लेख: आपले आकाश प्रवासासाठी सुरक्षित आहे का?
By विजय दर्डा | Updated: February 3, 2026 07:05 IST2026-02-03T07:04:04+5:302026-02-03T07:05:47+5:30
Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे कर्तबगार नेते अजितदादा यांना आपण गमावले आहे. त्यांच्या केवळ आठवणी उरल्या आहेत. याआधीही अनेक महत्त्वाच्या लोकांना आपण विमान अपघातात गमावले आहे. आता अजितदादा गेले. अशा अपघातांतून तरी आपण धडे घेणार का?

लेख: आपले आकाश प्रवासासाठी सुरक्षित आहे का?
डॉ. विजय दर्डा
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड,
लोकमत समूह
महाराष्ट्राचे कर्तबगार नेते अजितदादा यांना आपण गमावले आहे. त्यांच्या केवळ आठवणी उरल्या आहेत. मागच्या विधानसभा अधिवेशनावेळी महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांसाठी मी नागपूरमध्ये सन्मान भोजनाचे आयोजन केले होते. त्यावेळी दादा आले. अतिशय उत्साहात भेटले. एरव्ही गंभीर राहणाऱ्या अजितदादांच्या डोळ्यांत त्यादिवशी वेगळीच चमक होती. व्यक्तिमत्त्वात उत्साह ओसंडून वाहत होता. ‘ज्या इमारतीत आपण राहता तेथेच माझा मुलगा पार्थ राहायला येतो आहे. मी घर पाहायला येईन, तेव्हा पुन्हा भेटू आणि भोजन करू... गप्पा मारू’, असे त्यांनी म्हटल्यावर मी गमतीने म्हणालो होतो, ‘दादा आपण केवळ आनंद साजरा करू.’ नियतीचा संकेत काय असतो पाहा. गोष्ट प्रत्यक्षात येता येता राहून गेली. दादा आठवणींचे इंद्रधनुष्य होऊन गेले. जाणारे कधी परत येत असतात काय? फक्त आठवणी तेवढ्या राहतात.
आपले राजकीय गुरु आणि काका शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. फरक फक्त इतकाच होता की, शरदचंद्र पवार हसत हसत राजकारण करतात आणि अजितदादा बेधडक होते. हो तर हो, नाही तर नाही. पवार साहेबांप्रमाणे सूर्योदयाबरोबर अजितदादांची दिनचर्या सुरू होत असे. पहिली बैठक ठीक ७ वाजता. मुंबईमध्ये शनिवारी-रविवारी कितीही महत्त्वाचा कार्यक्रम असो ते सामील होत नसत; कारण त्यातला एक दिवस पुणे आणि दुसरा बारामतीसाठी राखीव असायचा.
दादांच्या आठवणी सांगाव्या तेवढ्या थोड्याच. मात्र याक्षणी ‘विमान प्रवास इतका असुरक्षित का होत आहे?’ हा प्रश्न मला त्रास देतो आहे. भारतात विमान प्रवास किती सुरक्षित आहे, याबाबत आकडेवारी दाखवून दावे केले जातात. जागतिक विमान प्रवास सुरक्षिततेच्या श्रेणीत आपण ११२ वरून ५५ व्या स्थानावर पोहोचलो आहोत. पण मग चुकते कुठे आहे? रस्त्याने प्रवास करताना भीषण दुर्घटनेत सापडल्यावरही जीव वाचण्याची शक्यता असते. परंतु, विमान प्रवासात एक छोटीशी चूकसुद्धा सर्व प्रवाशांच्या मृत्यूचे कारण ठरते.
भारतात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी विमान प्रवासाचे अनेक नियम, कायदे आहेत; तरीही अशा दुर्घटनांमध्ये आपण आत्तापर्यंत किती लोक गमावून बसलो आहोत! होमी भाभा, बिपीन रावत, संजय गांधी, माधवराव शिंदे, विजय रूपाणी, ओपी जिंदाल, जी. एम. सी. बालयोगी, वाय. एस. रेड्डी, दोरजी खंडू, सायप्रिअन संगमा...
१९६५ च्या युद्धात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री बळवंतराय मेहता यांच्या विमानाला पाकिस्तानने सैन्याचे विमान समजून पाडले होते. ते प्रकरण वेगळेच होते, हे खरे आहे. पण विमान अपघातातून थोडक्यात वाचलेल्यांचीही यादी वसंतराव नाईकांपासून देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पुष्कळ मोठी आहे.
हेलिकॉप्टर उतरल्यावर धुळीच्या प्रचंड लोटात ते दिसेनासे झाले, असे दृश्य राहुल गांधी आंध्र प्रदेशात निवडणूक प्रचार दौऱ्यावर असताना मी पाहिले आणि क्षणभर काळजाचा ठोका चुकला होता. मी आणि माझे बंधू राजेंद्र दर्डा हेलिकॉप्टरने मुंबईहून ठाण्याला जात होतो. १०-१५ मिनिटांचा प्रवास. परंतु धुके, प्रदूषण इतके की समोर काही दिसत नव्हते. त्या आकाशमार्गात डोंगर, उंच इमारती आहेत. मी देवाचे नामस्मरण करतच तो प्रवास केला. कुठे विमानाची पक्षाशी टक्कर झाली, कुठे धावपट्टीवर कुत्रे आले, अशा बातम्या हल्ली नित्याच्या. लेझर किरणांमुळे अनेकवेळा त्रास होत असतो, अशी तक्रारही अनेक पायलट्सनी केली आहे.
अजितदादांच्या चार्टर्ड विमानाला झालेल्या अपघातानंतर समोर येणाऱ्या गोष्टी आश्चर्यात टाकणाऱ्या आहेत. विमानात बिघाड होता, असे सांगितले जाते. बारामती विमानतळावर वाहतूक नियंत्रण यंत्रणा नाही. विमान उतरण्यासाठी लागणारी उपकरण यंत्रणाही नाही. स्थानिक फ्लाइट ट्रेनिंग स्कूलचे प्रशिक्षक रेडिओ कम्युनिकेशन सांभाळतात. पायलटला धावपट्टी शोधण्यासाठी थेट उन्हाची झळ डोळ्यावर येत असताना पाहावे लागते आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पायलट कॅप्टन सुमित कपूर यांचे मदिरा प्रेम. विमान उड्डाणाच्या आधी ते नशेत असल्याचे आढळल्याने डीजीसीएने त्यांना तीन वर्षांसाठी निलंबितही केले होते. अशा कॅप्टनच्या हातात विमान दिलेच का गेले? कमर्शियल पायलटची झोप सात तासांची झाली आहे किंवा नाही, त्याचप्रमाणे ते नशेत तर नाहीत, याची कसून तपासणी होत असते; परंतु चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टरच्या बाबतीत या नियमांचे पालन काटेकोरपणे होते का?
सुरक्षाव्यवस्था ठीक नसलेल्या विमानतळांचा वापर का केला जातो? भले एखाद्या विमानतळावर महिन्या-दोन महिन्यांतून एखादे विमान उतरत असेल, पण तरीही सुरक्षेची व्यवस्था कडेकोटच असायला हवी. देशाच्या सर्वच राज्यांत विमानतळावरील सुरक्षिततेकडे लक्ष दिले गेले पाहिजे. परंतु, विकसित असलेल्या महाराष्ट्रामध्ये याबाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अजितदादांना कोणी परत आणू शकत नाही. परंतु, अशी विमान दुर्घटना पुन्हा कधी होणार नाही आणि कोणाचेही प्राण जाणार नाहीत, याची खबरदारी आपल्याला घ्यावीच लागेल.