शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आधी वंदू तुज मोरया - आरत्या म्हणजे मराठी भाषेतील भक्तिरसप्रधान काव्यमंदिरातील स्वतंत्र देवघर

By दा. कृ. सोमण | Updated: August 26, 2017 07:00 IST

आपल्या सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पाची पूजा झाल्यावर दररोज सकाळ संध्याकाळ आरत्या म्हटल्या  जातात. त्यावेळी तेथे जमलेल्या सर्वांचा त्यात सहभाग असल्याने त्यावेळी  चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण निर्माण होते

ठळक मुद्देआरती हा शब्द ' अरात्रिक ' या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे. अरात्रिक म्हणजे ओवाळणे ! देवांची जे स्तुतिपर गीते म्हणतात त्यानाही आरती असेच म्हणतात. आरत्यांमध्ये देवांचे वर्णन करून स्तुती केलेली असते आणि भक्तांच्या ऐश्वर्याची इच्छा प्रकट केलेली असते.

जय देव,जय मंगलमूर्ती !दु:खहर्ता वार्ता विघ्नाची ।नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।कंठी शोभे माळ मुक्ताफळांची ।।- समर्थ रामदास

             आपल्या सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पाची पूजा झाल्यावर दररोज सकाळ संध्याकाळ आरत्या म्हटल्या  जातात. त्यावेळी तेथे जमलेल्या सर्वांचा त्यात सहभाग असल्याने त्यावेळी  चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण निर्माण होते. आबालवृद्ध बंधू भगिनी सारेच जण त्या भक्तिमय वातावरणात तल्लीन झालेले असतात. आता हेच पहा ना, " सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची " ही संत रामदासानी लिहीलेली आरती दरवर्षी आपण म्हणत असतो. परंतु प्रत्येक वेळी ती नवीन आनंद प्राप्त करून देत असते. कोणत्याही देवतेची पूजा असो, आरत्यांचा प्रारंभ होतो तो याच श्रीगणेशाच्या आरतीने !  ह. भ. प. श्री. ल. रा. पांगारकर यांनी " आरत्या म्हणजे मराठी भाषेतील भक्तिरसप्रधान काव्यमंदिरातील स्वतंत्र देवघर आहेत " असे म्हटले आहे.            आरती हा शब्द ' अरात्रिक ' या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे. अरात्रिक म्हणजे ओवाळणे ! पूजेनंतर प्रज्वलित निरांजन तबकात ठेवून देवाना ओवाळण्याच्या विधीला आरती म्हणतात. देवांची जे स्तुतिपर गीते म्हणतात त्यानाही आरती असेच म्हणतात. आरत्यांमध्ये देवांचे वर्णन करून स्तुती केलेली असते आणि भक्तांच्या ऐश्वर्याची इच्छा प्रकट केलेली असते. आरतीची रचना साधी सोपी असते. परंतु त्यात महान भाव प्रकट केलेला असतो. आरत्यांमध्ये पाच सहाच कडवी असतात. सर्वसाधारणपणे आर्त्यांच्या ध्रुवपदात आरती, ओवाळणे आणि जयजयकार हे शब्द असतात. ज्या देवतेची आरती असते त्या देवतेची विविध नावे आरतीमध्ये गुंफलेली असतात.आरती हे एक गेय पद्य असते. विशेष म्हणजे आरतींमध्ये नादानुकारी आणि रसानुकूल शब्दयोजना केलेली असते. आरत्यांमध्ये आपल्या मनातील आर्त भाव - भक्ती प्रकट केलेली असते. आरतीच्या शेवटी ती रचना करणाराचे नाव गुंफलेले असते. त्यामुळे आरतीची रचना कुणी केली ते विचारावे किंवा लक्षात ठेवावे लागत नाही.आरती म्हणताना ते लगेच कळते.  आरतींच्या चाली अतिशय सुंदर असतात. त्यामुळे म्हणून म्हणून सहजपणे आरत्या पाठ होत असतात.                        आरत्यांचे प्रकार            आरत्यांचे अनेक प्रकार आहेत.  काकड आरती मंदिरात प्रांत:काळी म्हटल्या जातात.  शेजारती या मंदिरात रात्री म्हटल्या जातात. देवाला नैवेद्य अर्पण करताना नैवेद्यारती म्हटली जाते. आरतीच्यावेळी वापरण्यात येणार्या वस्तूंवरूनही आरतीना नावे देण्यात आलेली आहेत. दीप ओवाळताना म्हणावयाची ती दीपारती ! धूप ओवाळताना म्हणावयाची ती धूपारती ! कापूर ओवाळताना म्हणावयाची ती कर्पूरारती ! जाड्या वातीचा काकडा ओवाळताना म्हणावयाची ती काकडारती  अशाप्रकारे नावे देण्यात आलेली आहेत. केवळ देव देवतांच्याच आरत्या नाहीत तर तुलसी , वड इत्यादी वृक्षांच्याही आरत्या रचलेल्या आढळतात. सूर्य, चंद्र, शनी यांच्याही आरत्या रचलेल्या आहेत. सत्यनारायण, संकष्ट चतुर्थी यांच्याही आरत्या आहेत. गरूड, शेष नाग यांच्या तसेच बारा ज्योतिर्लिंगे, केदारनाथ , पंढरपूर या क्षेत्रांच्या,गंगा, गोदावरी , कृष्णा इत्यादी नद्यांच्या,भगवद्गीता,ज्ञानेश्वरी , भागवत, दासबोध इत्यादी ग्रंथांच्या, निवृत्ती , ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास , सिद्धारूढ स्वामी, अक्कलकोटचे स्वामी, गोंदवलेकर महाराज, गुरुदेव रानडे ,साईबाबा इत्यादी संतांच्याही  आरत्या रचलेल्या आहेत. मराठी भक्तिरस साहित्यातले '  आरती ' हे एक समृद्ध भांडार आहे.                    