वाचनीय लेख - कमळाला टोचतात घड्याळाचे काटे!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 07:49 AM2023-11-24T07:49:50+5:302023-11-24T07:59:11+5:30

‘एकनाथ शिंदेंमुळे आपण सत्तेत आलो’; पण ‘राष्ट्रवादीमुळे मात्र आपल्या सत्तेत वाटेकरी तयार झाले’, अशी भावना भाजपवाल्यांमध्ये आहे.

Clock hands pierce the lotus, ncp and bjp political in maharashtra | वाचनीय लेख - कमळाला टोचतात घड्याळाचे काटे!

वाचनीय लेख - कमळाला टोचतात घड्याळाचे काटे!

यदु जोशी

भाजपच्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघप्रमुख अन् प्रभारींचे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झाले. समारोपावेळी त्यातील काहींनी राष्ट्रवादीबद्दल शंका उपस्थित केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबाबत कोणाला अडचण नव्हती, पण राष्ट्रवादीबाबत मात्र अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. ‘लोकसभेला ठीक आहे, पण आमच्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत तिथे इतकी वर्षे आम्ही त्यांच्याविरुद्ध संघर्ष करतोय, आता काय करायचे?’ - असा साहजिक सवाल त्या शिबिरात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मग सगळ्यांची समजूत काढली. ‘लोकसभेचे लक्ष्य आधी समोर ठेवा, विधानसभेची काळजी करू नका’ म्हणाले. 

भाजपचे खालचे नेते काहीही बोलू द्या एक नक्की की अजित पवारांची ताकद फडणवीस-बावनकुळेंना कळते अन् दिल्लीलादेखील कळते. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप राष्ट्रवादीशी फारकत घेईल असा तर्क काही जण देतात. त्यात काहीही तथ्य नाही याची प्रचिती भविष्यात येईलच. तत्त्व, धोरण, विचाराच्या पातळीवर भाजपमधील काही जणांना राष्ट्रवादीशी संगत नको असे भलेही वाटत असेल, पण त्यांच्या वाटण्याला फारशी किंमत दिली जाणार नाही. कारण, निवडणूक हा आकड्यांचा खेळ असतो. जो जिता

वही सिकंदर! 
लोकसभेच्या ४२च्या आकड्यासाठी आणि विधानसभेतील दमदार बहुमतासाठी अजित पवार सोबत लागतीलच. त्यामुळे कोणी कितीही नाराजी व्यक्त केली तरी अजित पवारांना नाराज करण्याची भूमिका

भाजपश्रेष्ठी घेणार नाहीत. 
शरद पवार नावाचा ब्रँड आजही आहेच, पण पक्षाचे नेटवर्क बहुतेक ठिकाणी अजितदादांसोबत आहे.  एक बडे नेते परवा खासगीत सांगत होते की लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतरही दोन शिवसेना राहतील, पण दोन राष्ट्रवादी राहणार नाहीत, एकच राष्ट्रवादी असेल. त्या नेत्याची भविष्यवाणी खरी होणार असेल तर महाराष्ट्रात येत्या तीन-चार महिन्यांत बरेच काही वरखाली होईल. बारामतीची लोकसभा जागा हा टर्निंग पॉइंट असेल. दादाने ताईला ओवाळणी दिवाळीतच दिली पाहिजे असे काही नाही, ती नंतरही देता येते.
जिल्ह्यात, तालुक्यात काम करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना राष्ट्रवादीविषयी शंका अन् शिंदेंच्या शिवसेनेविषयी प्रेम का वाटते? शिवसेना हा भाजपचा नैसर्गिक मित्र आहे, दोघांनी २०१९ मध्ये युती करून लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवली होती. दोघांना एकमेकांची बलस्थाने आणि कमकुवत दुवे माहिती आहेत. दोन्ही वेळा राष्ट्रवादी मात्र भाजपच्या विरोधात होती. शिंदे सोबत आल्याने आपण सत्तेत आलो ही भाजपमध्ये त्यांच्याबद्दलची चांगली भावना आहे, पण राष्ट्रवादीबद्दल तशी भावना नाही. उलट राष्ट्रवादीमुळे आपल्या सत्तेत वाटेकरी तयार झाला, असा तक्रारीचा सूर आहे. अजूनही अजित पवार भाजपच्या अगदी गळ्यात गळा घालून  फिरताना दिसत नाहीत. असे म्हणतात, की भाजपसोबत जाताना त्यांनी काही अटी घातल्या होत्या, त्यातील दोन-तीन अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे ते नाराज आहेत. मंत्रिमंडळातील वाटा आणि ऊर्जा व गृहनिर्माण खाते मिळणे या त्यातीलच काही अटी होत्या. मंत्रिमंडळ विस्तार झाल्याशिवाय या दोन्ही अटी पूर्ण होणार नाहीत.

