लेख: चीनमध्ये न्यूमोनियाची लाट अचानक का पसरली?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 09:53 AM2023-11-28T09:53:49+5:302023-11-28T09:54:40+5:30

pneumonia in China: तापाच्या रुग्णांची अचानक झालेली वाढ केवळ चीनमधेच का? आणि तीदेखील फक्त लहान मुलांमध्येच का?- हे प्रश्न जगासाठी काळजीचे आहेत!

Article: Why the sudden wave of pneumonia in China? | लेख: चीनमध्ये न्यूमोनियाची लाट अचानक का पसरली?

लेख: चीनमध्ये न्यूमोनियाची लाट अचानक का पसरली?

- सुवर्णा साधू
(चीनच्या राजकीय-सामाजिक अभ्यासक)

मागच्या आठवड्यात, अचानक परत एकदा चीनमध्ये कसल्या तरी तापाची साथ आली आहे, असे बातम्यांमध्ये झळकू लागले, तेव्हा  साहजिकच जगभरात खळबळ उडाली. चीन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण देशभरात पसरलेली न्यूमोनियाच्या रुग्णांची लाट. या लाटेचा फटका यावेळी प्रामुख्याने लहान मुलाना बसला आहे, हे विशेष! खचाखच भरलेली हॉस्पिटल्स, त्यांच्यासमोर लागलेल्या लांबच लांब रांगा आणि श्वास घ्यायला त्रास होतानाची लहान मुले यांचे व्हिडीओ अनेक वृत्तसंस्थांनी आपापल्या वाहिन्यांवर दाखवायला सुरुवात करताच आणखीन एका साथीच्या रोगाच्या शंकेने सगळेच घाबरून गेले.

जागतिक आरोग्य संघटनेने चीनकडे अधिक तपशीलवार माहितीची मागणी केली आहे; तसेच या रोगाचा आणि संसर्ग पसरण्याचा धोका कमी करण्याच्या उद्देशाने चीनने तातडीने काही कठोर पावले उचलावीत, असे आवाहन देखील केले आहे. २०१९च्या डिसेंबरमध्ये जेव्हा कोविड सुरू झाला, तेव्हा, तो इतक्या झपाट्याने वाढेल आणि इतका घातक ठरेल, असे कोणालाच वाटले नव्हते. आणि म्हणूनच आज चीन मायकोप्लाझ्मा संसर्गाच्या  उद्रेकाशी झुंजत असताना जागतिक आरोग्य संघटना चीनमधल्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. सर्दी-ताप, खोकल्याने सुरू झालेला हा आजार, संसर्गजन्य तर आहेच; पण त्याचा प्रभाव लहान मुलांवर अधिक होताना दिसतो आहे. चिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी एकूण बाधितांची संख्या जरी प्रसिद्ध केली नसली, तरी ही एक महामारीच आहे ज्यात मायकोप्लाझ्मा, RSV, एडेनोव्हायरस आणि इन्फ्लूएन्झा आदींच्या व्याधीजनक विषाणूंचा समावेश आहे, असे मात्र सांगितले आहे.

