अमेरिकन्स म्हणतात, यूएस? छे! भारतात या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 08:43 IST2025-10-22T08:43:07+5:302025-10-22T08:43:45+5:30
याबद्दलचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

अमेरिकन्स म्हणतात, यूएस? छे! भारतात या!
भारतात राहणाऱ्या अनेकांना अमेरिकन ड्रीम खुणावत असतं. पण, भारतात वास्तव्यास असलेल्या अमेरिकन्सना भारताबद्दल नेमकं काय वाटतं हे नेहमीच आपल्या समोर येतंच असं नाही. क्रिस्टन फिशर नावाच्या अमेरिकन महिलेची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. आपल्याला भारतात राहायला आवडतं, अमेरिकेत राहण्यापेक्षा भारतात राहाणं किती स्वस्त आहे आणि अमेरिकन जीवनमानाच्या तुलनेत इथलं जीवनमान आपल्याला अधिक आवडतं, असंही तिने म्हटलं आहे. तुम्ही खूप श्रीमंत नसाल, तरी भारतात अनेक गोष्टी तुम्हाला परवडू शकतात, असं ती म्हणते. याबद्दलचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
क्रिस्टन फिशर ही एक अमेरिकन कंटेंट क्रिएटर आणि उद्योजिका आहे. ती मूळची अमेरिकन असून, पती आणि मुलांसह भारतात राहते. तिचं भारतातील वास्तव्य आणि त्याबाबत ती करत असलेल्या सोशल मीडिया पोस्ट या सातत्याने चर्चेत असतात. असाच एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. भारतात राहणं खूप स्वस्त तर आहेच, पण त्यांच्या कुटुंबाला इथे अधिक चांगलं आणि समृद्ध जीवनमान जगता येतं, असा दावाही तिने या व्हिडीओमध्ये केला आहे. क्रिस्टनच्या मते भारतात राहण्याचा खर्च हा अमेरिकेच्या तुलनेत १० पट कमी आहे. इंटरनेट, अन्न, वाहतूक, आरोग्यसेवा आणि शिक्षण अशा अनेक गोष्टी भारतात बऱ्याच कमी खर्चात मिळतात. त्यामुळे तुम्ही खूप श्रीमंत नसाल, तरी त्या तुम्हाला परवडू शकतात, असं क्रिस्टनला वाटतं.
त्यासाठी क्रिस्टन काही उदाहरणं देते. अमेरिकेत केस कापण्याचा खर्च ४० यूएस डॉलर एवढा आहे. भारतात तो जेमतेम दोन यूएस डॉलर एवढाच आहे. भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत संपूर्ण कुटुंबाचा बाहेर जेवणाचा खर्च साधारण दहा अमेरिकन डॉलर एवढा असतो. अमेरिकेत त्यासाठी किमान शंभर डॉलर लागतात. हाय स्पीड इंटरनेटसाठी भारतात दहा डॉलर पुरेसे होतात. अमेरिकेत त्यासाठी किमान ७० डॉलर लागतात, असं क्रिस्टनचं म्हणणं आहे.
क्रिस्टन म्हणते, इथे भारतात आमचं उत्पन्न कमी असलं, तरी आम्ही अनेक गोष्टी ‘अफोर्ड’ करू शकतो. इथे आम्ही कमी पैसे कमावतो, पण जास्त चांगलं जीवन जगतो, असंही ती सांगते. तिचा व्यवसायही डिजिटल स्वरूपातील असल्यामुळे डॉलरमध्ये कमाई आणि रुपयांमध्ये खर्च करत जगता येतं आणि ते खूपच परवडतं, असं तिचं मत आहे. भारतातील जगण्यात थोडा निवांतपणा आहे. इथे सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. परस्पर संबंधांमध्ये आजही अधिक जिव्हाळा आहे. माझ्या मुलांना भारतीय शाळांमध्ये ही मूल्यं शिकता येतात याबद्दलचं समाधानही ती व्यक्त करते.
‘पर्चेसिंग पॉवर पॅरिटी’बद्दल ती सातत्याने बोलते. तुम्ही किती पैसे कमावता यापेक्षा तुम्ही जिथे राहता तिथे त्याचा किती उपयोग होतो, तो पुरेसा ठरतो का, हे महत्त्वाचे आहे, असे ती म्हणते. अधिक चांगल्या सेवा, अधिक मोकळा वेळ आणि कमीत कमी आर्थिक ताण हे तिच्या मते भारतात राहण्याचे फायदे आहेत. इथे डॉक्टरांचा सल्ला १० अमेरिकन डॉलरच्या आत मिळतो. भारतातील आरोग्यसेवेबाबत ती अत्यंत समाधानी आहे.