लेख: नारायण मूर्ती यांचे '९-९-६' हे चिनी मॉडेल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 06:01 IST2025-11-19T06:00:00+5:302025-11-19T06:01:43+5:30
९-९-६ हे चिनी मॉडेल किंवा नियम माहीत आहे? याच मॉडेलच्या आधारे चीननं जगाच्या तुलनेत अतिशय वेगानं आपली प्रगती केली, आपला देश कुठल्या कुठे नेऊन ठेवला आणि आता तर अमेरिकेशीही तो टक्कर देण्याच्या स्थितीत आहे. इतका की चीनलाच आता जगाची एकमेव महासत्ता बनायचं आहे.

लेख: नारायण मूर्ती यांचे '९-९-६' हे चिनी मॉडेल !
९-९-६ हे चिनी मॉडेल किंवा नियम माहीत आहे? याच मॉडेलच्या आधारे चीननं जगाच्या तुलनेत अतिशय वेगानं आपली प्रगती केली, आपला देश कुठल्या कुठे नेऊन ठेवला आणि आता तर अमेरिकेशीही तो टक्कर देण्याच्या स्थितीत आहे. इतका की चीनलाच आता जगाची एकमेव महासत्ता बनायचं आहे.
चीनचा ९-९-६ हा नियम म्हणजे थोडक्यात सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत आठवड्याचे सहा दिवस काम! अलीबाबा, टेनसेंट, हुवावे, जेडी डॉट कॉम.. यांसारख्या चीनच्या बड्या टेक कंपन्यांनी हा नियम अनेक वर्षे पाळला. त्यातून त्यांनी आपली प्रगती साधली आणि प्रचंड प्रमाणात पैसाही कमावला. स्वत:ची प्रगती करतानाच त्यातून देशाचीही प्रगती साधली गेली.
९-९-६ या नियमाचा सरळसरळ अर्थ म्हणजे दररोज जास्त काम करा. जितकं काम करणं तुम्हाला शक्य आहे, तितकं करा. तसा हा नियम जुना. या नियमामुळे चीनमधील युवकांवर आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिशय ताण पडला. या ताणामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला. त्याविरोधात कर्मचारी न्यायालयात गेले आणि त्यामुळे २०२१ साली चीनच्या सुप्रीम कोर्टानं हा नियम बेकायदेशीर ठरवला. तरी आजही अनेक कंपन्या चोरून हा नियम पाळत असल्याचं दिसून आलं आहे.
आता हा नियम पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा देशात काम करण्याच्या तासांमध्ये वाढ करण्याबाबत सुतोवाच केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी चीनच्या ९-९-६ या मॉडेलचा उदाहरण म्हणून उल्लेख केला.
मूर्ती म्हणाले, ‘भारताला चीनसारखं वेगानं पुढं जायचं असेल तर युवकांनी आठवड्यात किमान ७२ तास काम करणं गरजेचं आहे. देशातील प्रत्येक नागरिक, सरकारी नोकर, अधिकारी आणि कॉर्पोरेट लीडर यांनी यासाठी मेहनत घेणं आवश्यक आहे. भारतानं आतापर्यंत चांगली आर्थिक प्रगती केली आहे, पण चीनच्या तोडीस तोड कामगिरी करायची तर आपल्याला आणखी खूप कष्ट घ्यावे लागतील. भारतीय युवकांनाही चीनसारखंच स्वत:ला वाहून घ्यावं लागेल.
नारायण मूर्ती यांच्या वक्तव्यावरून पुन्हा यासंदर्भात वाद आणि चर्चा झडण्याची शक्यता आहे. या आधीही नारायण मूर्ती यांनी तरुणांनी जास्त तास काम करण्याचा सल्ला दिला होता. २०२३ मध्ये त्यांनी युवकांनी आठवड्याला ७० तास तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी हे प्रकरण बरंच गाजलं होतं आणि सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक वादविवाद झडले होते. आठवड्याला ७० तास काम करणं अव्यवहार्य असल्याचं काहींनी म्हटलं होतं, तर काहींनी नारायण मूर्ती यांचं समर्थन केलं होतं.
२०२४ मध्ये नारायण मूर्ती म्हणाले होते, देशातील लोकांनी कामाबद्दल आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. देशाचे पंतप्रधान आठवड्याला १०० तास काम करतात, तेव्हा देशातील नागरिकांनीही भारताच्या प्रगतीसाठी अतिरिक्त तास काम करून तितकंच समर्पण दाखवायला हवं.स्वत:चं उदाहरण देताना नारायण मूर्ती म्हणाले होते, मी स्वत:ही आठवड्याला सहा दिवस, दररोज १४ तास काम केलं आहे. कामाचा आठवडा सहा दिवसांवरून पाच दिवसांचा केल्यावर मी निराश झालो होतो..