बारामतीकरांना अकलूजकरांचे आव्हान !

By सचिन जवळकोटे | Published: January 14, 2020 09:57 AM2020-01-14T09:57:52+5:302020-01-14T09:58:56+5:30

'अजितदादा को राजभवन में किसने भेजा ?’

Akalujkar's challenge to Baramatikar! | बारामतीकरांना अकलूजकरांचे आव्हान !

बारामतीकरांना अकलूजकरांचे आव्हान !

Next

- सचिन जवळकोटे 


‘बाहुबली को कटाप्पाने क्यूँ मारा ?’ या गूढ प्रश्नाचं उत्तर मिळायला कैक दिवस लागले. मात्र ‘अजितदादा को राजभवन में किसने भेजा ?’ या प्रश्नाची उकल काही आजपावेतो झालीच नाही. खरंतर ‘पहाटेच्या अंधारात दादा अकस्मात कसे काय गेले ?’ याप्रमाणेच ‘दादा पुन्हा स्वगृही कसे काय परतले?’ हाही सवाल उभ्या महाराष्ट्राला पडलेला. यातल्या दुसऱ्या प्रश्नाचा शोध शरद पवारांच्या मुरब्बी राजकारणापर्यंत येऊन पोहोचतो. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतल्यानंतर पवारांनी जो काही आपला मुत्सद्दीपणा पणाला लावला, त्यातली  बरीच माहिती अद्याप गुलदस्त्यात राहिलेली. त्यावेळी अजितदादांसोबत असलेले काही आमदार ‘संपर्क क्षेत्राबाहेर’ गेले, तेव्हा पवारांनी म्हणे थेट या साऱ्यांच्या घरीच कॉल केले. ‘तुमच्या पतीदेवांना काहीही करून उद्या सायंकाळपर्यंत माझ्याकडं पाठवा’, हा निरोप सर्वांच्या सौभाग्यवतींनी अत्यंत गांभीर्यानं घेतला. ‘पक्षातला रिमोट अन् घरातला रिमोट’ जोरात चालल्यानं लगोलग संबंधित आमदार ‘टीव्ही’वर झळकू लागले. त्यामुळं नाईलाजानं अजितदादांना ‘घडीचा डाव’ मोडावा लागला.
दोन महिन्यांनंतर हा किस्सा पुन्हा चर्चेला येण्याचं कारण की, ‘अजित पवारांच्या बंडखोरीवर आजपर्यंत कारवाई का केली नाही?’ असा थेट सवाल काल अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यानं शरद पवारांना केला. त्यामुळे तो विषय पुन्हा ढवळून निघालाय. सोलापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा व्हिप नाकारत दुसऱ्याच उमेदवाराला अध्यक्ष केल्यानं मोहिते-पाटील गटाचे सहा सदस्य  पक्षानं निलंबित केले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलंय. खरंतर हा प्रश्न त्या पक्षातल्याच कैक नेत्यांच्या मनात आजही सलणारा; मात्र विचारण्याचं धाडस करणार कोण? मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ? मात्र ज्यांनी ही घंटा बांधण्याचं धाडस आज केलंय, ते पक्षाच्या दृष्टीनं जहाजातून उड्या मारणारे उंदीर ठरलेत.
हा उद्विग्न सवाल करणारे मोहिते-पाटील आजच्या घडीला राष्ट्रवादीत नाहीत. ही भाषा जयसिंह मोहिते-पाटलांची असली तरी याला विजयसिंह अन् रणजितसिंह यांचीही मूक संमती असणारच. भलेही विजयसिंह जुन्या वसंतदादा गटाचे म्हणून ओळखले जात असले तरी ते अलीकडच्या दोन-तीन दशकात बारामतीकरांच्या तालमीतच तयार झालेले. ‘मी अजूनही राष्टÑवादीतच’ असं एकीकडं पुण्यात सांगत असतानाच दुसरीकडं सोलापूर झेडपीत राष्ट्रवादीचा उमेदवार पाडण्याची कामगिरीही ते मोठ्या चोखपणे बजावतात. असं असलं तरीही त्यांच्या बंगल्यातल्या दिवाणखान्यात आजही पवारांचाच फोटो झळकतो. अशीच परिस्थिती पक्षाबाहेर पडलेल्या कैक नेत्यांची. विधानसभा निवडणुकीत भलेही त्यांनी भाजप-सेनेशी जवळीक साधली असली तरी त्यांच्यात हृदयात आजही म्हणे शरद पवारच. आता हे खºयाखुºया प्रेमापोटी बोलतात की पवारांच्या भीतीपोटी, हे या नेत्यांनाच ठाऊक. मात्र एक खरं, पूर्वी पवारांच्या भीतीपेक्षाही दादांची दहशत मोठी होती. आता ‘रिटर्न आॅफ दि दादा’ चित्रपट सणकून आपटल्यानंतर नक्कीच कमी झाली असावी, हे निश्चित.
शरद पवार निवडणुकीत जिंकले; मात्र नंतर पुतण्यासोबतच्या तहात हरले, असंही काही कार्यकर्त्यांना वाटतं. मात्र ‘उपमुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात पक्ष न फोडण्याची हमी’ घेऊन पवारांनी हे बंड पेल्यातल्या वादळात शमवलं. तसंच ‘दादांनी खुर्ची कमावली असली तरी विश्वास गमावला. पूर्वीचे जे काही अधिकार होते, तेही गमावले. यापेक्षा मोठी कारवाई काय असू शकते’, असंही काहींना वाटतं. सर्वात मोठी गोची शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या अन् पक्षाशी निष्ठा राखणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची झालीय; कारण अजितदादांच्या शपथविधीनंतर (पहिल्या) गावोगावी बऱ्याच कार्यकर्त्यांनी पुतळे-बितळे जाळून आपल्या संतप्त भावना व्यक्त केलेल्या. आता तेच दादा जेव्हा त्यांच्या गावात येतील, तेव्हा वाजत-गाजत मोठ्या सन्मानानं स्वागत करण्याची वेळ यांच्यावर आलीय; मात्र त्या दोन दिवसात जे शांतपणे ‘काका-पुतण्यां’च्या हालचाली न्याहाळत गप्प बसले, ते अत्यंत हुशार निघाले; कारण पवारांची ‘चाणक्यनीती’ त्यांना खूप चांगली पाठ झालेली होती.
खरंतर, या पक्षाचा उदयच बंडातून झालेला. त्यामुळं इथं उघड-उघड केलेली गद्दारी क्षणिक बंडखोरी ठरते, तर गुपचूप केलेली गद्दारी कायमची बंडखोरी ठरते, हीच भावना मोहिते-पाटलांनी व्यक्त केली. मात्र भविष्यात हे नेते पुन्हा एकत्र सत्तेत येण्याची शक्यताही नाकारता येत नाही; फक्त एकाच पक्षात की  वेगवेगळ्या पक्षात राहून हे काळालाच ठाऊक.


( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Akalujkar's challenge to Baramatikar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.