इराणमधले गजबजलेले बाजार, कॅरवान सराई आणि हमाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 08:17 IST2026-04-30T08:17:38+5:302026-04-30T08:17:55+5:30

अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेला वाटाघाटींमध्ये जेरीस आणणारा इराणी माणूस असा का? - इराणमधल्या वास्तव्यात सापडलेलं एक उत्तर!

Bustling markets, caravanserais and hammams in Iran | इराणमधले गजबजलेले बाजार, कॅरवान सराई आणि हमाम

इराणमधले गजबजलेले बाजार, कॅरवान सराई आणि हमाम

स्नेहा केतकर, इराणमध्ये काही काळ वास्तव्य.
सध्या मुक्काम बंगळुरू

इराण मधले बाजार हा एक अत्यंत खास प्रकार आहे.  हे बाजार मोकळ्यावर मांडलेले नाही, तर नीट बांधलेले असतात. आत जायला प्रवेशद्वार असतं आणि आत गेल्यावर उजवीकडे, डावीकडे नीट बांधून काढलेल्या उंच जोत्यांवर दुकानं असतात. बाजाराचं छत उंच आणि भिंती जाड असतात. उन्हाळ्यात हे बाजार थंड असतात आणि हिवाळ्यात उबदार. हा एक भूलभुलैय्या असतो. इथे कापडापासून सोनं, मसाले, गाद्या, उशा, थोडक्यात जे हवं ते सगळं एकाच ठिकाणी मिळतं. या बाजारात फिरणं आनंददायी असतं. तेहरानमधला बाजार ‘बाजार-ए-बुजुर्ग’ तर शिराझमधील बाजाराचं नाव ‘बाजार-ए-वकील’ असं आहे! तब्रिजमध्ये मी पाहिलेला बाजाराचा एक भाग तर हजार वर्षं जुना आहे. या ठिकाणी उत्तमोत्तम उंची गालिचे विक्रीला होते.

इराणमध्ये गालिचा नाही असं एकही घर दिसणार नाही.  विविध आकाराचे, रंगसंगतीचे, वेगवेगळी चित्रं, नक्षीकाम असलेले गालीचे प्रत्येक घरात आढळतात. ज्या घरात आम्ही भाड्याने राहत होतो तिथेही घरमालकांनी दिलेले सुंदर गालिचे होते. कॅरवान, सराई आणि हमाम हे तीन शब्द ऐकले नाही तर आपण इराणला गेलोच नाही असं समजावं इतके हे तीन शब्द इराणी माणसाच्या आणि तेथील संस्कृतीच्या जिव्हाळ्याचे आहेत. त्यातील कॅरवान आणि सराई हे अनेकदा ‘कॅरावानसराई’ असे एकत्र एका शब्दासारखेच म्हटले जातात. पूर्वीच्या काळी व्यापारउदीम करत दिवसभर मैलोनमैल अंतर मजल-दरमजल करत तुडविणारे व्यापारी, त्यांचा माल आणि सामान वाहून आणणारे त्यांचे उंट यांना सुरक्षित ठेवण्यासाठी या कॅरावान सराया. वाळवंटातील हवा अतिशय उष्ण आणि अतिथंड. तिथे होणारी वाळूची वादळंही तीव्र स्वरुपाची असतात. कॅरवान सरायांमध्ये या सगळ्यापासून संरक्षण मिळतं.  

इराणचे हमामही प्रसिद्ध आहेत. व्यापारउदीम करणाऱ्या माणसांना आंघोळ करून ताजंतवानं व्हायला मिळावं यासाठी केलेली सोय म्हणजे हे हमाम. पण शिराझ, इस्फाहान, तब्रिजमधले हमाम खरोखरच पाहण्यासारखे आहेत. गरम पाणी, मालिश, पाण्यात सुवासिक अत्तरं.. असा सगळा आलिशान कारभार असलेले हे हमाम म्हणजे त्या काळचे ‘स्पा’ होते. प्रचंड मोठ्या हवेलीसारखे भासणारे भव्य हमाम. ३००-४०० वर्षांपूर्वीचा विचार केला तर डोंगराळ भागातून  मालाची ओझी वाहणारे उंटांचे तांडे आणि त्यांच्याबरोबर प्रवास करणारे व्यापारी डोळ्यासमोर येतात. 

या थकवणाऱ्या प्रवासानंतर हे हमाम आंघोळीसाठी त्यांना किती उपयोगी पडत असतील! थकल्या भागलेल्या व्यापाऱ्यांना, मजुरांना आणि कष्टकऱ्यांना त्यातून किती विसावा मिळत असेल याची कल्पना केली तरी त्या काळच्या माणसाचं आणि त्याच्या कल्पनाशक्तीचं कौतुक वाटतं. कॅरवान, सराया आणि हमाम हा इराणच्या इतिहास आणि संस्कृतीतला एक अविभाज्य भाग आहे.  अनेक अडचणींवर मात करत व्यापार उदीम करणारा चिवट माणूस त्यात दिसतो. माझ्या इराणमधील वास्तव्यात मी पाहिलेला, आता अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेला वाटाघाटींमध्ये जेरीस आणणारा इराणी माणूस असा का, याचं उत्तर त्या विजिगीषू वृत्तीत आहे, हे मनोमन उमगतं. 
    snehasanjayketkar@gmail.com

Web Title : ईरान के हलचल भरे बाज़ार, कारवां सराय और हमाम: एक सांस्कृतिक यात्रा

Web Summary : ईरान के बाज़ार, कारवां सराय और हमाम इसकी समृद्ध इतिहास को दर्शाते हैं। बाज़ार अनूठी वास्तुकला के भीतर विविध सामान प्रदान करते हैं। कारवां सराय व्यापारियों के लिए सुरक्षा प्रदान करते थे। हमाम, शानदार स्नानागार, विश्राम प्रदान करते थे। ये स्थल ईरानी लचीलापन और सांस्कृतिक विरासत को प्रकट करते हैं।

Web Title : Iran's Bustling Bazaars, Caravanserais, and Hammams: A Cultural Journey

Web Summary : Iran's markets, caravanserais, and hammams showcase its rich history. Bazaars offer diverse goods within unique architecture. Caravanserais provided safety for traders. Hammams, luxurious bathhouses, offered respite. These sites reveal Iranian resilience and cultural heritage.

टॅग्स :Iranइराण