नेभळट, कोमट बॉलिवूडला दणकट, ‘धुरंधर’ धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 08:23 IST2025-12-30T08:23:03+5:302025-12-30T08:23:52+5:30
‘परदेशी’ चेहेऱ्यामोहोऱ्याच्या कथा प्रेक्षकांच्या माथी मारणाऱ्या बॉलिवूडला ‘धुरंधर’ने एक नवा खणखणीत पर्याय दाखवून दिला आहे, यात वाद नाही !

नेभळट, कोमट बॉलिवूडला दणकट, ‘धुरंधर’ धक्का
प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार -
चंदेरी पडद्यावरच्या एका गर्जनेने वर्ष संपले. ती गर्जना आहे ‘धुरंधर’ची. २१ दिवसात हजार कोटी रुपयांचा गल्ला जमवून या सिनेमाने जागतिक विक्रम प्रस्थापित केला. यावर्षीची ही सर्वात जास्त कमाई. देशाच्या राष्ट्रवादाचा नूर आता पालटला असून, राजकारणाकडून तो लोकप्रिय कल्पकतेकडे वळला आहे. चित्रपटांचा प्रेक्षक आता त्यांना जे दाखवले जाते ते पाहण्यावर समाधान मानत नसून देशाची भावनिक ‘पल्स’ काय असेल, हे ठरवू लागला आहे. २०२५ या संपूर्ण वर्षात गाजावाजापेक्षा स्थिर कामगिरी करणारे सिनेमे येत राहिले. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत १७ सिनेमानी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. २०२४ साली याच कालखंडात केवळ दहा सिनेमांना हा पल्ला गाठता आला होता.
पहिल्या आठवड्यापासून धुरंधर ब्लॉकबस्टरपेक्षा जास्त काही ठरला. त्याची जाहिरात, दिशा, संवाद आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता हे सगळे एकाचवेळी घणाघाती आणि साजरे करावे असे होते. देशभक्तीपर भावना भौगोलिक सीमांच्या पलीकडे जातात हे या सिनेमाने दाखवून दिले. फेब्रुवारीत विकी कौशलच्या ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली. भारतीय इतिहास आणि त्याचे नायक हे आता किरकोळ विषय राहिलेले नाहीत. उलट मुख्य चलनी विषय झाले आहेत हे ‘छावा’ने दाखवून दिले.
धुरंधरने प्रतीकात्मकता सिनेमाच्या भाषेत व्यक्त केली. विरोधाभास आणि नैतिक जंजाळात दीर्घकाळापासून अडकून पडलेल्या प्रेक्षकांना या सिनेमातला थेटपणा आवडला. प्रेक्षकांना धुरंधर भावनिकदृष्ट्या आपला वाटला, यामागची कारणे फार खोल आहेत. वर्षानुवर्षे हिंदी सिनेमा आपल्या मोठ्या प्रेक्षकवर्गाशी संपर्क गमावून बसला. कारण या वर्गाला काय पाहिजे हे या सिनेमाच्या जनकांना कळलेच नाही. मोठमोठे चित्रपट निर्माते आणि त्या क्षेत्रातील सर्जनशील मंडळी सबगोलंकार विषयात घुटमळत राहिली. देशभक्ती हा त्यांना कोपऱ्या कापऱ्यातला विषय वाटला. ‘देशी’ वास्तवाकडे दुर्लक्ष करून ‘परदेशी’ चेहेऱ्यामोहोऱ्याच्या कथा येत राहिल्या. साधारणत: २०१९ पासून भारताच्या राजकीय आणि सांस्कृतिक परिभाषेत बदल होत गेले. अभिजनांचे पुरोगामित्व, नागरी उपरोध, जागतिक आकांक्षा आणि नैतिक बोटचेपेपणा मागे पडत जाऊन राष्ट्रीय भावनांचे प्रकटीकरण जोमदारपणे होऊ लागले. हा ठाम राष्ट्रवाद चित्रपटाच्या माध्यमातून दृश्य संस्कृतीत प्रतिबिंबित झाला.
