लेख: स्टेशनबाहेरच बदलून घ्या इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 08:14 IST2025-06-16T08:13:48+5:302025-06-16T08:14:51+5:30

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे स्थानकांवर इलेक्ट्रिक बाइक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.

Article: Change your electric bike battery outside the station! | लेख: स्टेशनबाहेरच बदलून घ्या इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी!

लेख: स्टेशनबाहेरच बदलून घ्या इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी!

महेश कोले, प्रतिनिधी: शाश्वत विकास आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे स्थानकांवर इलेक्ट्रिक बाइक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या काही निवडक स्थानकांपुरती मर्यादित असलेली ही सुविधा सर्व उपनगरीय स्थानकांवर उपलब्ध करण्यात येणार आहे. ही योजना केवळ पर्यावरणपूरक नव्हे, तर कार्यक्षम आणि शहरी वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडवणारी ठरणार आहे. तसेच रेल्वेच्या जागांचा योग्य वापर आणि रेल्वेच्या जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठीचा हा उपाय ठरणार आहे. 

केंद्र शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रेल्वे स्थानकांजवळच्या  नागरिकांना आणि रेल्वे प्रवाशांना उपयुक्त ठरणाने विविध उपक्रम पश्चिम रेल्वेकडून राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आता पश्चिम रेल्वेच्या सर्व स्टेशनच्या बाहेर इलेक्ट्रिक बाइक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. या योजनेमुळे इलेक्ट्रिक बाइक वापरकर्ते आता स्टेशनवर येऊन काही मिनिटांत आपली जुनी बॅटरी बदलून पूर्ण चार्ज झालेली नवीन बॅटरी घेऊ शकतील. ही प्रक्रिया मोबाइल ॲपच्या साहाय्याने पारदर्शक पद्धतीने पार पडेल. पश्चिम रेल्वेच्या या उपक्रमामुळे स्मार्ट लास्ट-माइल कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल, असे  प्रशासनाचे म्हणणे आहे. इलेक्ट्रिक बाइक बॅटरी चार्जिंग स्टेशनमुळे रेल्वेच्या जागांचा उत्तम वापर होईल. पारंपरिक चार्जिंगच्या तुलनेत ही सेवा जलद असेल. सामान्य बाइक वापरणाऱ्या नागरिकांना इंधन भरण्यासाठी वेळ आणि इंधनावर होणाऱ्या खर्चात बचत होईल.   

मोकळ्या जागांचा वापर 
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये ३७ उपनगरीय स्थानके आहेत. या स्थानकांनजीक रेल्वेच्या अनेक मोकळ्या जागा आहेत. वापराविना असणाऱ्या या जागांवर अनेकदा अतिक्रमणे होतात. ती हटवताना रेल्वे प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. या जागांचा योग्य वापर करण्याबरोबरच नागरिकांना उपयुक्त होईल या दृष्टीने प्रशासन इलेक्ट्रिक बाइक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन प्रकल्प राबवत आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. 

प्रथम सहा स्टेशनांवर सुविधा
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सहा महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन परिसरात बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये विरार, सांताक्रूझ, गोरेगाव, अंधेरी,  कांदिवली आणि बोरिवली या स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांजवळ असलेल्या रेल्वेच्या एकूण ६६७ चौरस फूट जागेत हे बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्यात येईल. 

कशी असेल सुविधा?
इलेक्ट्रिक दुचाकीस्वार आणि तीनचाकी वाहनधारक दोन मिनिटांपेक्षा कमी वेळात आपल्या वाहनाची संपलेली पॉवर पॅक ई-बॅटरीच्या जागी चार्ज झालेली बॅटरी बसवू शकतील. सर्व ई-स्वॅप युनिट्स सुरक्षा, तांत्रिक आणि पर्यावरणीय मानकांनुसार बसवले जातील. त्यामुळे सामान्य नागरिक, रेल्वे प्रवासी, डिलिव्हरी एजंट आणि फ्लीट ऑपरेटरसारख्या दैनंदिन ईव्ही वापरकर्त्यांची गैरसोय दूर होईल. 

Web Title: Article: Change your electric bike battery outside the station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.