Bharat Jodo Yatra: तपस्या, साधना आणि विचारमंथनाची यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 05:49 AM2023-02-01T05:49:41+5:302023-02-01T05:50:18+5:30

Bharat Jodo Yatra: गौतम बुद्धांपासून महात्मा गांधींपर्यंत प्रत्येकच यात्रा बुद्धीपेक्षाही जास्त मनाची आणि विचारांची यात्रा होती. भारत जोडो यात्रेमागेही हेच उद्दिष्ट होते.

Bharat Jodo Yatra: A Journey of Penance, Sadhana and Contemplation | Bharat Jodo Yatra: तपस्या, साधना आणि विचारमंथनाची यात्रा

Bharat Jodo Yatra: तपस्या, साधना आणि विचारमंथनाची यात्रा

Next

- योगेंद्र यादव
(अध्यक्ष, स्वराज इंडिया,सदस्य, जय किसान आंदोलन)

पाच महिन्यांत देशातले ३७०० किलोमीटर अंतर पार करून शेवटी ‘भारत जोडो’ यात्रेतून काय मिळणार आहे? - ७ सप्टेंबरला कन्याकुमारीमध्ये पावसात भिजत यात्रा सुरू झाली तेव्हा सर्व यात्रेकरूंच्या मनात हा प्रश्न  होता; परंतु गांधी पुण्यतिथीच्या दिवशी श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असताना यात्रेची समाप्ती झाली तेव्हा त्याचे उत्तर मिळालेले होते. आपल्या परंपरेत कोणतीच यात्रा केवळ रस्त्यावरचे अंतर कापण्यासाठी होत नसते. केवळ फिरणे हा यामागचा उद्देश नसतो. गौतम बुद्धांपासून महात्मा गांधींपर्यंत प्रत्येकच यात्रा बुद्धीपेक्षाही जास्त मनाची आणि विचारांची यात्रा होती. शरीराचा संचार देश आणि समाजाला जागे करण्याचे माध्यम असतो. भारत जोडो यात्रेमागे हेच उद्दिष्ट होते. ही शारीरिक तपस्येच्या माध्यमातून मनाची साधना आणि विचारमंथन घडवणारी यात्रा होती.

यात्रेतील शारीरिक तपस्या; म्हणजे शरीर पातळीवर कोणते हाल झाले हे समजून घ्यायला देशाला वेळ लागेल. लोकांना राहुल गांधी यांचा टी शर्ट दिसला; पण त्या संपूर्ण प्रयत्नाच्या मागे शेकडो, हजारो लोकांनी जी तपस्या केली ती त्यांच्या लक्षात अद्याप आलेली नाही. दररोज २० ते २५ किलोमीटर पायी चालणे, वेगवेगळे ऋतू अंगावर घेणे, सर्व प्रकारच्या अडीअडचणी, समस्या यांचा सामना करत पुढे जाणे, काही सोपे नव्हते.

या यात्रेने देशाचा प्रत्येक प्रदेश पाहिला. प्रत्येक प्रकारचे ऋतू पाहिले. भयंकर हाडे गोठवणारी थंडी, मुसळधार पाऊस आणि शेवटी मोठी बर्फवृष्टी. या यात्रेमध्ये सामील झालेल्यांत मीही होतो. प्रत्येक यात्रेकरूचे पाय सोलून निघाले. वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांनी त्यांना बेजार केले. हाडे गोठवणारी थंडी आणि तंबूंमध्ये गळणारे पावसाचे पाणी या सगळ्याचा मी साक्षीदार आहे. या शारीरिक तपस्येतूनही यात्रेला जो संदेश द्यायचा होता त्याच्या खरेपणाची साक्ष पटते. सामान्यत: राजकीय कार्यक्रमाकडे ज्या पद्धतीने पाहिले जाते तसा हा नाही अशी श्रद्धा लोकांच्या मनात या यात्रेने निर्माण केली. दैनंदिन स्वरूपात हालअपेष्टा सहन कराव्या लागल्याने यात्रेकरूंतही अगदी आतून बदल झाला. खऱ्या अर्थाने त्यांना ‘भारत जोडो’चे संदेशवाहक केले.

