हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
By अतुल कुलकर्णी | Updated: December 1, 2025 11:40 IST2025-12-01T11:36:29+5:302025-12-01T11:40:48+5:30
भाजप आणि शिंदेसेना हेच एकमेकांच्या विरोधात लढताना दिसले. उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा राज ठाकरेंची मनसे या निवडणुकीच्या प्रचारात कुठेही दिसली नाही.

हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
- अतुल कुलकर्णी (संपादक, मुंबई)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातील पहिला टप्पा दोन तारखेला पूर्ण होईल. २४६ नगरपालिका व ४१ नगरपंचायतींसाठी उद्या मतदान पार पडेल. प्रचाराची रणधुमाळी आज संपेल. या संपूर्ण कालावधीत महाराष्ट्रात राज्य सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसणारे प्रमुख दोन पक्ष, भाजप आणि शिंदेसेना हेच एकमेकांच्या विरोधात लढताना दिसले. उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा राज ठाकरेंची मनसे या निवडणुकीच्या प्रचारात कुठेही दिसली नाही.
या दोन्ही पक्षांचे मुंबईतील किती व कोणते प्रमुख नेते २८७ पैकी किती ठिकाणी प्रचाराला गेले? त्यांची नावे दोन्ही पक्षांनी जाहीर केली पाहिजेत. शिंदेसेना आणि भाजपने मीडियाची जेवढी जागा या काळात मिळवली, त्याच्या १० टक्के जागाही राज -उद्धव आणि काँग्रेसला मिळवता आलेली नाही.
आर. आर. पाटील गृहमंत्री असताना एक उदाहरण द्यायचे. विधानसभेत एखाद्या आमदाराने, दुसऱ्या आमदारावर जोरदार हल्ला चढवला. प्रकरण हाणामारीवर गेले. सभागृह तहकूब झाले
की, त्या आमदाराच्या बातम्या दुसऱ्या दिवशी हमखास सगळीकडे येतात. चॅनलवरही तोच आमदार झळकत राहतो. मात्र, एखाद्याने अभ्यासपूर्ण भाषण केले, तर त्याला काही सेकंदही कोणी दाखवत नाही. दाखवले तर कोणी बघतही नाही. आर. आर. यांनी हे विदारक वास्तव मांडले होते. मात्र, त्यावरचे उपायही त्यांनीच शोधून ठेवले होते.
कुठलाही गदारोळ न करता आपण रोज माध्यमांमध्ये कसे येत राहू, याचे तंत्र आणि ज्ञान दोन्ही गोष्टी त्यांनी प्रयत्नपूर्वक आत्मसात केल्या होत्या. शुक्रवार, शनिवार, रविवार
फारसे काही घडत नाही. हे लक्षात घेऊन, या तीन दिवसात न्यूज चॅनल असो की वर्तमानपत्र; आपल्या बातम्या कशा ठळकपणे येतील, याचे कौशल्य त्यांना चांगले साध्य झाले होते.
"ज्यावेळी बाहेर शांतता असते, त्यावेळी तुम्ही वादळ निर्माण करायचे असते. जेव्हा बाहेर वादळ असते तेव्हा तुम्ही शांत बसायचे असते,” ही प्रबोधनकार ठाकरे यांची नीती सर्वांना माहिती आहे. तरीही त्यांचाच वारसा सांगणाऱ्या राज आणि उद्धव या दोघांनी पालिका निवडणुकीत घेतलेली शांततेची भूमिका त्यांच्याच कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी आहे.
शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही नेते आपापल्या जिल्ह्यातच अडकून पडलेले दिसले. मात्र, राज्यपातळीवर माध्यमांची जेवढी जागा भाजप आणि शिंदेसेनेने मिळवली, त्याच्या जवळपासही अन्य विरोधी पक्षांना जाता आले नाही. जे तंत्र आणि ज्ञान आर. आर. पाटील यांना साध्य करता आले ते शिकून घेण्याची खरी गरज उद्धवसेना काँग्रेस आणि मनसेला आहे.
