- यदु जोशी(राजकीय संपादक, लोकमत)अजितदादांच्या जाण्याने झालेले नुकसान हे काही दिवस-महिने नाही तर अनेक वर्षे जाणवत राहील. अर्थकारणापासून तर समाजकारणापर्यंत त्यांनी जे योगदान दिले त्याची कधीच चर्चा केली नाही. अशी चर्चा घडवून आणण्यासाठी माणसे नेमण्याचे राजकारणही त्यांनी कधी केले नाही. ते खूप लोकांसाठी खूप काही करायचे, पण त्याबाबत अव्यक्तच राहात, श्रेयवादाच्या भानगडीत पडत नसत. महाराष्ट्राचे शासन-प्रशासन आणि लोकनाडी हे तिन्ही एकाचवेळी सारख्याच क्षमतेने जाणणारा हा नेता खरेतर मुख्यमंत्री होण्याच्या सर्व पात्रता पूर्ण करणारा होता. मात्र, आज त्यांच्या अकाली निधनाने मुख्यमंत्रिपदाबाबतची त्यांची कहाणी आणि लोकेच्छादेखील अधुरी राहिली आहे.
एका ठिकाणी उभे राहून महाराष्ट्रावर चौफेर नजर टाकण्याची, त्या नजरेने महाराष्ट्राचे प्रश्न टिपून त्यावर उत्तर शोधण्याची अफाट क्षमता आजवरच्या मोजक्या लोकनेत्यांमध्ये दिसून आली. अजितदादा हे त्यापैकीच एक होते. कधीकधी वाटते की त्यांच्यातील गुणांचे मूल्यांकन ‘त्यांच्या’ लोकांनी तसेच मित्र झालेल्या; पण आधी कट्टर विरोधक असलेल्यांनीही नीटपणे केले नाही. ते आयुष्यभर उपमुख्यमंत्रीच राहिले. त्यांचे मूल्यांकन नाही तर उपमूल्यांकनच होत राहिले. आयुष्यभर कधी स्वकीयांसमोर, तर कधी विरोधकांसमोर परीक्षा देत राहिले. त्यासाठी सतत धावत राहिले. त्या सर्व कठीण परीक्षांमध्ये स्वत:चे मेरिट सिद्ध करत पुढे जात असतानाच काळाने त्यांचा प्रवास थांबविला.
‘मित्रांनो, तुम्ही आरोप करता आहात; पण वस्तुस्थिती तशी नाही, ती आधी समजून घ्या’ असे ते अजितदादा अनेकदा माध्यमांसमोर म्हणत, पण माध्यमांनी तरी त्यांना नीट कुठे समजून घेतले? शरद पवार यांच्या सावलीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वत:त अनेक बदल केले, एरवी फारसे लोकांमध्ये न मिसळणारे दादा लोकांच्या हृदयाला भिडणारे, आपलेसे करून घेणारे बोलू लागले. आपले मूल्यांकन नेत्यांनी करण्याऐवजी आणि दरवेळी त्यांच्या परीक्षेला सामोरे जाण्याऐवजी थेट लोकांनाच साद घालून पाहुयात असा विचार करून त्यांनी नवी धाटणी स्वीकारली असावी, असे आज वाटते. त्यांच्यातील अनेक नेतृत्वगुण समाजासमोर ठळकपणे समोर येऊ लागले होते आणि महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती आज ना उद्या बदलेल तेव्हा ते नक्कीच मुख्यमंत्री होतील, असेही वाटायचे, आता ही लोकभावना कधीही प्रत्यक्षात येणार नाही.
कार्यकर्त्यांचे मोहोळ एका रात्रीतून तयार होत नसते. कार्यकर्ते, आपले सहकारी यांची नेता अहोरात्र काळजी करतो, त्यांच्यासाठी धावून जातो तेव्हा कुठे कालांतराने तो लोकनेता बनतो. अजितदादा हे अशा लोकनेत्याचे मूर्तिमंत उदाहरण होते. जातपात न मानणारा हा नेता होता. सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याची त्यांची विशुद्ध वृत्ती होती. वित्त विभागाचे अधिकारी सांगतात की, एखाद्या समाजाची निकड असेल तर मी त्यांच्यासाठी लगेच निर्णय घेईन, निधीही देईन पण गरज नसताना कोणी मोठा दबाव आणून निर्णय घ्यायला भाग पाडत असेल तर ते मी कदापिही करणार नाही, असे ते निक्षून सांगत असत. या भूमिकेतून त्यांनी आपल्यांना दुखावण्यासही मागेपुढे पाहिले नाही. राज्याच्या भल्यासाठी स्वत:कडे वाईटपणा घेण्याची तयारी खूपच कमी नेत्यांमध्ये असते, अजितदादा त्यातले एक प्रमुख नाव होते. आर्थिक शिस्त, राज्याचे हित समोर ठेवून निश्चयाने पुढे जाणारे अजितदादा मुख्यमंत्रिपदापासून कायमचे दोनच पावले दूर राहिले. त्याबाबतची सल त्यांच्या लाखो चाहत्यांच्या मनात तशीच कायम राहील. ‘भावी मुख्यमंत्री अजितदादा..’ हे फ्लेक्स आता लागणार नाहीत.
Web Summary : Ajit Pawar's contributions were immense, yet often unacknowledged. A leader with deep understanding of Maharashtra's dynamics, he possessed all the qualities of a Chief Minister. His untimely demise leaves his and people's aspirations incomplete, a loss felt deeply by many.
Web Summary : अजित पवार का योगदान बहुत बड़ा था, फिर भी अक्सर अनदेखा किया गया। महाराष्ट्र की गतिशीलता की गहरी समझ रखने वाले नेता, उनमें मुख्यमंत्री के सभी गुण थे। उनके असामयिक निधन से उनकी और लोगों की आकांक्षाएं अधूरी रह जाती हैं, जो कई लोगों को गहराई से महसूस होती हैं।