असहिष्णुतेच्या विरोधात सातत्याने संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 03:17 IST2016-04-14T03:17:24+5:302016-04-14T03:17:24+5:30

सामाजिक न्यायासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला. धार्मिक असहिष्णुतेच्या विरोधात सातत्याने ठामपणे उभे राहिले. आज त्यांची १२५ वी जयंती. भारताचे राजकीय

Continuous struggle against intolerance | असहिष्णुतेच्या विरोधात सातत्याने संघर्ष

असहिष्णुतेच्या विरोधात सातत्याने संघर्ष

- सुशीलकुमार शिंदे

सामाजिक न्यायासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला. धार्मिक असहिष्णुतेच्या विरोधात सातत्याने ठामपणे उभे राहिले. आज त्यांची १२५ वी जयंती. भारताचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक लोकजीवन कसे असावे, याविषयी बाबासाहेबांचे काही ठाम विचार होते. कोणाचीही पर्वा न करता कायम त्यांनी मुक्तपणे त्यांचा पुरस्कार केला. बाबासाहेबांना भारतात मिळणारे समर्थन पाहिल्यावर ब्रिटिश सरकारने १९३१ सालच्या गोलमेज परिषदेसाठी त्यांना लंडनला निमंत्रित केले. महात्मा गांधींबरोबर भारतात सामाजिक न्यायाच्या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवणारा ऐतिहासिक पुणे करार या परिषदेच्या पार्श्वभूमीवरच पुण्यात येरवड्याला झाला.
बाबासाहेबांची अलौकिक विद्वत्ता आणि दलितांबाबत त्यांच्या मनातली करुणा, महात्माजी आणि पंडित नेहरूंनी या वेळी बारकाईने न्याहाळली. दोघांच्या पुढाकारानेच बाबासाहेबांकडे भारतीय राज्यघटनेच्या घटना समितीचे अध्यक्षपद चालत आले. प्रत्येकाला मताधिकार आणि वैचारिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार प्रदान करणारी अलौकिक राज्यघटना, डॉ. आंबेडकरांनीच भारतीय लोकशाहीला प्रदान केली. स्वतंत्र भारताच्या राजकीय व्यवस्थेचा पायाच या घटनेने रचला गेला.
भारताच्या सामाजिक जीवनाला दिशा देणाऱ्या या महानायकाने असहिष्णुतेच्या विरोधात सातत्याने प्रखर लढा उभा केला. मागासवर्गीय समाजाला पिण्याच्या पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. दलित समाजाला हिंदू मंदिरांत सन्मानाने प्रवेश मिळावा, यासाठी नाशिकला काळाराम मंदिर सत्याग्रह केला. बाबासाहेबांच्या सामाजिक संघर्षाची ही दोन ज्वलंत प्रतीके आहेत. माणुसकीच्या आग्रहासाठी झालेल्या या सत्याग्रहांनी देशभर दलित समाजात अस्मिता जागवली. ‘शिक्षणाची कास धरा, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा अव्दितीय गुरुमंत्र बाबासाहेबांनी दलित समाजाला दिला. विविध धर्म व त्यांच्या रूढी व परंपरांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर, १९५0 च्या दशकात डॉ. आंबेडकरांना शांततेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचे आकर्षण वाटू लागले. बौद्ध भिक्कू व विद्वानांच्या संमेलनात भाग घेण्यासाठी याच सुमारास बाबासाहेब श्रीलंका व ब्रह्मदेशात गेले. अंतत: हिंदू धर्माचा त्याग करून , नागपूरच्या दीक्षाभूमीत त्यांनी स्वत: ८ लाख अनुयायांसह बौद्ध धर्माचा विधीवत स्वीकार केला. ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे महानिर्वाण झाले.
भारतात सर्वत्र धार्मिक द्वेषाची आणि सामाजिक असहिष्णुतेची बीजे आज राजरोस रोवली जात आहेत. अशा वेळी त्या महानायकाच्या शिकवणीचे स्मरण झाल्याशिवाय राहात नाही. १२५ व्या जयंती दिनी डॉ. बाबासाहेबांना मन:पूर्वक आदरांजली.

Web Title: Continuous struggle against intolerance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.