खरात सामाजिक विवेकशून्यतेचे प्रतीक, 'डर्टी पिक्चर'चा हा बट्टा पुसावाच लागेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 10:48 IST2026-03-28T10:46:22+5:302026-03-28T10:48:42+5:30
Ashok Kharat: हे कमी म्हणून की काय मंत्री नरहरी झिरवाळ यांची कथित वादग्रस्त व्हिडिओ क्लिप समोर आल्याने कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली.

खरात सामाजिक विवेकशून्यतेचे प्रतीक, 'डर्टी पिक्चर'चा हा बट्टा पुसावाच लागेल
अभिजित कुलकर्णी (निवासी संपादक, नाशिक)
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या खरात प्रकरणाचा दाह काही कमी व्हायला तयार नाही. उलट दिवसेंदिवस तो अधिकच असह्य होत चालला आहे. एका विकृत आणि अस्सल भोंदूबाबाच्या नावाखाली घडलेले शोषण, फसवणूक आणि त्यावरून राजकीय, प्रशासकीय, सामाजिक स्तरावर सुरू असलेला कुरघोडीचा खेळ हे समाजाच्या विवेकावर थेट आघात करणारे आहे. हे कमी म्हणून की काय मंत्री नरहरी झिरवाळ यांची कथित वादग्रस्त व्हिडिओ क्लिप समोर आल्याने कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली. कारण या सगळ्यांमध्ये एक धोकादायक ट्रेंड डोकं वर काढताना दिसतोय तो म्हणजे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या तमाम नाशिकची प्रतिमा मलीन करण्याचा. नाशिकला टार्गेट करण्याचा.
सोशल मीडियावर असो किंवा मुख्य प्रवाहातील चर्चामध्ये, 'हे नाशिकमध्ये वा नाशिकशी संबंधित लोकांकडनच घडते' असा एक सूर नकळत किंवा कधी जाणीवपूर्वक पेरला जातो आहे. हीच गोष्ट थांबविणे आज अत्यंत गरजेचे आहे.
मुळात सत्य हे आहे की भोंदूपणा, बुवाबाजी आणि अंधश्रद्धा हा केवळ एखाद्या शहरापुरता वा ठिकाणापुरता मर्यादित रोग नाही. तो गावागावांत, शहरा-शहरात पसरलेला आहे. फरक इतकाच की कुठे तो उघडकीस येतो तर कुठे छुप्या पद्धतीने सुरू राहतो. उलट नाशिकमध्ये हा खेळ उघडकीस आला वा आणला गेला ही बाब अधोरेखित व्हायला हवी. कारण खरात अथवा नाशिक हा अपवाद नाही, तर संपूर्ण समाजाच्या विवेकशून्यतेचे उघडे झालेले एक वास्तव आहे.
यात सर्वात अस्वस्थ करणारा भाग आहे तो नाशिकमधील नेते, लोकप्रतिनिधींसह सगळ्याच क्षेत्रातल्या मिठाची गुळणी. मान्यवरांनी अपवादवगळता धरलेली खरातचे कारनामे बाहेर आल्यानंतर संपूर्ण राज्यभर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय पटलावर तर अगदी जोरकसपणे त्यावर हमरीतुमरी सुरू आहे. मात्र, नाशिकच्या एकूणच राजकीय आणि सामाजिक पटावर सारे कसे शांत शांत अशी स्थिती आहे.
हे केवळ अस्वस्थ करणारे नव्हे तर संताप आणणारेही आहे. कधी तरी आपणही खरातला भेटल्याची वा काही निमित्ताने संबंध आल्याची धास्ती तर या शांततेमागे नाही ना? फक्त राजकीय नेतेच नव्हे, तर नाशकात कधी काळी असलेले अथवा विद्यमान बऱ्याच अधिकाऱ्यांची नावेही खरातशी जोडली जात आहेत. हे अधिक गंभीर आहे. त्यामुळे एकुणातच संशयकल्लोळ वाढत आहे.
त्याहून आश्चर्य म्हणजे एरवी आंदोलने, मोर्चे, निवेदने यांत आघाडीवर असणाऱ्या संघटना, कार्यकर्तेही या विषयावर जवळपास शांतच आहेत. अपवाद म्हणावा तर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सातत्याने लढणारे कृष्णा चांदगुडे आणि त्यांचे सहकारी. पण एवढ्या मोठ्या सामाजिक प्रश्नावर फक्त काही मोजक्या आवाजांवर सगळा भार पडत असेल तर अजिबात योग्य नाही.
