- सुधीर गाडगीळ(ज्येष्ठ मुलाखतकार)
रॉय, शमशाद, आमीरबाईंपासून चित्रपट पार्श्वगायिकांचा दरबार भरलेला असताना, तुम्ही पार्श्वगायनाच्या क्षेत्रात उडी घेतलीत, तर तुम्हाला त्या वेळेला ताण नाही आला? - मी उडी मारली नाही, मला धक्का दिला. धक्का देऊन ढकललं मला. मला इच्छा नव्हती गाण्याची. गायचे मी. बाबांकडे शिकायचे, ओरडून ओरडून गायचे. फार मोठ्या आवाजात गायचे. दीदी मला म्हणायची, ‘इतकी ओरडून कशाला गातेस?’ मी म्हणायचे, ‘तुला ऐकायला जावं म्हणून!’ आणि खूप ओरडून गायचे. पहिल्यांदा फिल्म इंडस्ट्रीमध्ये गायला लागले तेव्हा गीता दत्त, शमशाद बेगम वगैरे दमदार गायिका होत्या आजूबाजूला. त्यानंतर एक चमकता सूर्य वर होता, लखलखत होता, लता मंगेशकर नावाचा! तिच्यासमोर उभं राहायचं आणि तिच्यासारखं नाही गायचं; आपली नवी तऱ्हा करायची, आपलं जीवन नवीन करायचं, आपल्या गाण्याची स्टाईल नवीन करायची. हे सगळं त्या वेळेला होत गेलं आणि त्यानंतर म्हणजे त्या वेळेला फार मुश्कील होतं गाणं. पण मी जमवलं ते.
दीदींबरोबर गाताना तुम्हाला ताण आला का कधी? - आम्ही दोन बहिणींनी काय केलं फिल्म इंडस्ट्रीमध्ये? - ‘राज्य केलं!’ एक टोक तिनं धरलं होतं, एक टोक मी धरलं होतं. मी सगळ्या तऱ्हेची गाणी गायची, ती एका स्टाईलची गाणी गायची. पण आमची इतकी मेहनत होती, ३/४ गाणी दिवसाला मी गायचे. सात गाण्यांचं माझं रेकॉर्ड आहे एक दिवसाचं, दुपारी दोन वाजता सुरू केलं. पहाटे चारपर्यंत. पुण्याच्या प्रभात स्टुडिओमध्ये. विथ लाईव्ह म्युझिशिअन. ‘बुगडी माझी सांडली गं’ हे त्या ७ गाण्यांतलं एक गाणं होतं.‘ए मेरे वतन के लोगो’, या गाण्याबद्दल खूप चर्चा चाललेली असते. काय नेमका प्रकार आहे हो हा? - फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. काही वेळेला देण्यात जी मजा असते, ती घेण्यात नाही. एखादी गोष्ट कोणाला आवडली, आपण सोडून द्यावी, त्याच्यामागे जाऊ नये आपण. जन्मभर जाऊ नये.
गाण्यामुळे इतर सर्व संकटं, अडचणी, मनस्ताप यांना तुम्ही तोंड देऊ शकलात, असं म्हणता येईल? - खरी गोष्ट आहे. १० वर्षांची असल्यापासून माईकपुढे आहे मी. आणि आतापर्यंत माईक सोडलेला नाहीये आणि सुटू नये. सुटला तर माझा जीव जावा त्याच्याबरोबरच. बस्स्! हीच इच्छा आहे. कारण इतकी दुःखं आली आयुष्यात... माझं आयुष्य दुःखानं भरलेलं आहे. आदळत आपटत झेपावणाऱ्या नदीसारखी धावत राहिले मी. घरातून बाहेर पडताना कसाही मूड असला तरी, स्टुडिओत पाय ठेवला की हसत सगळ्याला तोंड द्यायचं. लोकांना हसवायचं, आपण हसायचं आणि हसत हसत गायचं. कारण माझी सगळीच गाणी हसण्याची असायची.
