लेख: सुनेत्रा पवार यांना राजकारण जमेल का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:24 IST2026-02-06T11:22:58+5:302026-02-06T11:24:41+5:30
सुनेत्रा पवार यांच्याकडे कालपर्यंत पवार कुटुंबात दुय्यम भूमिकाच आलेली होती, आता त्या केंद्रस्थानी आल्या आहेत. अजितदादांच्या निधनानंतर त्या उपमुख्यमंत्री होत असताना काही जणांनी अशी शंका बोलून दाखविली की, पटेल-तटकरे बोलतील तशा त्या चालतील; पण तसे काहीही होणार नाही. असे ऐकले आहे की, इतर कोणापेक्षाही त्या त्यांचे पुत्र पार्थ यांचे अधिक ऐकतात आणि ते आईच्या खूप लाडाचेही आहेत. तसे असेल तर पार्थ यांच्याकडून अधिक परिपक्व वागणुकीची अपेक्षा आहे.

लेख: सुनेत्रा पवार यांना राजकारण जमेल का?
यदु जोशी
राजकीय संपादक,
लोकमत
सुनेत्रा पवार यांच्याकडे कालपर्यंत पवार कुटुंबात दुय्यम भूमिकाच आलेली होती, आता त्या केंद्रस्थानी आल्या आहेत. अजितदादांच्या निधनानंतर त्या उपमुख्यमंत्री होत असताना काही जणांनी अशी शंका बोलून दाखविली की, पटेल-तटकरे बोलतील तशा त्या चालतील; पण तसे काहीही होणार नाही. असे ऐकले आहे की, इतर कोणापेक्षाही त्या त्यांचे पुत्र पार्थ यांचे अधिक ऐकतात आणि ते आईच्या खूप लाडाचेही आहेत. तसे असेल तर पार्थ यांच्याकडून अधिक परिपक्व वागणुकीची अपेक्षा आहे. राजकारणात ते यापूर्वी अपयशी ठरले होते. लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या पराभवामुळे अजित पवार यांचे वा तेव्हाच्या एकत्रित राष्ट्रवादीचे राजकीय भवितव्य धोक्यात आलेले नव्हते. मात्र, आज अजितदादा नाहीत अशावेळी पार्थ यांनी काही चुका केल्या तर त्याचा फटका त्यांच्या आईला आणि पक्षालादेखील बसेल. आता आपली काय जबाबदारी असेल याचे आत्मचिंतन पार्थ यांनी केले असावे, अशी माफक अपेक्षा आहे.
गुरुची विद्या गुरुलाच
ही राष्ट्रवादी असो की ती; पवार नावाशिवाय चालूच शकत नाही. कारण पवार राष्ट्रवादीचे जन्मदाते आहेत आणि पक्ष त्यांच्याभोवती फिरतो. पवारांशिवाय राष्ट्रवादी म्हणजे आत्म्याशिवाय देह. सुनेत्रा पवार यांना दादा गेल्यानंतर चारच दिवसांत उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने आवश्यकच होता. आणखी चार-आठ दिवस घालवले असते तर उपमुख्यमंत्री कदाचित कोणी वेगळेच दिसले असते आणि पक्षाचेही अपहरण होण्याची शक्यता होती. ते कोण कसे करू शकते याचे अचूक भान पटेल आणि तटकरे या जुन्याजाणत्या शिष्यांना असल्याने त्यांनी सुनेत्रावहिनींचा शपथविधी करवून घेतला. अपहरणाची भीती ही कल्पना नसते; ती राजकारणात कायम सावलीसारखी असते. सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबालाही ही सावली दिसली असावी.
