लेख: वडगाव तालुक्यात नवे काही घडत आहे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 08:59 IST2025-11-16T08:58:42+5:302025-11-16T08:59:55+5:30
Vadgaon Maval: एकेकाळी वाडी असलेले हे गाव स्वतंत्र अकरा हजार लोकवस्तीचे तालुका शहर झाले आहे.

representative Image
दिनकर गांगल,
वडगाव-मावळचे अजित देशपांडे आहेत तसे मितभाषी, समोरच्या माणसाचा मान राखणारे; परंतु ते बोलू लागले, की पुणे परिसरातील इतिहासप्रसिद्ध प्रगल्भतेची किरणे त्यांच्या तोंडून प्रकटू लागतात. त्याहून त्यांना असलेला सोस म्हणजे त्यांच्या ज्ञानसंशोधनाची माहिती दुसऱ्याला द्यावी असा. त्यासाठीही ते झटत असतात.
अजित यांची वाढ संस्कारशील कुटुंबात झाली. आजोबांनी घरातील गणपतीपूजेचा पंथ त्यजून, देहूला जाऊन तुकारामाचा वारकरी पंथ स्वीकारला. ते तेथेच राहू लागले. वडील शिक्षक होते - त्यांनी गावचे वतन सोडायचे नाही, म्हणून शिक्षकी पेशा टाकून ग्रामसेवकाची नोकरी पत्करली. त्यांनी मोठ्या कुटुंबाचा सांभाळ केला, पण त्याहून अधिक आनंदाने सार्वजनिक सेवेचे पद निभावले, गावात सुधारणा केल्या.
अजित यांचे शिक्षण-नोकरी धडपडत झाले. पन्नास वर्षांपूर्वी काळही अभावाचा होता.
अजित यांनी शालेय शिक्षण, कॉम्प्युटरचा कोर्स करून जुन्नर कोर्टात नोकरी पत्करली. वास्तविक, एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात गेलेला तो मुलगा, त्याची नोकरी सरकारी; पण अजित यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला. पुणे विद्यापीठातून तीन विषयांत पदव्युत्तर पदव्या मिळवल्या. त्याहून महत्त्वाचे म्हणजे शोभना गोखले, मंजिरी भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातन भारतविद्येचे सखोल धडे घेतले आणि नोकरीची एकवीस वर्षे झाली, तेव्हा स्वेच्छानिवृत्ती घेऊन अजित देशपांडे सर्ववेळ अभ्यास संशोधनाच्या मार्गाला लागले.
वडगाव-मावळ वाटते तळेगावचे उपनगर, पण एकेकाळी वाडी असलेले हे गाव स्वतंत्र अकरा हजार लोकवस्तीचे तालुका शहर झाले आहे. तेथे महादजी शिंद्यांनी इंग्रजांना पराभूत केले - जवळच दोन हजार वर्षांपूर्वीच्या कार्ले-भाजे लेण्यांपासून शंभर वर्षांपूर्वीच्या रवि वर्मा यांच्या छापखान्यापर्यंतचा इतिहास घडला. अजित देशपांडे गेली आठ वर्षे अशा साऱ्या खुणा जपण्याच्या मागे लागले आहेत. त्यांनी भाजे लेण्यांचा व्हिडिओ बनवला. संस्कृतीविषयक सत्तर लेख फेसबूकवर लिहून सर्वत्र पसरवले. ‘आपलं वडगाव’ नावाचा माहितीपर दिवाळी अंक प्रसिद्ध केला. रंगचित्रांचे परीक्षण हा त्यांचा आणखी एक छंद. ते जुनी, अभिजात रंगचित्रे मुलांना दाखवतात, स्वत: त्यांवर लिहितात, मुलांना लिहिण्यास प्रवृत्त करतात.
त्यांनी ‘मावळ विचार मंच’ या व्यापक व्यासपीठाच्या अंतर्गत, त्यासाठी ‘साहित्य-कला-संस्कृती मंडळ’ निर्माण केले आहे. त्यांनी परिसराची माहिती संकलित करण्यासाठी तीस जणांचा चमू जमा केला आहे - त्या लोकांचा विविधांगांनी विकास व्हावा म्हणून ते अनेक तऱ्हांचे धडे त्यांना देत असतात. अभिवाचन हा त्यातील एक मंत्र. त्यामुळे ती मंडळी वाचनास उत्सुक झाली. नृत्य-नाट्य-अभिनय हा दुसरा मंत्र. यामुळे शालेय मुलामुलींपासून सर्व पालकमंडळी सांस्कृतिक कार्यात गुंतू लागली. असे वेगवेगळे गट वडगावात कार्यमग्न असतात. खरे तर, असे कार्यक्रम शिक्षणसंस्थांशी निगडित समजले जातात. अजित देशपांडे यांच्या पुढाकाराने ते गावपातळीवर आले आहेत - वडगाव तालुक्यात नवजागरण घडत आहे!