भोंदू खरातचे प्रकरण बाहेर येऊन दीड आठवडा उलटल्यानंतर आता तरी ही स्थिती झपाट्याने बदलायला हवी. कारण प्रश्न केवळ एका भोंदूबाबाचा नाही, तो नाशिकच्या प्रतिमेचा आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तर हा मुद्दा अधिकच संवेदनशील बनतो. जगभरातून येणाऱ्या भाविकांसमोर 'नाशिक म्हणजे भोंदूगिरीचे केंद्र' असा संदेश कदापि जाता कामा नये. पुण्यनगरी आणि एक सुसंस्कृत, संस्कारी, शांतताप्रिय शहर अशा नाशिकच्या सामाजिक-सांस्कृतिक वारशालाही असल्या भंपक प्रकरणामुळे धक्का बसायला नको.
नाशिक ही संतांची, विचारांची, परंपरेची भूमी आहे. येथे ज्ञान, अध्यात्म आणि विवेक यांची परंपरा आहे. येत्या काळात ही प्रतिमा जपण्याची जबाबदारी प्रत्येक नाशिककराची आहे. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी त्यांचे काम आतापर्यंत चोख बजावल्याचे दिसते.
एवढ्या 'वेल कनेक्टेड' आणि प्रभावशाली भोंदू खरातला अटक करून ज्या पद्धतीने त्याचा 'बालेकिल्ला' करत वरात काढण्यात आली त्यासाठी आयुक्त संदीप कर्णिक आणि त्यांच्या टीमला मार्क द्यायला हवेत. आता तपासाची सूत्रे एसआयटीकडे आहेत.
या पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांची प्रतिमा आणि अशी काही संवेदनशील प्रकरणे हाताळण्याचा त्यांना असलेला अनुभव ही बाबसुद्धा आशादायक आहे. पोलिस त्यांचे काम करतील, न्यायालय आपला मार्ग घेईल. पण, अशावेळी नाशिकचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या-त्या क्षेत्रांतील अग्रणींनी, इथल्या लोकप्रतिनिधींनी, सामान्य नाशिककरांनी स्वतःची स्पष्ट भूमिका घेतली नाही, तर ही लढाई अपुरीच राहील. आज गरज आहे ती सामूहिक भूमिका घेण्याची.
आखाडे, महंत, पुरोहित संघ, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना यांसह ज्यांचा समाजावर प्रभाव आहे, त्यांनी स्पष्टपणे पुढे येऊन सांगायला हवे की नाशिकमध्ये भोंदूपणाला, बुवाबाजीला कोणतीही जागा नाही. धर्माच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीला समर्थन नाही आणि जे कोणी असे प्रकार करतील, त्यांना खरात प्रमाणेच उघडे नागडे पाडले जाईल.
तितकीच जबाबदारी सामान्य नागरिकांचीही आहे. अशा अतिसंवेदशील विषयावर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना प्रत्येक शब्दाचा विचार दहा वेळा करायला हवा. केवळ टवाळी वा टाइमपासच्या दृष्टिकोनातून सोशल मीडियावर पिंका टाकण्यात धन्यता मानली तर अशा मस्करीतून नाशिकच्या प्रतिमेची कुस्करी व्हायला वेळ लागणार नाही.
काही विशिष्ट मानसिकतेच्या मंडळींकडून अजूनही यामध्ये खरातने कुणावर जबरदस्ती तर केली नाही वा तत्सम तारे तोडून अप्रत्यक्षपणे भोंदू खरातच्या कृत्याचे समर्थन केले जात आहे. श्रद्धेच्या नावाखाली कुणाच्याही मागे जाण्याऐवजी प्रश्न विचारण्याची, पुरावे मागण्याची आणि विवेक वापरण्याची वेळ कधीची येऊन ठेपली आहे. कारण भोंदूबाबांना ताकद मिळते ती त्यांच्या अंध 'भक्तांमुळे'. तिथून सुरू होणारी साखळी तोडली, तर अशा लोकांचे काळे साम्राज्य क्षणात कोसळू शकते. त्यामुळे नाशिकची बदनामी थांबवायची असेल, तर केवळ बचावात्मक भूमिका पुरेशी नाही.
ठाम, स्पष्ट आणि आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. 'हे आमच्याकडे होत नाही' असे म्हणण्यापेक्षा 'हे आम्ही होऊ देणार नाही' असे सांगण्याची हीच ती वेळ आहे. खरात प्रकरण हा एक बट्टा आहे. तो पुसून नष्ट करण्यासाठी नाशिककरांनी एकजुटीने आणि ठामपणाने याच क्षणापासून कार्यरत व्हायला हवे.