याआधी ‘उरी’, ‘द सर्जिकल स्ट्राइक’, ‘द काश्मीर फाइल्स’, ‘द केरला स्टोरी’ यांनी बदलाचे सूचन केले होते. मात्र ‘धुरंधर’ने हा बदल ठोकून ठाकून पक्का केला. हा सिनेमा नव्या भावनिक मुख्य प्रवाहाची धावपट्टी ठरेल असे दिसते. त्याचा प्रभाव इतका स्पष्ट आहे की आपल्या भाषेत बोलायची भीती वाटणाऱ्या या उद्योगाला आता तसे करावेसे वाटेल. छोट्या शहरांमधले लेखक, चित्रपट निर्माते यांची नवी पिढी, डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे मुख्य प्रवाहात उतरले आहेत. जे खरे आहे ते विकले जाते. स्वतःच्याच ओळखीची लाज वाटणार नाही अशा कथा प्रेक्षकांना हव्या आहेत. चित्रपट उद्योगातील मूठभरांची घराणेशाही आणि जुनी वीण आता ढिली होऊ लागली आहे.
- असे असले तरी आक्रमकता दाखवली की यश मिळते असा धुरंधरच्या यशाचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये. मनातले बोलता आले यात सिनेमाचे यश आहे; वादविवादात नाही. प्रबळ होत चाललेला राष्ट्रवाद २०२५ साली धुरंधरमध्ये प्रकटला. कोणाची बेअदबी न करता आत्मविश्वासाने, पूर्वग्रहरहित अशा गर्वाने तो कसा प्रकट करावा याचा हा सिनेमा आदर्श ठरला. ही तारेवरची कसरत करताना या सिनेमाने हेही दाखवून दिले की समीक्षक गृहीत धरतात त्यापेक्षा प्रेक्षक जास्त प्रगत असतात. देशभक्तीपर विषय त्यांना द्वेष न बाळगता समजून घेता येतात.
अर्थात या बदलामध्ये काही आव्हाने दडलेली आहेत. सिनेमा आता नव्या भाषेत बोलू लागला असला तरीही पुढे काय होईल याचा अंदाज येणे किंवा त्याच त्याच मसाल्याची पुनरावृत्ती असे सापळे टाळले पाहिजेत. किती राष्ट्रभक्तीपर सिनेमे पुढच्या दशकात येतात हे महत्त्वाचे नाही, तर त्यातील मानवी अनुभव ते किती खोलवर जाऊन प्रकट करतात हे महत्त्वाचे ठरेल. प्रत्येक सिनेमाने त्याची ओळख तारस्वरात सांगण्याची गरज नाही; पण कुठल्याही सिनेमाला त्याची भीतीही वाटता कामा नये. नवे जे काही सापडले आहे त्यातच अडकून पडण्याचा मोहसुद्धा टाळला पाहिजे.
अभिरुचीची जुनी परंपरा, देशाने काय विचार करावा यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणारे निर्माते, समीक्षक आणि दिग्दर्शकांचे कोंडाळे यांचा प्रभाव ओसरला आहे. जगाची कवाडे बंद न करता जागतिक विषय बाजूला सारून आपल्या खोलवरच्या मुळाशी बांधीलकी दाखवल्यामुळे हा इतिहास घडला. धुरंधर केवळ बॉक्स ऑफिसवर गाजला असे नव्हे तर २०२५ साली देशाच्या सांस्कृतिकतेशी त्याने सांगड घालून दिली. त्याचे प्रतिध्वनी सिनेमाच्या पलीकडे राजकारण, माध्यमे आणि लोकांच्या रोजच्या संवादातही पोहोचले. आता २०२६ साल सुरू होत असताना ‘धुरंधर’ हा सिनेमा चर्चेत राहील. श्रद्धेची ही लाट आणखी खोलवर जाईल की गलबल्यात नाहीशी होईल हे येणारा काळ ठरवेल; पण एक गोष्ट नक्की - बॉलिवूड आजवर बेगडी जागतिक सुरांची नक्कल करत आले. २०२५ या सरत्या वर्षाने त्याला स्वतःचा आवाज ऐकायला शिकवले आहे.