मोठा भाऊ हरपल्याचे दुःख, फक्त सहकारी नव्हे, निकट मित्रही असलेल्या दादांचा मृत्यू सुन्न करणारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 08:32 IST2026-01-29T08:31:32+5:302026-01-29T08:32:23+5:30
Ajit Pawar: माझ्यापेक्षा दादा अनुभवाने आणि वयानेही मोठेच, मात्र सरकारमध्ये एकत्र काम करताना आम्ही मित्रासारखे हसत-खेळत काम केले. फक्त सहकारी नव्हे, निकट मित्रही असलेल्या दादांच्या अपघाती निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची वेदना माझ्या वाट्याला आली आहे.

मोठा भाऊ हरपल्याचे दुःख, फक्त सहकारी नव्हे, निकट मित्रही असलेल्या दादांचा मृत्यू सुन्न करणारा!
- एकनाथ शिंदे
(उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र)
माझ्यापेक्षा दादा अनुभवाने आणि वयानेही मोठेच, मात्र सरकारमध्ये एकत्र काम करताना आम्ही मित्रासारखे हसत-खेळत काम केले. फक्त सहकारी नव्हे, निकट मित्रही असलेल्या दादांच्या अपघाती निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची वेदना माझ्या वाट्याला आली आहे.
वेळ पाळणे, शिस्तबद्धता आणि प्रशासकीय कौशल्य ही अजितदादांची खरी ओळख. चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत ते जसे होते, तसेच अगदी शेवटपर्यंत राहिले. स्पष्टवक्तेपणामुळे ते फटकळ वाटायचे; पण हे स्पष्ट बोलणे आपल्या फायद्याचे आहे हे जेव्हा समोरच्याला कळायचे तेव्हा त्यालाही दादांविषयी आदर वाटायचा.
देवेंद्रजी दिवसभर काम करतात, दादा सकाळी, पहाटेपासून कामाला सुरुवात करत आणि माझे काम दुपारनंतर सुरू होते. आम्ही तिघांनी वेळेचे वाटप करून घेतले आहे, असे मी गमतीने म्हणत असे. पण दादांच्या दिवसाची सुरुवात कितीतरी वेळा पहाटे ५ आणि ६ वाजता झालेली आहे. कोविड काळात तर ते स्वतः दररोज मंत्रालयात नियंत्रण कक्षात उपस्थित असायचे. अजितदादा खऱ्या अर्थाने अजातशत्रू होते. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी असो किंवा विरोधी असो, सगळ्यांचे ते मित्र होते. राजकीय टीका-टिपण्या चालू असतातच, पण त्यांच्याविषयी कोणी मनात वैर बाळगले नाही. दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता म्हणून ते कायम माझ्या लक्षात राहतील.
सहा वेळा दादा उपमुख्यमंत्री होते, त्यापूर्वी मंत्रीही होते. ‘सर्वाधिक काळ विधानभवनात बजेट सादर करणारा’ म्हणून गौरवाने स्वतःचा उल्लेख करायचे. पण त्यांच्या वागण्या-बोलण्यात अहंकार नव्हता. त्यांच्या कामाचा झपाटा आणि निर्णयक्षमता आम्ही सगळ्यांनी अनुभवली आहे. वित्तमंत्री म्हणून त्यांच्याकडे सगळ्याच खात्यांबाबत माहिती असायची, पण म्हणून त्यांनी कधी शिष्टाचाराची चौकट मोडली नाही. धोरणात्मक निर्णय जाहीर करतानाही त्यांनी कधी कुणाला अव्हेरल्याचे दिसत नाही. आपले म्हणणे ते सुस्पष्टपणे आणि अधिकारवाणीने मांडत.
राज्याची आर्थिक घडी चांगली बसावी यासाठी राज्याचा वित्तमंत्री म्हणून अजितदादांनी विकासकामांना खीळ बसू न देता अतिशय हातोटीने अनेक निर्णय घेतले. स्वप्नाळू सादरीकरण आणि सांगोवांगी गोष्टींपेक्षा व्यावहारिक गोष्टी ते कायम पडताळून पाहात. एखादी संकल्पना पुढे आली, की तिचा सर्व बाजूंनी विचार करायला भाग पाडत. ती संकल्पना कितपत टिकेल, तिच्या भविष्यातील देखभालीची व्यवस्था इथपासून, ती लोकहिताची आहे का, किती जणांसाठी ती उपयुक्त ठरणार आहे, अशा अनेक गोष्टींचा ते विचार करत. ठोस आणि तडकपणे निर्णय घेत असल्याने विधिमंडळातील आमदार आणि मंत्रिमंडळातील होतकरू-तरुण मंत्र्यांनाही अजितदादांच्या कार्यशैलीबाबत, दैनंदिनीबाबत कुतूहल असे. ज्येष्ठत्वाच्या नात्याने त्यांनाही वेळप्रसंगी ठणकावयाला दादा मागेपुढे पाहत नसत.
अवघे राज्य त्यांना दादा म्हणून ओळखते, हा खरेच ‘दादा’ माणूस होता ! आता अजितदादा आपल्यात नाहीत, दिसणारही नाहीत ही कल्पनासुद्धा मनाला पटत नाही. मी शिवसेनेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.