मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 06:48 IST2025-09-25T06:48:07+5:302025-09-25T06:48:54+5:30
क्रिकेट बोर्ड पैशाचे लोभी, म्हणाले, खेळा! खेळाडू खेळले! सरकार म्हणाले, मैदानावर मैत्री दिसता कामा नये... म्हणून ही नाटके झाली ! हे शुद्ध ढोंग आहे!

मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान सदस्य, स्वराज इंडिया
माझ्या बहुसंख्य देशबांधवांप्रमाणेच मीही क्रिकेटप्रेमी आहे. ओढाताण करणाऱ्या धावपळीतून थोडीशी उसंत मिळाली की, जमेल तेवढा वेळ मी सामने पाहतोच. निदान फोनवर तरी स्कोअर पाहून घेतो; पण यावेळच्या आशिया कप स्पर्धेतील भारत-पाक सामने मी मुळीच पाहिले नाहीत. इच्छाच झाली नाही. त्याबद्दल नंतर जे वाचले, त्याने तर उरली-सुरली इच्छाही मरून गेली.
माझ्या लहानपणी आम्ही राहायचो त्या गावात किंग काँग आला होता. त्याची फ्रीस्टाइल कुस्ती आयोजिली होती. प्रतिस्पर्ध्याचे नाव विसरलो. ते महत्त्वाचेही नाही. बरेच दिवस जाहिरात करत रिक्षा गावभर फिरत होत्या. सर्वत्र पोस्टर्स लावली गेली होती. आक्रस्ताळी, खुनशी वक्तव्यांचा रतीबच लागला होता. कधी किंग काँगची डरकाळी, कधी त्याच्या प्रतिस्पर्ध्याची! त्याला उचलून मैदानाबाहेर फेकणार. कच्चा खाऊन टाकणार. उत्सुकता शिगेला पोहोचली होती. शेवटी किंग काँगची कुस्ती पाहायला अख्खे शहर लोटले. व्हायचे तेच झाले. किंग काँगने आपल्या प्रतिस्पर्ध्याला चारीमुंड्या चीत केले. खेळ खल्लास! नंतर मात्र ही नूरा कुस्ती असल्याची चर्चा गावभर होत राहिली.
गैरसमज नको. आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाक सामने फिक्स केलेले होते, असे मला मुळीच म्हणायचे नाही. आपल्याला त्याची गरजच नव्हती. ‘आयपीएल’मुळे भारतीय क्रिकेट छोट्या-छोट्या शहरांतील प्रतिभाशाली खेळाडूंसाठी खुले झाल्यापासून आपला क्रिकेट संघ एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. क्वचित एखादा अपवाद वगळता अलीकडच्या काळात भारत-पाक सामना बव्हंशी एकतर्फीच होत आला आहे. जहीर अब्बास, इम्रान खान, जावेद मियाँदाद किंवा शाहिद आफ्रिदी असलेल्या पाक संघाबरोबरच्या सामन्यात असायची ती चुरस वा रंगत आता उरलेली नाही. पाकिस्तानी संघाला क्रिकेटमधील आपला प्रमुख प्रतिस्पर्धी मानणे भारतीय संघाच्या प्रतिष्ठेला शोभणारेही नाही.
मी आशिया कप स्पर्धेतील सामने न पाहण्याचे खरे कारण वेगळेच आहे. हा आता क्रिकेटचा खेळ राहिलेला नसून बाजार आणि सरकार या दोघांचा खेळ होऊ घातला आहे. क्रिकेटच्या आडून दुसरेच काही खेळ खेळले जात आहेत. बाजाराच्या अमर्याद नफ्याचा, सरकारच्या परराष्ट्र धोरणाच्या डावपेचांचा आणि भारतीयांना नकली राष्ट्रवादात गुंगवून सोडण्याचा खेळ क्रिकेटच्या मैदानावर आता मांडलेला आहे. भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल चाललेली चर्चा अगदी पहिल्या दिवसापासूनच निरर्थक होती. या सामन्यात भाग घेण्याच्या आवश्यकतेबाबत क्रिकेट बोर्ड करत असलेले युक्तिवाद आणि समर्थन बिनबुडाचे होते. आशिया कप म्हणजे वर्ल्डकप थोडाच? त्यात सहभागी न होण्याने असे काय बिघडले असते? आपापल्या राजकीय कारणांपायी कितीतरी देशांनी प्रत्यक्ष ऑलिम्पिकवरसुद्धा बहिष्कार टाकलेला आहे.