चीनच्या उत्तरी भागांमध्ये थंडी वाढली आहे. या दिवसांमध्ये बीजिंग आणि इतर उत्तरेतल्या शहरांमध्ये थंडीबरोबरच प्रदूषणदेखील वाढीस लागते आणि सामान्यतः या दिवसांमध्ये लहान-मोठे सगळ्यांनाच श्वसनाचा त्रास होतो; परंतु आत्ताची तापाची साथ वेगळी आहे. हा ताप जास्त करून लहान मुलांमध्ये पसरत असल्याने विशेष काळजीचा ठरला आहे. चीनमधील आरोग्य अधिकारी, या श्वसनाच्या आजाराच्या वाढीचा संबंध ‘कोविड-१९’दरम्यानचे निर्बंध कमी करणे आणि इन्फ्लूएन्झा, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि इतर बॅक्टेरियाचा संसर्ग अशा व्याधीजनक विषाणूंच्या पुनरुत्थानाशी जोडत आहे. 
बीजिंग सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे उपसंचालक आणि मुख्य महामारी विज्ञान तज्ज्ञ वांग छ्वॅन-यी यांच्या मते, तापमानात अचानक झालेल्या घसरणीमुळे, श्वसनाच्या संसर्गाची वाढ होते आहे. महत्त्वाचे म्हणजे, ते म्हणतात की, त्यांना कोणतेही नवीन व्याधीजनक विषाणू आढळले नाहीत. या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी मूलभूत खबरदारी घेण्याचा सल्ला चीनमधील जनतेला दिला गेला आहे. मास्कचा वापर आणि स्वच्छता या दोन त्यातल्या प्रमुख गोष्टी. (निदान आता तरी) कोणत्याही प्रवासी निर्बंधांची आवश्यकता नाही, असे सांगितले गेले आहे; पण तापाच्या रुग्णांची ही वाढ केवळ चीनमधेच का? आणि तीही फक्त लहान मुलांमध्येच का? हा प्रश्न उरतोच.

मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया हा एक जिवाणू आहे जो सामान्यत: सर्दी-खोकला-तापासारख्या लक्षणांसह संसर्गास कारणीभूत ठरतो. याला ‘Walking न्यूमोनिया’ असेही म्हटले जाते. कारण अनेकदा यासाठी हॉस्पिटलमध्ये भरती व्हायची गरज भासत नाही; पण लहान मुलांना याचा संसर्ग झाल्यास त्यांना न्यूमोनिया होण्याचा धोका जास्त असतो; तसेच फुफ्फुसांचे इतर विकारही जडू शकतात. एका अभ्यासात असेही दिसून आले आहे की, चीनमध्ये मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया जवळजवळ दोन वर्षांपासून कोविड प्रतिबंधक उपायांद्वारे कमी करण्यात आला होता; पण तो आता अचानक बळावला आहे. खरे तर सगळ्याच देशांनी कोविडच्या कडक निर्बंधांतून बाहेर पडल्यानंतर श्वसनरोगात अशीच वाढ अनुभवली आहे. तरीपण चीनमधेच हा उद्रेक का बरे होतो आहे? काही तज्ज्ञांच्या मते, चीनने कडक लॉकडाउनचे निर्बंध पाळत कोविड मृत्युदर लक्षणीयरीत्या कमी केला; पण यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत गेली. अनेक विषाणू हवेत असतात. आपण नियमित त्यांच्या संपर्कात येत असतो आणि त्याद्वारे आपली प्रतिकारशक्ती मजबूत होत जाते; परंतु तब्बल तीन वर्षे चीनमधल्या जनतेने, कडक निर्बंधांमुळे जवळपास घरात बसून काढली. परिणामी, विशेषतः लहान मुलांची, रोगप्रतिकारशक्ती कमी होत गेली आणि संक्रमणाची संवेदनक्षमता वाढीस लागली आणि म्हणूनच या रोगाचा अचानक झालेला उद्रेक चीनमध्ये दिसून येतो आहे.

- अर्थात हा कोविड किंवा कोविडचा ‘व्हेरीएंट’ नाही, असे जागतिक आरोग्य संघटना आणि चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अजूनतरी यामुळे कुठेही मृत्यू झाल्याचे बातम्यांमध्ये नाही; मात्र वेळीच नियंत्रण न केल्यास हा संसर्ग बळावू शकतो आणि लहान मुलांच्या शरीरावर त्याचा आजीवन वाईट परिणाम होऊ  शकतो. परिस्थिती गंभीर आहे आणि हा संसर्ग बाहेरच्या देशांमध्ये पसरणार नाही, यावर जागतिक आरोग्य संघटना लक्ष ठेवून आहे!
    suvarna_sadhu@yahoo.com

Web Title: Article: Why the sudden wave of pneumonia in China?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.