१.७५ कोटींचं कर्ज ११ वर्षांत झालं ₹१४७ कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 04:44 IST2026-01-06T04:43:44+5:302026-01-06T04:44:00+5:30
अनेक महागड्या गोष्टींसाठीही कर्ज आणि ‘सुलभ हप्ते’ अनेकांना सोपा पर्याय वाटतो.

१.७५ कोटींचं कर्ज ११ वर्षांत झालं ₹१४७ कोटी!
पूर्वी कर्ज घेणं म्हणजे अतिशय कमीपणाचं समजलं जाई. त्यामुळेच आपल्या वाडवडिलांची पिढी कायम कर्जाच्या विरोधातच राहिली. अगदीच कंठाशी आल्याशिवाय आणि आता दुसरा काही पर्यायच शिल्लक राहिला नाही म्हटल्यावरच त्यांनी कर्जाचा आणि तेही कमीत कमी कर्जाचा विचार केला. आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अगदी फ्रिज, वॉशिंग मशीनसारख्या घरातल्या छोट्या-मोठ्या वस्तूंपासून ते मोबाइलपर्यंत तसंच अनेक महागड्या गोष्टींसाठीही कर्ज आणि ‘सुलभ हप्ते’ अनेकांना सोपा पर्याय वाटतो.
व्याजदर जास्त असला तरी खेडोपाडी तर आजही अनेकजण अडीनडीला सावकाराचीच पायरी चढतात. असाच एक प्रकार नुकताच सिंगापूरमध्ये घडला आहे. तिथल्या एका व्यक्तीनं सिंगापुरी अडीच लाख डॉलर्सचं (सुमारे १.७५ कोटी रुपये) कर्ज घेतलं, पण काहीच वर्षांत या कर्जाचा आकडा किती वाढावा? - तो तब्बल सिंगापुरी २.१ कोटी डॉलर्सपर्यंत (सुमारे १४७ कोटी रुपये) वाढला! हे कर्ज फेडण्यासाठी कर्जदार व्यक्तीनं स्वत:चं घर विकून कर्जाचे पैसे दिले, तरीही त्याचं कर्ज फिटलं नाही.
या कर्जाचा व्याजदर इतका प्रचंड होता, की जगातील सर्वांत श्रीमंतांपैकी एक अब्जाधीश इलॉन मस्कदेखील अशा सावकारी व्याजामुळे कंगाल झाले असते! या प्रकारामुळे अनेक नागरिकांचे डोळे आश्चर्यानं पांढरे झाले असून न्यायालयालाही धक्का बसला आहे. या कर्ज प्रकरणात न्यायालयानं फेरसुनावणीचे आदेश दिले आहेत. कर्जाची रक्कम इतकी कशी वाढली यावर न्यायाधीशांनी कडक टिप्पणी केली.
सिंगापूरमधल्या या कर्जदार व्यक्तीनं २०१० मध्ये परवानाधारक मनीलेंडरकडून कर्ज घेतलं. दरमहा चार टक्के व्याज निश्चित करण्यात आलं. म्हणजे या कर्जाचा वार्षिक व्याजदर झाला ४८ टक्के! याशिवाय हप्ता वेळेवर न भरल्यास ८ टक्के मासिक विलंब व्याज लागू होत होतं.
हे कमी म्हणून की काय, वेळेवर हप्ता न भरला गेल्यास लेट-पेमेंट प्रोसेसिंग चार्ज म्हणून त्यावर २,५०० सिंगापुरी डॉलर्सही दरमहा आकारले जात होते. एखादा जरी हप्ता चुकला तर त्यावर ९६ टक्के वार्षिक दराने व्याज लागू होत होतं. म्हणजेच, समजा एक कोटीचं कर्ज घेतलं तर हप्ता चुकल्यावर फक्त एका वर्षाचं व्याजच जवळपास एक कोटीच्या आसपास पोहोचणार!!
या कर्जदार व्यक्तीचं कर्ज चार वर्षांतच सिंगापुरी अडीच लाखांवरून ३० लाखांवर पोहोचलं. व्याज, दंड आणि इतर चार्ज सतत जोडले जात राहिले. परिणामी, अवघ्या चार वर्षांत त्याचं कर्ज ३० लाख डॉलर्सपर्यंत वाढलं, जे मूळ रकमेपेक्षा कित्येक पटींनी जास्त होतं. तरीही व्याज आणि चार्ज थांबत नव्हते. २०२१ पर्यंत हे कर्ज २.१ कोटी डॉलर्सपर्यंत जाऊन पोहोचलं.
कर्ज फेडण्यासाठी अखेर कर्जदाराला आपलं घरही विकावं लागलं. जुलै २०१६मध्ये त्यानं आपलं घर वीस लाख डॉलर्सला (सुमारे १४ कोटी रुपये) त्याच मनीलेंडिंग कंपनीच्या डायरेक्टरला (जबरदस्ती) विकावं लागलं. एखाद्या व्यक्तीला किती नाडावं आणि त्याला किती पिळून घ्यावं याचा हे उदाहरण म्हणजे उत्तम नमुना आहे. घर विकल्यानंतर कर्जदाराला त्याच डायरेक्टरसोबत भाडेकरार करावा लागला आणि स्वत:च्याच घरात तो भाडेकरू म्हणून राहू लागला!