लेख: २३ महिलांची यशोगाथा सांगणाऱ्या सावल्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 09:07 IST2025-11-16T09:06:22+5:302025-11-16T09:07:27+5:30
कथा कुणाच्या सांगाव्यात? खरं तर सर्वांच्याच सांगाव्यात. तटस्थपणे. न गुंतता. आपण आपल्या जडणघडणीनुसार कुणाच्या कथा सांगाव्यात हे निवडत असतो...

लेख: २३ महिलांची यशोगाथा सांगणाऱ्या सावल्या!
अक्षय शिंपी,
कथा कुणाच्या सांगाव्यात? खरं तर सर्वांच्याच सांगाव्यात. तटस्थपणे. न गुंतता. आपण आपल्या जडणघडणीनुसार कुणाच्या कथा सांगाव्यात हे निवडत असतो. सुरुवातीला नकळत आणि पुढे-पुढे जाणीवपूर्वकही. कथांनी आजवर ज्यांना ‘ब्र’ही उच्चारता आला नाही, अशांचा आवाज व्हावं. दबलेल्या, दडपून टाकलेल्यांचा आक्रोश उजेडात आणावा. किमान माझा कल तरी अशा कथांकडे आहे. म्हणूनच अंधारे कोपरे उजेडात आणणारं वाङ्मय मला खेचून घेतं, हाका मारून बोलावतं. असो.
पुरुषी वर्चस्वांच्या अनेक क्षेत्रांत स्त्रियांनीही आपल्या कर्तृत्वानं स्वतंत्र ठसा कायमच उमटवलेला दिसतो. सावित्रीबाई फुले यांनी आपलं बळ या देशातील स्त्रियांमध्ये पेरलं आणि आजवर बंदिवासात ठेवलेल्या स्त्रिया आपापला आवाज लावून आपल्या कथा स्वत: सांगू लागल्या. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार देऊन फुले दाम्पत्यानं देशोद्धारात मोठं योगदान दिलं.
आजवर ज्या स्त्रियांना ज्ञानार्जनाचा अधिकार नाकारला गेला होता, त्या आता ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा दुवा झाल्या. केवळ अन् केवळ पुरुषांचीच मक्तेदारी असलेल्या पुस्तक प्रकाशनसंस्थेच्या चालक-मालक, सर्वेसर्वा झाल्या. ‘गुटेनबर्गच्या सावल्या’ हे डॉ. प्रवीण घोडेस्वारलिखित पुस्तक भारतभरातील प्रकाशन संस्थांशी संबंधित असणाऱ्या २३ महिलांची यशोगाथा सांगतं. मूळ वृत्तपत्रातील स्तंभानं आता पुस्तकरूप घेतलं आहे.
जोहान गुटेनबर्ग याला मुद्रणकलेचा जनक मानलं जातं. त्याच्या वंशातील आणि फुले दाम्पत्याकडून ज्ञानाचा वसा अन् ध्यास घेतलेल्या, विविध वयोगटांतील, प्रांतांतील, भाषांतील स्त्रिया ज्ञानाच्या क्षेत्रात पाय रोवून कशा उभ्या आहेत, याबद्दलचं विवेचन या पुस्तकात आहे. अतिशय नेमक्या भाषेत त्यांची ओळख अन् कार्याचा आढावा या पुस्तकात येतो. अशा प्रकारचं दस्तऐवजीकरण मराठीत होणं, ही आवश्यक गोष्ट होती, जी या पुस्तकामुळे काही प्रमाणात पूर्ण होते.
या पुस्तकाला वंदना महाजनांनी लिहिलेली प्रस्तावना माहितीपूर्ण आहे. स्तंभाचं पुस्तकरूप करताना हे लेख भर घालून वाढवणं आवश्यक वाटलं. पुढल्या आवृत्तीत ते घडेल, अशी आशा बाळगता येईल. तरीही या पुस्तकामुळे प्रकाशनविश्वातल्या स्त्रियांची आवश्यक असणारी नोंद वाचकांपुढे येते, हे देखील पुरेसं आहे.