या पदयात्रेबरोबरच एक विचारांची यात्राही चालत राहिली. स्वतः राहुल गांधी या विचारांचे प्रमुख वाहक, उद्घोषक होते. ‘नफरत के बाजार में मुहब्बत की दुकान खोलने आया हूं’ हे त्यांचे वाक्य एखाद्या सिनेमातील संवादासारखे लोकप्रिय झाले आहे. श्रीनगरमध्ये यात्रेच्या समाप्तीच्यावेळी त्यांनी जे भाषण केले, त्यातूनही हेच दिसले. भले तुम्ही याला ‘गंगाजमनी’ परिभाषा किंवा ‘कश्मीरियत’ म्हणा, संत परंपरेने ही शिकवण दिली म्हणा किंवा महात्मा गांधींनी, आपली सांस्कृतिक परंपरा तोडण्याची नाही, जोडण्याची आहे. आपल्या घटनेमध्ये प्रस्तावनेतच उल्लेखले गेलेले बंधुत्व याचेच द्योतक आहे. आजी आणि पित्याच्या हत्येच्या वेळी त्यांना आलेल्या दूरध्वनीचा उल्लेख करून राहुल गांधींनी अत्यंत मार्मिक शब्दात यात्रेचे उद्दिष्ट सांगितले. भविष्यात असा दूरध्वनी कुठल्याही मुलाला येऊ नये यासाठी ही यात्रा असल्याचे त्यांनी सांगितले. द्वेष, हिंसा आणि भयाच्या राजकारणाविरुद्ध हे अर्थपूर्ण वक्तव्य होते.

मैत्रीच्या या भावनेबरोबरच भारत जोडो यात्रेने वारंवार समतेचेही दर्शन घडवले. देशात विषमता वाढते आहे याकडे मुख्य राजकीय प्रवाहाने खूप काळानंतर लक्ष वेधले. कदाचित पहिल्यांदाच कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याने अदानी आणि अंबानी यांचे नाव घेण्याची हिंमत दाखवली. दलित, आदिवासी, मागासवर्गीय यांना न्याय देण्याची कळकळ शाब्दिक खेळाच्या पलीकडे नेऊन काही ठोस अशा प्रस्तावातून व्यक्त झाली. स्त्रिया आणि लैंगिक भेदभावाची शिकार झालेल्या सर्व वर्गांची पीडा यात्रेच्या प्रत्येक पावलावर व्यक्त होत होती. वेदनेचे वेदनेशी नाते जोडणारी ही विचार यात्रा वैचारिक दिशेने जाण्यात सफल झाली. ही दिशा अजिबात नवी, अनोळखी नाही. आपल्या घटनेमध्ये उल्लेखलेल्या भारताच्या स्वधर्माला एका नव्या संदर्भामध्ये या दिशेने उद्धृत केले. शरीर आणि विचारांच्या यात्रेच्या पुढे जाऊन भारत जोडो यात्रा मनाचीही यात्रा होती. आपल्याकडे पदयात्रा हा मनाच्या साधनेसाठी सर्वात सोपा मार्ग मानला गेला. या यात्रेने देशामध्ये पसरलेली निराशा, असहाय्यता, एकटेपणा या सगळ्या गोष्टी झटकायला लावल्या. असत्य आणि द्वेषासमोर शस्त्र खाली ठेवलेल्या नागरिकांना पुन्हा हिम्मत दिली.

‘डरो मत’ या साध्या मंत्राने लाखो, करोडो हिंदुस्थानी लोकांना मनाची शक्ती दिली. काश्मीर खोऱ्यात यात्रेला लोकांकडून अपार स्नेह मिळाला. त्यातून देशात एक नवी आशा संचारण्यास मदत झाली. ही केवळ राहुल गांधी किंवा काँग्रेस पार्टीसाठी नव्हे तर भारतासाठी एक शुभ वार्ता होती. असे म्हणतात की जग आशेवर चालते. कुठल्याही समाजासाठी आशा हे मोठे धन असते. आशेचा दिवा लावणे मोठे काम होय; परंतु आशा जिवंत ठेवणे हे त्यापेक्षाही मोठे काम आहे. या दृष्टीने पाहू, जाता जाता भारत जोडो यात्रेला जे अभूतपूर्व यश मिळाले, त्याने यात्रेत सामील झालेल्या प्रत्येक भारतीयाच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी टाकली आहे. ओसाड जमिनीवर या यात्रेने नांगर चालवला, पण आता त्या जमिनीवर पेरणी करणे, खतपाणी घालणे ही जबाबदारी येऊन पडली आहे. जोवर भारत जोडोमधला यात्री प्रत्येक दरवाजावर टकटक करत नाही, प्रत्येक मनापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत या यात्रेचा उद्देश सफल संपूर्ण होणार नाही. प्रत्येक भारतीय ज्या दिवशी असत्याला असत्य म्हणेल आणि द्वेष नाकारायला सुरुवात करील तेव्हा यात्रा सफल होईल. ही यात्रा श्रीनगरमध्ये समाप्त झालेली नाही, तर खऱ्या अर्थाने भारताला त्याच्या स्वधर्माशी पुन्हा जोडण्याची यात्रा सुरू झाली आहे.

Web Title: Bharat Jodo Yatra: A Journey of Penance, Sadhana and Contemplation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.