‘गुरुची विद्या गुरुलाच’ या न्यायाने अजित पवार गटातील नेत्यांनी वेगवान हालचाली केल्या. भाजपनेही त्यांना त्यासाठी पुरेपूर सहकार्य केले, कारण शरद पवार यांना दूर ठेवावे असे भाजपलाही वाटते. सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनाही राष्ट्रवादीच्या अपहरणाची भीतीयुक्त शंका असावी आणि म्हणूनच ते तत्काळ शपथविधी करण्यासाठी राजी झाले असावेत. सुनेत्रा पवार याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील. त्या बारामतीतून विधानसभा लढतील आणि त्यांच्या जागी त्यांचे पुत्र पार्थ हे राज्यसभेवर जातील असे नजीकच्या भविष्यातले चित्र दिसत आहे. पक्ष आणि सरकारमध्ये शीर्षस्थ नेतृत्व पवारांचेच असावे, अशी अजित पवार गटात सार्वत्रिक भावना आहे, ती न समजण्याइतपत पटेल, तटकरे हे अपरिपक्व नक्कीच नाहीत. म्हणूनच ‘आपण अजिबात राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही’, हे पटेल यांनी लगेच स्पष्ट करून गोंधळ संपविला.
तिकडच्या पाटील, इकडच्या पवार
सुनेत्रा पवार या माहेरच्या पाटील अन् सासरच्या पवार आहेत; यातच खूप काही आले. त्यांची राजकीय जाण उत्तम आहे. त्यांना सगळेच कळत नसले तरी बरेच काही कळते हे त्यांच्या आजवरच्या मुलाखतींमधून स्पष्टपणे जाणवते. पवारांच्या घरात तशा त्या बाहेरून आलेल्या (आणि त्यासाठी त्यांना हिणवलेही गेले) पण ज्या पवारांनी महाराष्ट्रातील हजारो लोकांना राजकीय आणि सामाजिक शहाणपण दिले त्यांच्या कुटुंबात ३७ वर्षे घालविल्यानंतर असे शहाणपण सुनेत्रा पवार यांच्यात येणे साहजिकच आहे. त्यांच्यातील हे शहाणपण दाखविण्याची संधी त्यांना आजवर मिळाली नव्हती, आता नियतीने ती त्यांना दिली आहे. राजकारणात त्या प्रचंड यशस्वी होतीलच अशी खात्री आज, आत्ता, ताबडतोब देता येत नाही; पण त्या सपशेल अपयशी ठरतील असेही नक्कीच वाटत नाही. शहाणपण हे फक्त भाषणातून येत नाही; ते कुटुंबात, अनुभवाने आणि शांत निरीक्षणातून तयार होते. पतीनिधनानंतर त्यांनी दाखवलेला संयम आणि न डगमगता उभे राहण्याची क्षमता हेच त्यांच्या राजकीय प्रवासाचे पहिले भाषण आहे. राजकारणात काही जण तलवारी घेऊन उतरतात, तर काही जण संयमाची ढाल घेऊन. सुनेत्रा पवार या ढालीच्या राजकारणातून पुढे जाताना दिसतात- आणि कधीकधी ढालच युद्ध जिंकते.
आपले खरे हितचिंतक कोण आहेत, हे जाणून घेत त्या पुढे जातील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. हितचिंतक म्हणजे तुमच्या हिताची नेहमीच चिंता करणारे... तुमचे हित होत असताना चिंताग्रस्त होणारे नव्हेत. अजितदादांचा वारसा त्या कसा चालवतात तेही महत्त्वाचे.
विलीनीकरण होईल तेव्हा होईल; पण अजितदादा हे काकांच्या पक्षातील लोकांनाही सांभाळून घ्यायचे; मनाचा तो मोठेपणा सुनेत्रा पवार दाखवतील का? एकत्रित राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रवादी आणि मराठ्यांचा पक्ष म्हटले जात असे. अजितदादा अल्पावधीतच हे दोन्ही शिक्के पुसत होते, ते सुनेत्रा पवार यांना पुढे न्यावे लागणार आहे. त्यांचे नेतृत्व अपयशी ठरले तर त्यांच्या पक्षातील काही जणांना जुन्या घराची आठवण होईल तर काही जण भाजपकडे झुकतील. काहींना आपल्याकडे ओढण्यासाठी एकनाथ शिंदे तयारच असतील. सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास सोपा नाही. आता कुठे त्यांची परीक्षा सुरू झाली आहे.