पब्लिसिटीची धांदल, ब्रेनवॉशिंगचा भडिमार, पण प्रबोधनाचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 04:44 IST2026-03-25T04:44:52+5:302026-03-25T04:44:52+5:30
माहितीचा पूर प्रचंड, पण योग्य माहितीचा अभावही! त्यावरील उत्तर त्रागा करणे, हताश होण्यात नसून प्रबोधनाच्या अभिनव कल्पना शोधण्यात आहे.

पब्लिसिटीची धांदल, ब्रेनवॉशिंगचा भडिमार, पण प्रबोधनाचे काय?
अमृत बंग, सहसंचालक, ‘सर्च’ ‘निर्माण’ या युवा उपक्रमाचे प्रमुख
महाराष्ट्राला सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींचा एक उत्तुंग वारसा आहे. समाजशास्त्रज्ञ मिलिंद बोकील मांडतात त्या प्रकारे याच्या किमान तीन मुख्य धारा आहेत. एक, महादेव गोविंद रानडे प्रणीत मंडळीकरण अथवा संस्थात्मक काम उभे करणे आणि त्याद्वारे सामाजिक सेवेचे वा इतर उपक्रम करणे. दोन, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांची विद्रोहाची परंपरा. आणि तीन, गोपाळ गणेश आगरकर, रघुनाथ धोंडो कर्वे यांची प्रबोधनाची, समाजात विवेकवादी विचार पसरवण्याची परंपरा. माझ्या मते आपल्याकडे एक चौथी धारादेखील आहे – ज्यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधन यांचा समाजातले प्रश्न अभ्यासण्यासाठी आणि त्यावर उत्तरे शोधण्यासाठी उपयोग करण्यात आलाय. मात्र त्याविषयी नंतर कधीतरी.
गेल्या काही दशकांमध्ये होत असलेले सामाजिक कार्याचे बदलते स्वरूप बघता वरीलपैकी तिसरी परंपरा जरा अशक्त झाल्यासारखी दिसते. लोकांना विचार करायला प्रवृत्त करणे, सत्य – असत्य याची शहानिशा करणे, तथ्यांवर आधारित मांडणी व मुद्द्यांचा स्वीकार करणे, प्रश्न विचारणे तसेच प्रश्न विचारायला उद्युक्त करणे, जिज्ञासा व खुलेपणा यावर आधारित विचार प्रक्रिया घडविणे, इ. विविध पद्धतींनी समाजाला अधिक विवेकी व शहाणे करून सोडणे हे अत्यंत महत्त्वाचे काम जरा मागे पडले आहे. आपल्या अवतीभवती असलेला बाबा-बुवांचा सुळसुळाट, विविध सणांच्या आक्रमक उत्सवाचे वाढते स्तोम, आणि जीवनाच्या विविध अंगांमध्ये पसरलेली अवैज्ञानिकता हे बहुधा याचेच परिणाम आहेत. सोशल मीडिया व मार्केटिंगद्वारे प्रचाराचा भडिमार तर मोठ्या प्रमाणात होतो पण त्याचा उद्देश बऱ्याचदा ‘पब्लिसिटी’ वा ‘ब्रेनवॉशिंग’ असतो, प्रबोधन नाही.
या पार्श्वभूमीवर ‘निर्माण क्विझ’ हा एक वेगळा उपक्रम गडचिरोलीतल्या तरुणांसाठी आम्ही करून बघितला. गडचिरोली जिल्ह्यासमोरील महत्त्वाची आव्हाने, जिल्ह्यातील काही उत्तम सामाजिक कामे व कार्यरत युवा, जिल्ह्याच्या आजवरच्या इतिहासातील काही उत्तुंग बाबी (गडचिरोली म्हणजे निव्वळ मागास असे नाही हे कळण्यासाठी) आणि युवांच्या विकासासाठीचे काही महत्त्वाचे मुद्दे अशांवर आधारित २५ प्रश्न आम्ही काढले. गेल्या दोन वर्षात गडचिरोलीतील ७३ वेगवेगळ्या शाळा, कॉलेजेसमधील एकूण ६७०६ विद्यार्थ्यांसोबत आम्ही ही प्रश्नमंजूषा घेतली.
निव्वळ माहिती देण्याऐवजी प्रश्न विचारून कुतूहल निर्माण करणे व मग एका आकर्षक पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे उत्तरे समजावून सांगणे, गंमत यावी आणि लक्ष टिकून राहावे म्हणून स्पर्धात्मक खेळ करणे, मुला-मुलींनी एकमेकांची उत्तरे तपासणे व गुण देणे, आणि शेवटी पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देणे असे या उपक्रमाचे स्वरुप होते. उपदेश देण्याऐवजी उत्सुकता पैदा करण्यावर भर होता. आजकाल अनेक ठिकाणी शिक्षकांकडून ‘मुले लक्ष देत नाहीत’ अशी तक्रार ऐकण्यास मिळते.
आम्हाला मात्र या ‘गेमिफाईड एज्युकेटिव्ह क्विझ’ला तरुणांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. ६१% युवांना एकूण गुणांपैकी ४०%हून कमी गुण आणि केवळ २% युवांना ८०%हून अधिक गुण मिळाले यावरून सध्या असलेला योग्य माहितीचा प्रचंड अभावदेखील दिसला. मात्र त्यावरील उत्तर त्रागा करण्यात, हताश होण्यात नसून प्रबोधनाच्या अभिनव कल्पना शोधण्यात व अंमलात आणण्यात आहे हे देखील जाणवले.
amrutabang@gmail.com