आरत्यांचे रचनाकार          आरत्यांचा इतिहास पाहतांना एक गोष्ट लक्षांत येते ती म्हणजे मराठी भाषेच्या आरंभापासून आरत्यांची रचना केलेली आढळते. इसवी सनाच्या बाराव्या शतकातील महानुभाव कवीनी प्रथम आरत्यांची रचना केल्याचे आढळून येते. नंतर ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ,तुकाराम, रामदास, गुरूचरित्रकार गंगाधर सरस्वती, दासोपंत, नरहरी, विष्णुदासनामा, त्र्यंबक कृष्णदास, रामा जनार्दन , विठा रेणुकानंद, कृष्णदास, अनंतसुत, मुक्तेश्वर, वामन रघुनाथ, श्रीधर, मोरोपंत, कृष्णदयार्णव , जगजीवन, परशुराम, तुका विप्र, मोरेश्वरसुत, निरंजन, महिपत, ठाकुरदास, मोरया गोसावी इत्यादी अनेक कवीनी आरत्यांची रचना केलेली आहे. एवढेच नव्हे,तर विशेष म्हणजे शेख महंमद या मुसलमान कवीनेही आरत्यांची रचना केलेली आहे. आत्तापर्यंत एकूण हजार तरी आरत्या तयार केलेल्या आहेत. आपणास त्या आरत्यांची तशी माहिती होत नाही कारण आरत्यांच्या पुस्तकात लोकप्रिय झालेल्याच आरत्या देण्यात येतात आणि त्याच सर्वत्र म्हटल्या जातात. खरं सांगायचं तर प्राचीन मराठी काव्य प्रकार ' ओवी ' हा कालप्रवाहात लुप्त होत चालला आहे. परंतु ' आरती ' हा काव्यप्रकार मात्र केवळ गणेशोत्सवामुळे टिकून राहिला आहे यांचे समाधान वाटते. या आधुनिक काळात राष्ट्रीय भावना जागृत राहण्यासाठी भारतमातेच्या आरत्यांची रचना होणे जरूरीचे आहे.                   घालीन लोटांगण !            आरत्या म्हणून झाल्यावर " घालीन लोटांगण, वंदीन चरण " हे भजन म्हणण्याची पद्धत आहे. या भजनाच्या वेगळ्या चालीमुळे आणि भक्तीपूर्ण आशयामुळे ते सर्वाना म्हणायला आवडते. पण आपणास वाटते त्याप्रमाणे या भजनाची रचना कुणा एका कवीने केलेली नाही. या भजनातील पहिले  कडवे  - " घालीन लोटांगण .... " हे संत नामदेवानी रचले आहे.  या भजनातील दुसरे कडवे " त्वमेव माता पिता त्वमेव... " हे शंकराचार्यांच्या गुरुस्तोत्रातील आहे. या भजनातील तिसरे कडवे  "कायेन वाचा .. " हे श्रीमद्भागवतातील आहे. चौथे कडवे " अच्युतं केशवं ..." हे शंकराचार्यांच्या अच्युताष्टकम् मधील आहे. आणि शेवटचे " हरे राम , हरे कृष्ण ..." हे उपनिषदामधील आहे  असे काही विद्वान पंडितांनी म्हटले आहे. पण एक गोष्ट मात्र नक्कीच मानली पाहिजे की ज्या कुणी हे सर्व एकत्र केले आहे त्याना आदरपूर्वक नमस्कार करायला पाहिजे कारण आरत्यांनंतर म्हटले जाणारे हे भजन अतिशय लोकप्रिय झाले आहे.           " घालीन लोटांगण " हे भजन झाल्यावर मंत्रपुष्पांजली किंवा पसायदान प्रार्थना म्हटली जाते. एक पथ्य मात्र सर्वानीच पाळले पाहिजे ते हे की आरत्या कधीही ओरडून म्हणू नयेत. त्या मधुर स्वरात म्हणाव्यात. त्या ऐकताना देवाबरोबर आपणासही आनंद झाला पाहिजे. आरत्या गोड वाटल्या पाहिजेत. त्यामधील भावार्थ लक्षात आला पाहिजे.               दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे आज विसर्जन होणार ! गणेशभक्त गणरायाला निरोप देणार ! प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून मातीच्या मूर्तीमध्ये देवत्व आणले जाते, आणि मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी उत्तरपूजेच्या मंत्रांनी देवत्व काढून घेतले जाते. दीड दिवसांचा गणपत्ती बाप्पाचा मुक्काम आपणास किती मोहून टाकतो. मूर्तीचे विसर्जन करून आल्यावर घर कसे ओके ओके वाटते याचा अनुभव तुम्हाला आला असेल. दीड दिवसांसाठी आलेल्या या प्रिय बाप्पाला निरोप देताना सहजच उद्गार बाहेर पडतात---- " गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या !"(दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक आहेत. त्यांचा ई-मेल आयडी dakrusoman@gmail.com )

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव