तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 07:36 IST2025-09-30T07:35:51+5:302025-09-30T07:36:14+5:30
आत्यंतिक वेदनेनं आणि छळानं या तरुणी जिवाच्या आकांतानं किंचाळत होत्या, रडत होत्या, आम्हाला जाऊ द्या, म्हणून विनवण्या करीत होत्या, हातापाया पडत आपल्या प्राणांची भीक मागत होत्या, पण ते पाषाणहृदयी ‘मित्र’ या छळाचा आनंद घेत होते.

तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्...
साधारण विशीतल्या तीन तरुणी. आपल्याला पार्टीला जायचंय म्हणून या तिघींना ‘निमंत्रण’ देण्यात आलं. त्यासाठी स्थळ नक्की करण्यात आलं. त्यांना घेऊन जाण्यासाठी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली. ठरलेल्या वेळी कुठे जमायचं ते त्यांना सांगण्यात आलं. पार्टीला बोलवणारे तरुणही परिचयाचे, ‘मित्र’ आपल्याच ‘गँग’मधले असल्यानं त्या तिघीही ठरलेल्या ‘स्टॉप’वर गेल्या. व्हॅनवाल्यानं त्यांना तिथून पिकअप केलं आणि ‘पार्टी’च्या ठिकाणी नेलं.
तिथे गेल्यावर या मित्रांनी आपल्या या तिन्ही मैत्रिणींना बेदम मारहाण केली. त्यांचा शारीरिक, मानसिक छळ केला. त्यानंतर त्यांची बोटं कापली, त्यांची नखं उपसली.
आत्यंतिक वेदनेनं आणि छळानं या तरुणी जिवाच्या आकांतानं किंचाळत होत्या, रडत होत्या, आम्हाला जाऊ द्या, म्हणून विनवण्या करीत होत्या, हातापाया पडत आपल्या प्राणांची भीक मागत होत्या, पण ते पाषाणहृदयी ‘मित्र’ या छळाचा आनंद घेत होते. हसत होते. या तरुणींचा छळ ‘एन्जॉय’ करीत होते. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. यानंतर त्या तीनही तरुणींचा त्यांनी गळा दाबून खून केला! क्रौर्याची परिसीमा म्हणजे इन्स्टाग्रामच्या पर्सनल अकाउंटवरून त्याचं लाइव्ह स्ट्रिमिंगही केलं! अनेकजण ही घटना ‘लाइव्ह’ पाहत होते. या व्हिडीओत मित्रांच्या या गँगचा लीडर म्हणतोय, ‘गँगचा नियम तोडल्याची ही शिक्षा! जो माझे ड्रग्ज चोरेल, त्याचा अंजाम असाच होईल!
गेल्या आठवड्यात अर्जेंटिनात घडलेल्या या घटनेनं केवळ तो देशच नव्हे, अख्खं जग हादरलं आहे. या घटनेच्या विरोधात अर्जेंटिनात आता हजारो लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करीत आहेत. मारेकऱ्यांना तातडीनं फासावर लटकवा म्हणून सरकारला त्यांनी धारेवर धरलं आहे.
ज्या तरुणींचा खून करण्यात आला, त्यातल्या ब्रेंडा डेल कास्टिल आणि मोरेना वेर्दी या विशीतल्या तरुणी सख्ख्या चुलत बहिणी होत्या, तर तिसरी लारा गुटिएरेज १५ वर्षांची होती. हजारो नागरिक आणि पीडितांच्या कुटुंबीयांनी ‘ब्रेंडा, मोरेना, लारा’ असं लिहिलेले बॅनर आणि त्यांच्या फोटोंचे पोस्टर घेऊन राजधानी ब्युनोस आयर्समध्ये थेट संसदेपर्यंत धडक मारली. तरुणींना ठार मारल्याचा हा व्हिडीओ आम्ही इन्स्टाग्रामवर ‘लाइव्ह’ पाहिला असं अनेकजण छातीठोकपणे सांगत असले तरी इन्स्टाग्रामची पॅरेंट कंपनी ‘मेटा’नं मात्र यासंदर्भात कानावर हात ठेवले आहेत.
त्यांचं म्हणणं आहे, आमच्या प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारच्या लाइव्ह स्ट्रीमचा कोणताही पुरावा नाही! मुलीच्या मृत्यूनं हादरलेले ब्रेंडाचे वडील लियोनेल डेल कास्टिलो गदगदल्या स्वरात सांगतात, मृत्यूपूर्वी ब्रेंडाचा इतका छळ करण्यात आला होता की, तिचा मृतदेह ओळखण्याच्याही पलीकडे होता! असाच आरोप मोरेना आणि लाराच्या पालकांनीही केला आहे.
ड्रग्जच्या वादातून ‘मित्रां’मध्येच घडलेली घटना. इतका साधा हा विषय नाही. अर्जेंटिनामध्ये ड्रग्ज तस्करी आता उघडपणे रक्तरंजित व्यवसाय बनला आहे. पेरू आणि बोलीवियामधून येणारे कोकेन, अमली पदार्थ इथून युरोपमध्ये पाठवले जातात. अर्जेंटिनातील रोसारियो हे शहर अमली पदार्थांचा सर्वात मोठा अड्डा बनलं आहे. अनेक गॅंग या अड्ड्यावर ताबा मिळवण्यासाठी कायम झुंजत असतात. लहानसहान टोळ्या तर रस्त्यावरच ड्रग्ज विकतात. यातून हिंसा, खंडणीचे प्रकार तर रोजच सुरू असतात.