Youth Festival is a folk art scene | युवक महोत्सवात झाला लोककलेचा जागर

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील शाहू महाराज नाट्यगृहात अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद धुळे शाखेने युवक महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी पोवाडा, लावणी, पंढरीची वारी आदी लोककलांचा जागर युवकांनी केला.
माजी संरक्षण राज्यमंत्री खा. सुभाष भामरे यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. अध्यक्षस्थानी अ‍ॅड़ एम. एस. पाटील होते. यावेळी शाहीर देवानंद माळी, शाहीर परिषदेचे विभागीय अध्यक्ष विनोद ढगे, शिवसेनेचे हिलाल माळी, परिषदेचे कार्याध्यक्ष आप्पा खताळ, उपमहापौर कल्याणी अंपळकर, डी. एन. पिसोळकर, पापालाल पवार, श्रावण वाणी, सुधाकर बेंद्रे, माणिकराव शिंदे, मंडा माळी, गंभीर बोरसे, वंदना थोरात, मीना भोसले, डॉ. रमेश जैन, आरीफखान पठाण, दत्तात्रय कल्याणकर आदी उपस्थित होते.
युवक महोत्सवात २१ संघानी विविध लोककलांचे सादरीकरण केले. आर सी पटेल महाविद्यालयाच्या संघाने सादर केलेल्या ‘लेक वाचवा लेक शिकवा’ प्रबोधन नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावला. कोळी गीत अहिराणी गीतांचा सुरेख संगम सादर करणारा आर्ट सर्कल ग्रुप द्वितीय तर उत्कृष्ट पद्धतीने जोगवा सादर करणाऱ्या कापडण्याच्या कृष्णाजी माउली भजनी मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला.
प्रत्येक संघाला लोककला सादर करण्यासाठी १५ मिनिटे देण्यात आली होती. परीक्षक म्हणून प्रा. विलास चव्हाण, प्रा. डॉ. कृष्णा पोतदार, राजू मिस्तरी यांनी काम पहिले.
सध्याची तरुणाई सोशल मीडिया आणि मोबाईल मध्ये गुरफटलेली आहे. पारंपारिक लोककलांपासून युवा दूर जातो आहे. त्यांना लोककलेकडे वळवणे मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन खासदार सुभाष भामरे यांनी यावेळी केले.
दरम्यान, अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद कलावंतांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना असल्याचे विभागीय अध्यक्ष विनोद ढगे यांनी सांगितले. लोककलावंतांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली. आप्पा खताळ यांनी प्रास्ताविक केले. युवकांना प्रोत्साहन देणे व जेष्ठांचा सन्मान करणे हा युवक महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. शाहीर परिषद धुळे शाखेच्या वतीने सुरु असलेल्या वृद्धाश्रमाच्या कायार्ची माहिती त्यांनी दिली
शहरात लोककला प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करीत आप्पा खताळ यांनी खा. भामरे, उपमहापौर अंपळकर याना साकडे घातले. खा़ भामरे यांच्यासह महापौर अंपळकर यांनी लोककला प्रशिक्षण केंद्रासाठी जागा देण्याचे आश्वासन दिले़
प्रदीप वाणी याना लोककला भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच दिलीप हिरामण पाटील याना काव्यरत्न, अधिकार बोराडे याना स्वरसम्राट पुरस्कार, श्रावण वाणी याना शब्दबंधू , मंडा माळी याना मुक्ताबाई तर इंदुबाई माळी यांना मीराबाई पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच परिषदेच्या विभागीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्धल श्रावण वाणी यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. राम जाधव व राकेश गाळनकर यांनी केले.

Web Title: Youth Festival is a folk art scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.