क्रिकेट बोर्डाचा हा स्वायत्त निर्णय होता असे म्हणणे तर अधिकच हास्यास्पद. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे अध्यक्ष भारतातील कोणत्या महनीय व्यक्तीचे सुपुत्र आहेत आणि बोर्डाचे इतरही पदाधिकारी कोणत्या मंत्र्याच्या बंगल्यातून निवडले जातात हे गुपित थोडेच आहे? हा सारा बाजाराचा खेळ आहे, ही वस्तुस्थिती लपवता कशी येईल? भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला जबरदस्त बाजारमूल्य आहे. सणासुदीचे दिवस जवळ आलेले असताना हा सामना टीव्हीवर आणि फोनवर दिसत असणे म्हणजे बाजाराला पर्वणीच. विशेषत: दोन्ही देशांतील बडे-बडे लोक आपापल्या देशापासून दूर, सुरक्षित अंतरावर बसून ‘देशभक्तीचा खेळ’ विनाजोखीम खेळू शकतात तेव्हा तर अधिकच बहर. या बाजूला भारताचे सैन्य. त्या बाजूला पाकिस्तानचे. स्वतःच्या केसालाही धक्का पोहोचू न देता युद्धाचा धुवाधार अनुभव. असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानातून आकाराला आलेल्या राष्ट्रवादाची एक स्वस्त, मस्त आणि सुटसुटीत आवृत्तीच!
दुसरीकडे या सामन्याच्या विरोधकांचा युक्तिवादही तोकडा. एकीकडे सरकार सांगते की, ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही, सर्व संबंध तोडले जात आहेत, अधिकृत व्हिसा घेऊन भारतात राहणाऱ्या पाक नागरिकांसुद्धा परत पाठवले जात आहे; पण बोर्डाच्या आणि टीव्ही चॅनल्सच्या नफेखोरीसाठी सामना भरवायला मात्र सरकारची हरकत नाही! - हे सरकारी ढोंगच! मात्र शत्रूबरोबर खेळण्याने आपल्या देशाचा अपमान होतो हा विरोधकांचा युक्तिवाद त्यांची रोगट मानसिकता दाखवतो. कला, खेळ आणि संस्कृती या गोष्टी असलेली नाती तोडण्याचे नव्हे, तर नवी नाती जोडण्याचे काम करत असतात. म्हणूनच दिलीपकुमार, पाकिस्तानी गायिका नूरजहाँचा सन्मान करतात किंवा नीरज चोप्रा अर्शद नदीम या आपल्या पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्याला गळामिठी घालतो तेव्हा ते दोघेही आपली भूमिका चोख बजावत असतात.
याउलट खेळाडू परस्परांशी हस्तांदोलन करायला नकार देतात तेव्हा त्यांची किंवा देशाची मान मुळीच उंचावत नाही. क्रिकेटच्या मैदानावर बंदूक चालवण्याची किंवा विमान पाडण्याची नाटके केली जातात तेव्हा क्रिकेट धारातीर्थी पडते. अर्थात याबद्दल खेळाडूंना दोष देणे अनाठायी ठरेल. ते क्रिकेटर आहेत, अभिनेते नव्हेत. त्यांना सांगण्यात आले त्यानुसार वागण्याचा ते प्रयत्न करत आहेत. बाजार म्हणाला खेळा. खेळाडू खेळले. सरकार म्हणाले की, खेळताना मैत्री दिसता कामा नये. त्यामुळे दोन्ही बाजूंचे खेळाडू शत्रुत्वाचे नाटक करत आहेत. म्हणून बिचाऱ्या खेळाडूंना किंवा त्यांच्या व्यवस्थापकांना नव्हे, तर त्यांच्या राजकीय ‘आकां’ना आपण याबाबत जाब विचारला पाहिजे.
yyopinion@gmail.com