राज्यातली चूक भाजपाने नाशिक महापालिकेत दुरुस्त केली अन् 'राज'कीय किमया झाली!

By किरण अग्रवाल | Published: November 22, 2019 02:10 PM2019-11-22T14:10:05+5:302019-11-22T15:34:17+5:30

नाशिक महापौरपदासाठी देखील महाशिवआघाडी आकारास येऊन विद्यमान भाजपच्या सत्तेला शह दिला जातो की काय अशी चर्चा होत होती.

BJP fixes mistake in Nashik Municipal Corporation | राज्यातली चूक भाजपाने नाशिक महापालिकेत दुरुस्त केली अन् 'राज'कीय किमया झाली!

राज्यातली चूक भाजपाने नाशिक महापालिकेत दुरुस्त केली अन् 'राज'कीय किमया झाली!

Next
ठळक मुद्देविधानसभेतील चूक टाळण्यात आल्यानेच नाशिक महापालिकेतील सत्ता भाजपला राखता आली आहे.मनसेनं भाजपाला साथ दिल्यानं वेगळाच नाशिक पॅटर्न पुढे येऊन गेला आहे.स्वकीय व जुन्या निष्ठावंतास उमेदवारी दिली गेल्याने त्यांची बिनविरोध निवड होणे शक्य झाले.

>> किरण अग्रवाल

निष्ठावंतांना डावलून परपक्षीयांना कडेवर घेण्याचा प्रकार गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अंगलट आल्याचे पाहता ती चूक महापौरपद निवडणुकीत टाळण्यात आल्यानेच नाशिक महापालिकेतील सत्ता भाजपला राखता आली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही भाजपला साथ दिल्याने सद्य राजकीय स्थितीत वेगळाच नाशिक पॅटर्न पुढे येऊन गेला आहे.

नाशिक महापालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेवक भाजपचे सतीश कुलकर्णी तर उपमहापौरपदी भिकुबाई बागुल बिनविरोध निवडले गेले आहेत. राज्यातील सत्तास्थापनेच्या समीकरणामुळे नाशिक महापौरपदासाठी देखील महाशिवआघाडी आकारास येऊन विद्यमान भाजपच्या सत्तेला शह दिला जातो की काय अशी चर्चा होत होती, परंतु अति महत्त्वाकांक्षेमुळे काँग्रेसच्या नगरसेवकांनी या आघाडीत बिघाडी केली आणि भाजपचा मार्ग मोकळा झाला. विशेष म्हणजे भाजपचे बंडखोर नगरसेवक ऐनवेळी पुन्हा स्वकीयांना येऊन मिळालेच, परंतु गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत केंद्रातील व राज्यातील विद्यमान भाजपच्या सत्तेविरुद्ध प्रचाराची मोहीम राबविलेल्या राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षानेही भाजपला साथ दिल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपामनसेच्या सामीलकीचा नवा नाशिक पॅटर्न या निमित्ताने पुढे आलेला दिसून आला.

राज्यातील सत्तेची दावेदारी भक्कम करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत अन्य पक्षातून आलेल्यांना आमदारकीची तिकीटे दिली गेल्याने मतदारांनी भाजपाला सत्तेपासून काहीसे लांब ठेवल्याचे दिसून आले आहे, असे असतांना नाशिकच्या महापौरपदासाठीही पर पक्षातून आलेल्यांनाच उमेदवारी देण्याचे घाटत होते. त्यादृष्टीने काही नावेदेखील चर्चेत आली होती, त्यामुळे भाजपतील संभाव्य बंडाळी व महाशिवआघाडीकडून मिळू शकणारा शह लक्षात घेता महापालिकेत भाजपाचे स्पष्ट बहुमत असतानाही या पक्षाच्या नगरसेवकांना गोवा येथे सहलीवर नेण्यात आले होते. भाजपा नेते व माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तेथे नगरसेवकांची मते जाणून घेतली असता स्वकीयालाच प्राधान्य देण्याची भूमिका अनेकांनी बोलून दाखविली होती. बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना किंवा यापूर्वी विविध पदे उपभोगलेल्यानाच पुन्हा संधी दिली तर मतदानास न जाता घरी जाण्याची धमकीदेखील काहींनी यावेळी दिल्याचे बोलले गेले, त्यामुळेच भाजपने अगोदर पुढे केलेली काही नावे बाजूला ठेवून अखेरीस पक्षाचे निष्ठावंत व जुने जाणते कार्यकर्ते सतीश कुलकर्णी यांच्या नावावर मान्यतेची मोहोर उमटवली व त्यांची बिनविरोध निवड घडून आली. खरेतर गेल्यावेळी म्हणजे अडीच वर्षांपूर्वी स्पष्ट बहुमत मिळवून भाजप महापालिकेत निवडून आली असतानाही या पक्षाला बिनविरोध महापौरपद निवडता येऊ शकले नव्हते, परंतु स्वकीय व जुन्या निष्ठावंतास उमेदवारी दिली गेल्याने त्यांची बिनविरोध निवड होणे शक्य झाले.

राज्यातील सत्तास्थापनेसाठी महा आघाडी आकारास आली असली तरी अजूनही सत्ता स्थापनेचा दावा केला न  गेल्याने त्याबाबतची संभ्रमावस्था नाशकातील महापौरपदाच्या निवडी प्रसंगी स्थानिक नेत्यांना संभ्रमित करून गेल्याचेही दिसून आले. काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडे नाशिक महापालिकेत समसमान सहा इतके संख्याबळ आहे, परंतु वरिष्ठ स्तरावरून फारसा हस्तक्षेप न झाल्याने काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक उपमहापौर पदासाठी आग्रही राहिले व त्यामुळे महापालिकेसाठी महाआघाडी होता होता राहिली. त्यामुळेही भाजपचा मार्ग सुकर झाला. शिवसेनेच्या उमेदवार निश्चितीचा विलंबही यामध्ये कारणीभूत ठरला. या सर्व राजकीय धबडग्यात माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः लक्ष पुरवून भाजपच्या नगरसेवकांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे निष्ठावंतास उमेदवारी देऊन एकत्र ठेवण्यात यश मिळविले आणि नाशिक महापालिकेतील भाजपची सत्ता दुसर्‍या आवर्तनातही कायम राखण्यात या पक्षाला यश लाभले. 

अर्थात नाशिक महापौर व उपमहापौरपद भाजपला राखता आले असले तरी, भाजपच्या वरिष्ठांना मनमानी न करू देता निष्ठावंतांनी ताळ्यावर आणलेलेच यानिमित्ताने दिसून आले. शिवाय मनसे-भाजप बरोबर राहिली, त्यामुळे यापुढील काळात राज्यस्तरावर राज ठाकरे यांची भूमिका वेगळी कलाटणी घेते की काय असा प्रश्न पडणेही स्वाभाविक ठरून गेले आहे.

Web Title: BJP fixes mistake in Nashik Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.