नेतन्याहूंसह ३५ जणांवर खटला, ४६०० वर्षे शिक्षा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 08:54 IST2026-04-17T08:53:35+5:302026-04-17T08:54:25+5:30
Benjamin Netanyahu : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह ३५ जणांवर यासंदर्भात खटला दाखल करण्यात आला आहे. इथवर ठीक आहे; पण यासाठी किती वर्षांच्या शिक्षेची मागणी करण्यात यावी?

नेतन्याहूंसह ३५ जणांवर खटला, ४६०० वर्षे शिक्षा?
ही घटना आहे गेल्यावर्षीच्या सप्टेंबरमधली. ‘सुमुद फ्लोटीला’ नावानं एक रिलिफ मिशन राबवलं जात होतं. जहाजांचा एक ताफा मदत घेऊन गाझाकडे जात होता. या जहाजांमधून अन्नसामग्री, औषधं आणि इतर आवश्यक मदत पाठवली जात होती. जेव्हा जहाजांचा हा ताफा आंतरराष्ट्रीय समुद्रात होता, त्यावेळी इस्रायली नौदलानं या ताफ्याला अडवलं. त्यांचे सैनिक जहाजांवर चढले, जहाजावर असलेल्या लोकांना त्यांनी ताब्यात घेतलं आणि जहाजांना पुढं जाण्यापासून रोखलं. तुर्कीचं म्हणणं आहे, ही कारवाई आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात होती, कारण ही घटना आंतरराष्ट्रीय पाण्यात घडली होती आणि जहाजं मदतसामग्री घेऊन जात होती. याच कारणामुळे या संपूर्ण प्रकरणाला गंभीर गुन्हा मानत तुर्कीमध्ये खटला दाखल करण्यात आला आहे.
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह ३५ जणांवर यासंदर्भात खटला दाखल करण्यात आला आहे. इथवर ठीक आहे; पण यासाठी किती वर्षांच्या शिक्षेची मागणी करण्यात यावी?.. आरोपींविरुद्ध मानवतेविरुद्धचे गुन्हे, नरसंहार, बेकायदेशीर ताबा, छळ आणि लूट यांसारखे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत आणि त्यासाठी जन्मठेपेसोबत १,१०२ वर्षांपासून ४,५९६ म्हणजेच जवळपास ४,६०० वर्षांपर्यंत अतिरिक्त शिक्षेची मागणी करण्यात आली आहे!
४,६०० वर्षांपर्यंतच्या शिक्षेची मागणी ऐकून अनेकांचे डोळे पांढरे झाले आहेत. कोणतीही व्यक्ती इतकी वर्षे जगू शकेल का, असा प्रश्न उपस्थित करीत अनेकांनी त्याबाबत आश्चर्यही व्यक्त केलं आहे, पण यापूर्वीही अशा शिक्षा ‘ठोठावल्या’ गेल्या आहेत, मात्र त्या प्रतीकात्मक असतात. विशेषतः अमेरिकेत अनेकदा आरोपींना शेकडो किंवा हजारो वर्षांच्या शिक्षा सुनावल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ, चार्ल्स स्कॉट रॉबिन्सन या आरोपीला ओक्लाहोमा येथे १९९४ साली बाललैंगिक अत्याचारांच्या अनेक गुन्ह्यांसाठी एकत्रितपणे ३० हजार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. यामागे तत्त्व असे असते की प्रत्येक गुन्ह्यासाठी स्वतंत्र शिक्षा दिली जाते आणि त्या सलग पद्धतीने जोडल्या जातात. प्रत्यक्षात एखादी व्यक्ती इतकी वर्षे जगू शकत नसली तरी, न्यायालय गुन्ह्यांची गंभीरता दाखवण्यासाठी अशा शिक्षांची रचना करते.
एरियल कॅस्ट्रो याला २०१३ मध्ये एक हजार वर्षांहून अधिक कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्याचप्रमाणे बर्नार्ड मॅडोफ याला २००९ मध्ये १५० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. अशा शिक्षांचा उद्देश ‘गुन्ह्यांचे गांभीर्य अधोरेखित करणे आणि पॅरोलची शक्यता संपवणे’ हा असतो.
युरोप किंवा इतर अनेक देशांत मात्र शेकडो, हजारो वर्षांची शिक्षा देण्याची प्रथा तिथे नाही. तिथे मुख्यत: ‘आजीवन कारावास’ (life imprisonment) हीच कमाल शिक्षा असते. नॉर्वेमध्ये कमाल शिक्षा साधारण २१ वर्षे (विशेष परिस्थितीत वाढवता येणारी) आहे. काही वेळा अशा प्रचंड कालावधीच्या शिक्षांची मागणी राजकीय किंवा प्रतीकात्मक कारणांसाठीही केली जाते. आंतरराष्ट्रीय राजकारणात एखाद्या नेत्याविरुद्ध खटला दाखल करताना किंवा मानवाधिकार उल्लंघनांच्या आरोपांमध्ये ‘हजारो वर्षांची शिक्षा’ ही मागणी प्रत्यक्ष अंमलबजावणीपेक्षा त्यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न असतो. विशेषतः युद्धगुन्हे, नरसंहार किंवा मोठ्या प्रमाणातील मानवी हक्क उल्लंघनांमध्ये ही भाषा वापरली जाते.