लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 06:47 IST2025-11-21T06:46:44+5:302025-11-21T06:47:25+5:30
Dr. Narendra Dabholkar Lokvidyapeeth: अंनिसमार्फत 'डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठा'चा प्रारंभ झाला आहे. प्राप्त अडथळे ओलांडून विवेकाचा आवाज जागा ठेवण्याच्या या प्रयत्नाबद्दल...

लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
डॉ. हमीद दाभोलकर कार्यकर्ता,
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
कुठलेही विद्यापीठ ही ज्ञानाचे मोकळे आदान-प्रदान होईल अशी जागा असणे अपेक्षित आहे. प्राचीन भारतात तक्षशीला, नालंदा, वल्लभी, विक्रमशीला अशी अनेक विद्यापीठे विद्येच्या आदान-प्रदानाचे महत्त्वाचे केंद्र होते. जगभरातील विद्यार्थी इथे येत असत. या विद्यापीठांमध्ये प्रश्न विचारण्यासाठी मोकळा अवकाश होता. सध्या मात्र भारतात याच्या अगदी विरुद्ध दिशेने प्रवास चालू आहे. वैचारिक मोकळेपणा आणि प्रश्न विचारण्याच्या संस्कृतीपासून आपली विद्यापीठे उलट्या पावलांचा प्रवास करताना दिसतात. सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणतील, असे प्रश्न विचारणारे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना देशद्रोही ठरवून तुरुंगात धाडले जात आहे. डार्विनच्या सिद्धांतासारख्या गोष्टी अभ्यासक्रमांतून वगळून अनेक अवैज्ञानिक गोष्टी घुसडल्या जात आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात हा प्रवास चालू आहे आहे. सत्याचा निरंतर शोध घेणे हे विद्याग्रहणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे, असे म्हंटले जाते. परंतु सध्याचा कालखंड 'पोस्ट ट्रुथ' किंवा 'सत्योतर कालखंड' आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठाचा प्रारंभ झाला. बदलत्या काळाला अनुरूप असा हा प्रयत्न आहे. जेव्हा जेव्हा ज्ञानाला बंधने घालायचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा इतिहासात ते मोकळे करायचे प्रयत्नही झाले. त्यापासून प्रेरणा घेऊन केलेला हा प्रयोग आहे. गेली अनेक दशके अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सप्रयोग व्याख्यानातून सातत्याने विद्यार्थी व इतर नागरिकांसोबत अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधत असतात. आता अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी या लोकविद्यापीठाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर छोटे ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. शिक्षणाचा प्रसार खेडोपाडी पोहोचल्यावर लोक विचार करायला
लागतील आणि अंधश्रद्धांपासून दूर जातील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र उलटे घडलेले दिसते. सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा हा एक नवीनच प्रकार आपल्या समाजात उदयास आला आहे. या पार्श्वभूमीवर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार- प्रसार करणारे अभ्यासक्रम नागरिकांना सहज उपलब्ध असावेत या साठी हे विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला या प्लॅटफॉर्मवर खालील सहा अभ्यासक्रम उपलब्ध असतील वैज्ञानिक दृष्टिकोन, अंगात येणे, भुताने झपाटणे, भ्रामक वास्तुशास्त्र, छद्म विज्ञान आणि व्यसनमुक्ती. विज्ञानाच्या अनुषंगाने दैनंदिन जीवनात जे प्रश्न पडतात त्यांना धरून हे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. केवळ अंधश्रद्धा निर्मूलनापर्यंत मर्यादित न राहता त्या मध्ये फसवेविद्यान, व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य हे विषय देखील समाविष्ट केले आहेत.
हे लोक विद्यापीठ असणार आहे. आपल्याकडे ज्ञान व्यवहारातून लोकांचे अंगभूत शहाणपण कसे बाजूला पडेल याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत असताना ह्या विद्यापीठात शिकणे आणि शिकवणे या ज्ञान व्यवहारात गांभीर्याने रस असलेल्या नागरिक आणि विद्यार्थ्यांना जोडून घेतले जाणार आहे. १३ वर्षांवरील मुलांपासून पुढे कोणताही नागरिक हे अभ्यासक्रम करू शकेल. ऑनलाइन परीक्षा दिल्यानंतर प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या सहीचे एक आकर्षक प्रमाणपत्र मिळेल. परीक्षेतील प्रश्न देखील केवळ माहिती नाही तर आकलन तपासणारे आहेत. पुढच्या दुसऱ्या टप्प्यात फलज्योतिषाचा फोलपणा, मानसिक आरोग्य, जोडीदाराची विवेकी निवड, पर्यावरण आणि अंधश्रद्धा अशा स्वरूपाचे अभ्यासक्रम देखील सुरु केले जाणार आहेत.
www.anisvidya.org.in वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करून अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. सर्व अभ्यासक्रम आणि परीक्षा निःशुल्क आहेत. डिजिटल युगात नव्याने उपलब्ध झालेले बरेचसे तंत्रज्ञान हे असत्य गोष्टी आणि अंधश्रद्धा यांच्या प्रसारासाठी वापरले जात आहे. अशा या कालखंडात डिजिटल युगातील तेच तंत्रज्ञान हे सत्याचा शोध घेण्यासाठी वापरण्याचा हा प्रयत्न आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे मोल दिले. त्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नावाने हे लोकविद्यापीठ होणे हे महत्त्वाचे आहे असे वाटते. कितीही अडचणी आल्या तरी विवेकाचा आवाज त्यामधून रस्ता शोधतच राहील हा आशावाद आपल्या मनात तेवत ठेवण्याचा हा एक प्रयत्न आहे. स्वतःच्या जीवनात विवेकवाद रुजवू इच्छिणाऱ्या सर्वांचे या बिन भिंतींच्या उघड्या शाळेत स्वागत आहे.