आशाताई, तुम्हाला पुन्हा जन्म मिळाला, तर ?- मला आशा भोसलेच व्हायला आवडेल. या जन्मात राहिलेल्या गोष्टी मी त्या जन्मात नक्की पूर्ण करीन. शिक्षण कमी असल्यामुळे फार नुकसान झालं. पुढच्या जन्मात ती चूक सुधारीन. या जन्मात खूप गोष्टी कराव्याशा वाटल्या, पण जमल्या नाहीत, त्या सगळ्या गोष्टी मी पुढच्या जन्मात पूर्ण करीन... पण लग्न करणार नाही!तुम्ही पार्श्वगायनात जास्त रमलात, नाट्यसंगीत-शास्त्रीय गाण्याकडे दुर्लक्ष झालं का थोडं? - माझं सगळीकडेच दुर्लक्ष होत आलं. उगमाच्या ठिकाणी छोटी असलेली नदी हळूहळू मोठी होत जाते. नंतर तिचं पाणी कुठे पडतं, कुठे ठेचकाळतं, आदळतं, काय होतं तिच्या आयुष्यामध्ये, काही माहीत नसतं तिला. ती या खडकाला आपटते, तिकडे आपटते. उंचावरून स्वतःला झोकून देते. तिथूनही पुढे प्रवाहित होते. अशा वेळेस तिच्या शरीराला व्यथा जाणवेनाशा होतात. तिला फक्त माहीत असतं, आपल्याला ‘धावतं’ राहायचं आहे... वाहता वाहता समुद्रात जाऊन मिसळायचं आहे. शेवटच्या टप्प्यात नदी थोडी स्थिर होते. तिला माहिती असतं, आता समुद्र अगदी जवळ आलाय. माझं तसं झालंय. आता सगळं छान आहे. जेवढं म्हणून देवानं परीक्षा पाहायची, दुःख द्यायचं त्याची परिसीमा झालेली आहे. सध्या माझी चार मुलं आहेत. दोन नातवंडं, एक मुलगा आणि सून आहे. या मुलांनी सुख दिलं मला. खूप आयुष्य उपभोगलं, खूप
गरिबी बघितली, खूप पैसा बघितला, खूप दागिने-साड्या सगळं सगळं बघितलं. आता पुढे काय होणार? कधी कधी असं वाटतं, की आपण जगणार आहोत खूप, पण आपल्या हातात काहीच नसतं, हेपण तितकंच खरं. माझी दोन मुलं लवकर गेली. हे दुःख मी कसं पचवलं असेल? पण मी ते सहन केलेलं आहे. कधी कधी मी म्हणते, देवा तू किती आघात करशील माझ्यावर? काय चुकीचं केलं मी? फक्त गायले. मी कुणाचंही काही वाईट केलं नाही, मी कोणाच्याही भानगडीत पडले नाही, पैसा खाल्ला नाही, काही केलं नाही. मग का? कशाबद्दल? इतकी दुःखं का देतो देव मला? - पण त्याबरोबरच सुखही देतोच की तो. माझ्या गाण्यावर करोडो लोकांनी जीव ओवाळून टाकला, अतोनात प्रेम केलं... हे भाग्यच की माझं! माझ्यातला कलाकार जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत मी जिवंत आहे समजा. (राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सुधीर गाडगीळ यांच्या ‘उत्तुंग’ या पुस्तकातून साभार)
Web Summary : The singer recalls her journey in the film industry, facing challenges alongside legends like Lata Mangeshkar. Despite hardships and personal losses, her music brought joy and sustained her, finding solace in her art and family.
Web Summary : गायिका लता मंगेशकर जैसी दिग्गजों के साथ फिल्म उद्योग में अपनी यात्रा को याद करती हैं। कठिनाइयों और व्यक्तिगत नुकसान के बावजूद, उनके संगीत ने खुशी लाई और उन्हें बनाए रखा, कला और परिवार में सांत्वना मिली।