विशेष लेख: आकाशात अकाली खुडले गेलेले एक अपूर्ण स्वप्न

By Rajendra Darda | Updated: January 29, 2026 08:03 IST2026-01-29T08:01:48+5:302026-01-29T08:03:06+5:30

Ajit Pawar: आकाशाएवढ्या विशाल कर्तबगारीचे बळ राखून असलेल्या ज्येष्ठ नेत्यांचा प्रवास आकाशातच अर्ध्यावर खुडण्यामध्ये नियतीचा काय संकेत आहे कोण जाणे! संजय गांधी, आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव शिंदे.. आणि आता अजित पवार! अजितदादांच्या अपघाती मृत्यूची बातमी अत्यंत हृदयद्रावक आहे.

Ajit Pawar Death News: An unfulfilled dream that was prematurely torn from the sky | विशेष लेख: आकाशात अकाली खुडले गेलेले एक अपूर्ण स्वप्न

विशेष लेख: आकाशात अकाली खुडले गेलेले एक अपूर्ण स्वप्न

- राजेंद्र दर्डा
(महाराष्ट्राचे माजी उद्योगमंत्री, मुख्य संपादक, लोकमत समूह)

आकाशाएवढ्या विशाल कर्तबगारीचे बळ राखून असलेल्या ज्येष्ठ नेत्यांचा प्रवास आकाशातच अर्ध्यावर खुडण्यामध्ये नियतीचा काय संकेत आहे कोण जाणे! संजय गांधी, आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव शिंदे.. आणि आता अजित पवार! अजितदादांच्या अपघाती मृत्यूची बातमी अत्यंत हृदयद्रावक आहे. जिद्द आणि महत्त्वाकांक्षेने ओतप्रोत  रसरसलेल्या आयुष्याचा हा असा अकाली अंत काळीज हेलावून टाकील असाच.

राज्याचे अर्थकारण, समाजकारण याची अतिशय उत्तम जाण असलेले अजित पवार अनेकानेक गोष्टींसाठी माझ्या सदैव स्मरणात राहतील. १९९९ ते २०१४ या काळात मी आमदार आणि विविध खात्यांचा मंत्री असताना अनेकदा त्यांच्याशी संपर्क आला, त्यांच्यासोबत महत्त्वाच्या विषयांवर बैठका झाल्या. दरवेळी राज्यहिताची कळकळ असलेला नेता ही त्यांची प्रतिमा माझ्या मनात अधिक उजळ होत गेली. अनेकदा माझ्या खात्यांशी संबंधित बैठका ते उपमुख्यमंत्री/वित्तमंत्री म्हणून घेत तो अनुभव लक्षात राहून गेला आहे. अजितदादा  बैठकीच्या अजेंड्याला थेट हात घालत, पाल्हाळाऐवजी नेमके मुद्दे चर्चेला घेत आणि एकेका मुद्द्याची सोडवणूक करत कमीतकमी वेळात बैठक अधिक निर्णयाभिमुख झालीच पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. जलद गतीने निर्णय घेत पंधरा-वीस मिनिटांतच ते बैठक  संपवत असत. पाल्हाळ, रेंगाळणे हा त्यांचा स्वभावच नव्हता. त्यांच्या या कार्यशैलीचा मलाही फायदा झाला. 

वित्तपासून जेवढी खाती त्यांनी सांभाळली, त्या सर्व खात्यांसह अन्य खात्यांचीही त्यांना उत्तम जाण होती. कोणीही अधिकारी वा लोकप्रतिनिधी चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करू शकत नसे. तसे कोणी करायला धजावले तर वास्तव काय याची थेट जाणीव करून देत ते संबंधितांना जागा दाखवत असत.  ‘एखादे काम होणारे नसेल तर समोरच्याला नाही म्हटले पाहिजे, उगाच झुलवत ठेवण्याचा माझा स्वभाव नाही’ असे ते स्पष्टपणे सांगत, पण त्याचवेळी एखादा शब्द कोणाला दिला तर तो ते पाळल्याशिवाय राहत नसत. ‘आपल्याला सगळेच समजते’, असा आविर्भाव त्यांनी कधी आणला नाही, समोरच्याचे ते नीट समजून घेत असत.

