ग्रामीण महाराष्ट्राला 'आवाज' देणारे द्रष्टे संपादक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 02:55 PM2022-11-25T14:55:09+5:302022-11-25T14:58:35+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि लोकमतचे संस्थापक - संपादक जवाहरलालजी दर्डा यांचा आज पंचविसावा स्मृतिदिन! त्यानिमित्ताने...

A visionary editor giving 'voice' to rural Maharashtra | ग्रामीण महाराष्ट्राला 'आवाज' देणारे द्रष्टे संपादक

ग्रामीण महाराष्ट्राला 'आवाज' देणारे द्रष्टे संपादक

Next

- कमलाकर धारप
(ज्येष्ठ संपादक )

स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांना विकासपुरुष हीच उपाधी योग्य ठरेल. आज त्यांना आपल्यातून जाऊन पंचवीस वर्षे उलटली आहेत. माणसे येतात,जातात; पण काही माणसे काळाच्या भिंतीवर आपला ठसा कायमचा उमटवून जातात. जवाहरलालजी हे त्यापैकी एक होते. नियतीने त्यांचे नियत कार्य त्यांच्या कपाळावर लिहूनच या जगात त्यांना पाठविले असावे. अन्यथा ज्या वयात खेळायचे, बागडायचे, त्या वयात स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेण्याची ऊर्जा प्रकटच झाली नसती. स्वातंत्र्यलढ्यात कारावास भोगणे,  स्वातंत्र्यानंतर कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना पत्रकार होणे, विदर्भासारख्या तुलनेने मागासलेल्या भागातून वृत्तपत्र प्रकाशित करून त्याचा प्रसार मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या प्रगत भागापर्यंत करण्याचे धाडस दाखविणे ही कामे सामान्य माणसाच्या हातून घडणे एरवी तसे अशक्यच! 

बाबूजींचे हे जन्मशताब्दी वर्ष तसेच लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष. ध्येयनिष्ठ पत्रकारिता असण्याच्या काळात बाबूजींनी ‘नवे जग’ साप्ताहिक काढून स्वातंत्र्यानंतरच्या जनतेच्या अपेक्षांना वाचा फोडण्याचे काम केले. स्वत: गावोगावी जाऊन ते त्याचा  प्रचार-प्रसार करीत. स्वातंत्र्यसेनानी बापूजी अणे यांनी स्थापन केलेल्या ‘लोकमत’ साप्ताहिकाचा जीर्णोद्धार करून नंतर त्याचे नागपूरसारख्या महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकाच्या शहरातून दैनिकात रूपांतर करून प्रकाशन करण्याचे धाडस त्यांनी दाखवले. आपले दैनिक ग्रामीण जनतेच्या भावभावनांचे प्रकटीकरण करण्याचे साधन असावे हीच त्यांची लोकमत प्रकाशित करण्यामागील भूमिका होती. त्या काळात ‘गाव तेथे एसटी’ ही भूमिका घेऊन सरकारने एसटीचे जाळे खेड्यापाड्यापर्यंत पोहोचविण्यास प्रारंभ केला होता. या नव्या यंत्रणेचा उपयोग ‘लोकमत’च्या प्रसारासाठी करता येऊ शकतो, असे वाटून बाबूजींनी ‘जिथे एसटी, तिथे लोकमत’ ही संकल्पना धडाक्याने राबवली. त्यामुळे ग्रामीण भागात ‘लोकमत’चे जाळे विणले गेले. आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात लोकमत पोहोचला आहे, त्यामागे बाबूजींची हीच दूरदृष्टी आहे.

ग्रामीण भागातील शिक्षकांनाच नव्हेतर, प्रसंगी वृत्तपत्र विक्रेत्यांनाही गावात घडणाऱ्या घटनांची माहिती ‘लोकमत’कडे पाठविण्यासाठी बाबूजींनी प्रोत्साहित केले. या बातम्यांचे पाकीट ग्रामीण वार्ताहर गावातील बसच्या कंडक्टरकडे सोपवायचे. तो कंडक्टर ते पाकीट गंतव्य स्थानकावर ठेवलेल्या ‘लोकमत’च्या पेटीत टाकायचा. तेथून ते पाकीट लोकमत कार्यालयात आणण्याची व्यवस्था लोकमत प्रशासनाने करायची. त्या बातम्यांवर लोकमत कार्यालयातील संपादकांकडून संस्कार केले जायचे आणि त्या गावाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित व्हायची- हे चक्र ‘लोकमत’ने यशस्वीपणे चालवले ते बाबूजींच्या दूरदृष्टीमुळेच! त्यामुळे ग्रामीण भागात ‘लोकमत’चा प्रसार झपाट्याने होऊ शकला. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ‘लोकमत’चे कार्यालय स्थापन करून, जिल्ह्याच्या बातम्या तेथपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा  नंतरच्या काळात निर्माण झाल्यामुळे जिल्ह्याची स्वतंत्र पाने प्रकाशित करण्याला गती मिळू शकली. 

‘हॅलो नागपूर’च्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यासाठी ‘हॅलो’ पाने प्रकाशित करून त्या - त्या जिल्ह्याची बातम्यांची भूक भागविण्याचे काम ‘लोकमत’नेच प्रथम केले. त्यामुळे सामान्य माणसाच्या बातम्यांना वृत्तपत्रातून प्रथमच स्थान मिळू लागले. ‘लोकमत’मध्ये आपले प्रश्न मांडले की ते सुटू शकतात, असा विश्वास लोकांना त्यामुळेच वाटू शकला... बाबूजींना नेमके हेच साध्य करायचे होते. वृत्तपत्रांचे केंद्र मोठ्या शहरात असते. कालांतराने त्यांच्या आवृत्त्या  वेगवेगळ्या शहरांतून प्रसिद्ध होतात. ‘लोकमत’ने ही परंपरा मोडीत काढून नागपूरहून पुढे जळगाव, औरंगाबाद, नाशिक असा प्रवास करून मुंबई आणि दिल्लीपर्यंतचा जो प्रवास केला त्यामागे होता तो बाबूजींचा ग्रामीण विकासाचा ध्यास! पंचवीस वर्षांनंतर वृत्तपत्रांसमोर कोणती आव्हाने असतील याचा विचार करून त्यांना तोंड देण्याची तयारी बाबूजींनी अगोदरपासून केली होती. मराठी वृत्तपत्रसृष्टीत प्रगत तंत्रज्ञान आणण्याचे काम सर्वप्रथम ‘लोकमत’ने केले आणि त्यानंतर त्याचे अनुकरण अन्य वृत्तपत्रांनी केले.  काळाच्या पुढे राहण्यात अग्रेसर असणे ‘लोकमत’ला सतत साधत गेले त्यामागेही बाबूजींची दूरदृष्टीच होती! 

आज ‘लोकमत’ हे महाराष्ट्राचे अग्रगण्य वृत्तपत्र आहे. त्यामागे बाबूजींनी केलेले हे प्रयत्न आहेत. म्हणूनच त्यांना ‘विकास पुरुष’ म्हणायचे!  वर्तमानाच्या यशाने आकाशाला हात लावण्याचे सामर्थ्य दिलेले असले, तरी या यशाच्या मुळाशी ‘जिथे एसटी, तिथे लोकमत’ हा मातीत रुजलेला मंत्रच आहे हे नक्की!

Web Title: A visionary editor giving 'voice' to rural Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.