भाजपाचे एक नेते प्रचारादरम्यान भेटले. प्रचार कसा सुरू आहे? हे सांगताना ते म्हणाले, "खरी लढाई आमच्या दोघांतच, म्हणजे भाजप आणि शिंदेसेनेतच आहे. तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो, हे आमच्याकडे ठरलेले आहे. राजकारण म्हटल्यावर काही ठिकाणी कुरबुरी होणारच. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे. कार्यकर्त्यांना जोरदार भांडू द्यायचे. गरज पडली तर त्या त्या ठिकाणच्या प्रमुख नेत्यांनी भडका उडवता येईल, अशी विधाने करायची. मात्र, राज्यपातळीवर ठरलेले अंडरस्टैंडिंग गाव पातळीवर कोणत्याही परिस्थितीत जाऊ द्यायचे नाही. ते तसे गेले तर दोघांच्या भांडणातले स्पिरीट निघून जाईल. ते स्पिरीट संपले तर आम्हाला आज मिळत असलेली जागा विरोधकांना मिळेल..." हसत हसत टाळी देत तो नेता म्हणाला, कशी वाटली आमची रणनीती ?
काँग्रेस राजकारणात मुरलेली आहे. मात्र, त्यांना वरून कोणीतरी आदेश देणारा हवा असतो. शिवाय पैसे खर्च करणारा कोण असेल, हेही काँग्रेसला कळावे लागते. त्याशिवाय काँग्रेस हलतच नाही. उद्धवसेनेकडे कार्यकर्त्यांचे जाळे आहे. राज ठाकरे यांच्याकडे काय, कुठे व कधी बोलावे, याची अचूक समज आहे. तरीही पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीत या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना राज्य पातळीवर स्वतःची छाप निर्माण करता आली नाही. त्यात भाजप आणि शिंदेसेना नंबर एक ठरली आहे. प्रचाराला गेल्यानंतर वरिष्ठ नेत्यांना फोन लावायचा. त्यांचे फोनवरचे बोलणे तिथल्या माइकवरून सभेला ऐकवायचे.
फोनवरून संबंधित नेता वेगवेगळी आश्वासने देतो. लोक टाळ्या वाजवतात. पुढे त्याचे जे व्हायचे ते होईल. पण, वेळ मारून नेण्यात यश मिळालेले दिसते. पण, त्यासाठी पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरावे लागते. काँग्रेसचे अनेक नेते आपापल्या जिल्ह्यात अडकून पडले. फिरू बोलू शकणारे नेते आपल्याला हेलिकॉप्टर नाही, विमान नाही, गाडीने किती फिरायचे? असा प्रश्न करू लागले. काही नेत्यांनी आमच्याजवळ कुठे भाजप, शिंदेसेनेएवढा पैसा आहे, अशी कारणे सांगितली गेली.
एकनाथ शिंदे जितक्या सढळपणे दोन्ही हात पुढे करतात, तेवढा सढळपणा हाताचे चिन्ह असलेल्या काँग्रेसकडेही नाही. मनसे - उद्धवसेनेचा तर याबाबतीत प्रश्नच येत नाही. प्रचारात या दोघांनी निर्माण केलेला माहोल निकालाचे पारडे कोणाच्या बाजूने झुकवेल हे तीन तारखेला कळेल.
एवढे करून पहिल्या टप्प्यातले निकाल भाजपच्या बाजूने गेले तर बोगस मतदार याद्यांवर खापर फोडायला विरोधक मोकळे होतील. चुकून विरोधकांना यश मिळाले तर भाजप व शिंदेसेनेच्या भांडणाला लोक वैतागले, असे सांगायलाही विरोधक कमी करणार नाहीत. कुठला तरी एक निष्कर्ष काढायला बुधवारी दुपारपर्यंत वाट पाहावी लागेल.