41 IST2025-10-21T08:41:18+5:302025-10-21T08:41:18+5:30
स्वत: ट्रम्प यांनीच व्हाइट हाऊसमध्ये या गेटची तीन वेगवेगळ्या आकारांत आणि प्रकारांत मॉडेल्स सादर केली.

ट्रम्प स्वत:च्याच नावाचं उभारणार भव्य गेट!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्वत:च स्वत:ची टिमकी वाजवत राहण्याचा किती शौक आहे, हे साऱ्या जगाला माहीत आहे. जगात कुठेही काहीही ‘चांगलं’ झालं, तर ते ‘मीच’ केलं, हे सांगण्याचा आणि ‘पटवून’ देण्याचा त्यांचा अट्टहास असतो. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे ट्रम्प आता वॉशिंग्टनमध्ये स्वत:च्या नावावर एक विशाल गेट तयार करणार आहेत. ‘आर्क डी ट्रम्प’ असं त्याचं नाव असेल. ज्या कोणाला वॉशिंग्टन शहरात प्रवेश करायचा, त्याला या गेटमधूनच यावं लागणार! स्वत: ट्रम्प यांनीच व्हाइट हाऊसमध्ये या गेटची तीन वेगवेगळ्या आकारांत आणि प्रकारांत मॉडेल्स सादर केली.
अमेरिकेच्या २५०व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं राजधानी वॉशिंग्टन डी. सी.मध्ये हे महाकाय गेट तयार करण्याचं प्रयोजन आहे. व्हाइट हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, या आर्कची कल्पना खुद्द ट्रम्प यांचीच होती. या आर्कचं डिझाईन बनवण्याच्या प्रक्रियेतही ट्रम्प सहभागी होते. हे गेट अतिशय आलिशन स्वरूपात व्हावं यासाठी ट्रम्प यांचे विविध समर्थक कामाला लागले आहेत. त्यासाठी त्यांनी निधी गोळा करायलाही सुरुवात केली आहे. पोटोमॅक नदीच्या काठावर लिंकन मेमोरिअलसमोर फेडरल सरकारच्या जमिनीवर हे गेट बांधलं जाणार आहे. व्हाइट हाऊसपासून हे गेट फक्त ४ किलोमीटर अंतरावर असणार आहे. व्हर्जिनिया राज्याची सीमा सुरू होण्याआधी वॉशिंग्टन डीसीची थोडी जमीन आहे. त्याच जमिनीवर हा दरवाजा बांधला जाणार असला तरी बांधकाम कधी सुरू होणार आणि त्यासाठी खर्च किती येणार हे मात्र अद्याप स्पष्ट नाही.
कुठल्याही नव्या स्मारकासाठी साधारणतः कॉंग्रेसची मंजुरी लागते. यात अनेक टप्पे असतात. त्यामुळे पुढच्या वर्षी अमेरिकन स्वातंत्र्याला २५० वर्षे पूर्ण होईपर्यंत हे गेट तयार होणं कठीण आहे, असं काही जाणकारांचं म्हणणं आहे. मात्र मनात आणलं तर ट्रम्प काहीही करू शकतात आणि त्यासाठी सगळे नियमही धाब्यावर बसवू शकतात. काहींचं म्हणणं आहे, गेटवरील ट्रम्प यांचं नाव हे केवळ ‘ब्रॅण्ड नेम’ म्हणून असणार आहे.
केवळ ‘ट्रम्प गेट’च नव्हे, व्हाइट हाऊसमध्येही ट्रम्प आता अनेक बदल करीत आहेत. माध्यमांच्या माहितीनुसार ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये करावयाच्या अनेक बदलांचीही विविध मॉडेल्स तयार केली आहेत. तिथे नवीन संगमरवरी टाइल्स कुठे आणि कशा लावायच्या हेदेखील त्यांनी स्वतःच ठरवलं आहे.
फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह जगातील अनेक नेत्यांना व्हाइट हाऊसमध्ये झालेले आलिशान बदल त्यांना दाखवायचे आहेत. व्हाइट हाऊसमध्ये केलेल्या अनेक सजावटी ट्रम्प यांच्या ‘मार-ए-लागो’ रिसॉर्टसारख्या आहेत.
ट्रम्प यांनी सप्टेंबरमध्ये ‘प्रेसिडेन्शिअल वॉक ऑफ फेम’ची सुरुवात केली. इथे ट्रम्प यांच्यासह अमेरिकेच्या इतर ४४ राष्ट्राध्यक्षांचे सोन्याच्या फ्रेममधले फोटो लावले आहेत. ट्रम्प सध्या जे काही करताहेत, जी ‘चमकोगिरी’ ते करताहेत, त्याला खुद्द अमेरिकेच्याच अनेकांचा विरोध आहे.
ट्रम्प यांच्या ओव्हल ऑफिसच्या नव्या डिझाइनला त्यांनी ‘Gilded Rococo Nightmare’ म्हणजे नुसतीच चमकधमक असलेलं हे एक भयावह स्वप्न आहे, अशी टीका केली आहे.