लेख: भटक्या कुत्र्यांची दहशत कधी अन् कशी संपणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:09 IST2025-11-17T12:07:26+5:302025-11-17T12:09:11+5:30
ठाण्यातील दिवा भागात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एक दोनवर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. मॉर्निंग वॉकला निघालेल्या पालिका महिला अधिकाऱ्यामागे भटकी कुत्री लागल्याचीही घटना घडली. भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. असे असले तरी भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे.

लेख: भटक्या कुत्र्यांची दहशत कधी अन् कशी संपणार?
ठाण्यातील दिवा भागात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एक दोनवर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. मॉर्निंग वॉकला निघालेल्या पालिका महिला अधिकाऱ्यामागे भटकी कुत्री लागल्याचीही घटना घडली. भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. असे असले तरी भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. रात्रीच्या वेळी कळपाने हे कुत्रे फिरत असल्याने एखादा तावडीत सापडलाच तर ते त्याचे लचके तोडतात. महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांसाठी विविध उपाय योजले जात आहेत; परंतु त्यांच्या या योजनांना अद्याप म्हणावा तितका प्रतिसाद मिळालेला नाही.
झोपडपट्टी असो वा आलिशान गृहसंकुले; भटक्या कुत्र्यांची दहशत कुठेही दिसते. टिटवाळा परिसरात एका बालिकेस भटक्या कुत्र्याने लक्ष्य केले होते. रात्र असो की दिवस; केव्हाही भटके कुत्रे हल्ले करतात. दुचाकी, चारचाकीच्या मागे लागणे, अंगावर धावून येणे, झुंडीने हल्ला करणे, लहान मुलांचा चावा घेणे अशा घटनांत वाढ झाली आहे.
२७ लाख लोकसंख्येच्या ठाण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या ५० ते ६० हजार आहे. महापालिकेने २००४ ते २०१९ पर्यंत ८ कोटी खर्चून ५८,५३७ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले. नंतर निर्बीजीकरणाची प्रक्रिया थांबली. दोन वर्षांपूर्वी ती पुन्हा सुरू झाली. २०२३ मध्ये ८,००६ आणि जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ४,३०५ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले. मागील वर्षी ७,४०९ भटक्या कुत्र्यांचे रेबीज लसीकरण झाले. आता पुन्हा लसीकरणाची मोहीम सुरू झाली. लसीकरण झाल्यावर भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात विशिष्ट रंगाचा पट्टा घातला जात आहे. मागील १० महिन्यांत १२,४६५ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतले आहेत.
रस्त्यावर उघड्यावर विकण्यात येणारे खाद्यपदार्थ, चायनीज स्टॉल, हॉटेल्स, ढाबे यांमध्ये रात्री उरणारे पदार्थ उघड्यावर टाकले जातात. या खाद्यपदार्थांमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर त्यांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. भटक्या कुत्र्यांना खायला देताना घ्यावयाच्या काळजीबद्दल जागरूकता निर्माण करणेही आवश्यक आहे.
ठाणे शहरात पालिकेचे एकमेव निवारा केंद्र
सार्वजनिक ठिकाणच्या भटक्या कुत्र्यांना हटवून निर्बीजीकरण, लसीकरण करूनच त्यांना निवारा गृहात सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करणे अवघड आहे. अनेक प्रमुख शहरांत प्राणी निवारागृहांची वानवा आहे. ठाणे शहरात वागळे इस्टेट परिसरात पालिकेचे एकमेव निवारा केंद्र आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या गुणाकार पद्धतीने वाढत आहे; परंतु निवारा केंद्रे मात्र शहरात नाहीत. आता कुठे त्यावर चर्चा सुरू झाली. ठाणे महापालिका आता प्रस्ताव तयार करणार आहे. डॉग शेल्टर उभारण्याची तयारी पालिकेने केली तरी ते प्रत्यक्षात केव्हा येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.