इतकी वर्षे एक कठोर, जरब असलेला नेता ही आपली प्रतिमा बदलवत अलीकडे ते मिश्कील झाले होते, भाषणांमधून नर्मविनोदाची पेरणी करत लोकांच्या मनाचा ठाव घेत असत, स्वत:मध्ये त्यांनी घडवून आणलेला हा बदल विस्मयचकित करणारा होता. त्यांच्यातील हा बदल लोकांना खूपच सुखावणारा होता आणि राजकीय नेत्यांना खूप काही शिकवणारादेखील.

मी राज्याचा शिक्षणमंत्री असताना काही धाडसी निर्णय घेतले तेव्हा ते उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री होते. एक निर्णय होता तो शाळांच्या पटपडताळणीचा. माझ्या या निर्णयामुळे शिक्षणसंस्था असलेले राजकीय नेते काहीसे अस्वस्थ झाले, आपल्या शिक्षणसंस्थांवर हे गंडांतर असल्याची त्यांची भावना झाली. पण त्यावेळी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या अत्यंत सकारात्मक प्रतिसादामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास मला बळ मिळाले होते.

शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकहिताचे निर्णय मी शिक्षणमंत्री म्हणून घेतले तेव्हाही दरवेळी दादांचा सहकार्याचा हात पुढे असे. ‘तुमचा हेतू चांगला आहे, निर्णय घ्या’ असे म्हणून ते आवश्यक ते सगळे सहकार्य करीत.. शाळांचे शिक्षकेतर अनुदान जवळपास १५ वर्षांपासून रखडले होते. त्यामुळे अनेक शाळांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागविणे कठीण होऊन बसले होते. ते रखडलेले अनुदान द्यायचे तर एकूण २०३ कोटी रुपये हवे होते. मी वित्तमंत्री अजितदादांकडे गेलो, त्यांना हा प्रश्न खूपच जिव्हाळ्याचा असल्याचे सांगितले. त्यांनी तत्काळ ते अनुदान मान्य केले आणि शेकडो शाळांना मोठा दिलासा मिळाला. हाच अनुभव मला उद्योग खात्यातील अडचणी सोडवितानाही आला.

अखंड कार्यरत असण्याची एक अजब, अतर्क्य ऊर्जा हा अजितदादांचा खास स्वभावविशेष! छत्रपती संभाजीनगरला (तेव्हाचे औरंगाबाद) शहानूरमियां दर्ग्याच्या शेजारी असलेल्या संग्रामनगर उड्डाणपुलाचे उद्घाटन दादांनी रात्री साडेदहा वाजता केले, तेव्हाचा त्यांचा सतेज, प्रसन्न वावर मी आजही विसरलेलो नाही. त्यांच्या कामाचा झपाटा अक्षरश: थक्क करणारा होता. मंत्रिपदाची खुर्ची एकदा मिळाली की अनेक नेते आठवड्यातून दोन-तीनदा कधीतरी मंत्रालयात फिरकतात अशी सर्वसाधारण समजूत असते. पण सकाळी नऊच्या आत मंत्रालयातल्या आपल्या दालनात कामाला भिडलेले अजितदादा मी सदैव पाहिले आहेत.

सतत पुढेपुढे जाण्याचे वेध लागलेला, काळाच्या पुढे जाण्याची दूरदृष्टी लाभलेला आणि त्यासाठी अखंड धडपडणारा महाराष्ट्राचा हा बुलंद नेता आज काळाच्या पडद्याआड गेला आहे, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे.

Web Title : अधूरा सपना: एक प्रमुख नेता का असामयिक निधन, महाराष्ट्र स्तब्ध

Web Summary : अजित पवार का आकस्मिक निधन हृदयविदारक है। राज्य वित्त और समाज की गहरी समझ के लिए जाने जाने वाले, वे एक निर्णायक नेता थे। उनकी कार्यशैली और त्वरित निर्णय लेने की क्षमता सराहनीय थी। उनका निधन महाराष्ट्र के राजनीतिक परिदृश्य के लिए एक अपूरणीय क्षति है।

Web Title : Unfulfilled Dream: A Prominent Leader's Untimely Demise Shocks Maharashtra

Web Summary : Ajit Pawar's sudden death is heartbreaking. Known for his sharp understanding of state finances and society, he was a decisive leader who valued efficiency and action. His transformation into a more approachable figure was remarkable, leaving a lasting impact on Maharashtra's political landscape. His contributions will be remembered.