म्हाळगी प्रबोधिनीतील शिबिरात भाजपच्या ‘महाविजय २०२४’ या अभियानाचे प्रमुख आ. श्रीकांत भारतीय यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केले. त्यातली आकडेवारी बोलकी आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २३ जागा, १, ४९,१२,१३९ (२७.८४ टक्के) मते मिळाली होती. शिवसेनेने १८ जागा जिंकल्या अन् १,२५,८९, ०६४ (२३.५ टक्के) मते मिळवली होती. राष्ट्रवादीला ४ जागा, ८३,८७, ३६३ (१५.६६ टक्के) मते मिळाली होती. काँग्रेसला १ जागा, ८७,९२,२३७(१६.४१ टक्के) मते मिळाली होती. भाजप स्वत:चा टक्का २७.८४ वरून किमान ३५ पर्यंत नेईल आणि त्याचवेळी शिंदे अन् अजित पवारांच्या पक्षाला सोबत घेऊन ५० टक्क्यांहून अधिक मते घेत किमान ४२ जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य असेल. 

विधानसभेतही महायुती कायम का राहील? 
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २७.८४ टक्के मते घेणाऱ्या भाजपला त्यानंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत २६.१ टक्के मते आणि १०५ जागा मिळाल्या होत्या. आता बहुमतासाठी १४५ हून अधिक जागा जिंकायच्या असतील तरी भाजपला मित्रपक्ष लागतीलच. कारण, लोकसभेला साजेसे यश विधानसभेत मिळवायचे तर १७५ हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार असेल, अशावेळी दोन मित्रपक्ष लागतीलच. जशी भाजपची गरज आहे तशी भाजपसोबत राहणे ही शिंदेंच्या पक्षाची आणि अजित पवारांच्याही पक्षाची गरज असेलच.  

जरा बचके चंदूभाै 
आपल्या स्वत:च्या कुटुंबासह मकाऊ, बँकॉकला जाणारे राजकारणी कमी असतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या कुटुंबासोबतच गेले होते, पण संजय राऊतांनी त्यांचा कसिनोमधला फोटो मिळवला अन् खळबळ उडवली. मग भाजपने आदित्य ठाकरेंचा हातात ग्लास घेतलेला फोटो फिरवला. चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंचा उल्लेख करत एक व्हिडीओ फिरवला. नितेश राणेंना बावनकुळेंच्या कृतीत  काहीही गैर वाटले नाही. ‘एकमेकांची वैयक्तिक उणिदुणी काढायची नाही’ यावर पुढचे फोटो अन् व्हिडीओ थांबवले गेले म्हणतात. प्रश्न सार्वजनिक वर्तणुकीचा आहे, राजकारणात वावरताना काही पथ्ये पाळायची असतात. आपलीच प्रतिमा आपलीच वैरी होऊ द्यायची नसते. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंचे असे फोटो कधी बघितले का? चंदूभौंचे आतबाहेर भरपूर ‘हितचिंतक’ आहेत, पटकन कोणावरही विश्वास ठेवू नये. शिवाय दिल्लीचे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले असतात. तेव्हा जरा बचके! निवडणुकीचा काळ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाने कधी नव्हे एवढी पातळी सोडली आहे. काही नेत्यांच्या सीडी बाहेर येऊ शकतात.

Web Title: Clock hands pierce the lotus, ncp and bjp political in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.