कोरोनामुळे यात्रोत्सव कार्यक्रम रद्द, खंडेराव मंदिरात फक्त महाआरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:10 IST2021-02-28T05:10:39+5:302021-02-28T05:10:39+5:30

२७ फेब्रुवारीपासनू खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव सुरू होणार होता, मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे़ ...

Yatra festival canceled due to corona, only Maha Aarti at Khanderao temple | कोरोनामुळे यात्रोत्सव कार्यक्रम रद्द, खंडेराव मंदिरात फक्त महाआरती

कोरोनामुळे यात्रोत्सव कार्यक्रम रद्द, खंडेराव मंदिरात फक्त महाआरती

२७ फेब्रुवारीपासनू खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव सुरू होणार होता, मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे़ यात्रोत्सवाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून मंदिरातच फक्त महाआरतीचा कार्यक्रम सुरक्षित अंतर राखत ठेवण्यात आला होता़

यावेळी आमदार काशिराम पावरा, भाजपाचे प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पीएसआय मुरकुटे, छगन गुजर, तालुकाध्यक्ष किशोर माळी, अरुण धोबी, वासुदेव देवरे, नितीन गिरासे, भरत राजपूत, राजू टेलर, सतीश भोंगे महाराज, मंदिर संस्थानचे अध्यक्ष कैलास धाकड, संजय आसापुरे, विनायक वाघ, आबा धाकड आदी उपस्थित होते़

खान्देशातील खंडोबाची एक महत्त्वाची यात्रा म्हणून शिरपूर यात्रा आहे. अरुणावती नदीच्या काठावर व नदीपात्रात ही यात्रा दोन आठवडे भरते़ यात्रोत्सवात सर्वात मोठी उलाढाल मेवाशी मेळाव्यात होत असते़ या काळात मार्केट कमिटी सुमारे ३ कोटीच्यावर उलाढाल करते़ यात्रोत्सवात राजस्थान, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यातून घोडे, बैल, म्हशी विक्रीसाठी येतात़

मेवाशी मेळावा मार्केट कमिटीच्या आवारात भरत असतो़ या ठिकाणी चारा मुबलक मिळत असल्यामुळे तब्बल महिनाभर हा मेवाशी मेळावा भरत असतो़ या यात्रोत्सवात खर्दे बु़ व शिंगावे येथील ग्रामस्थ तगतराव सजवून आणून अनेक वर्षापासून ही परंपरा त्यांनी जोपासली आहे़ खंडेराव बाबा भक्त मंडळाने लोकसहभागातून या मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे. मंदिराचे भव्य आकर्षक रूप यात्रेकरूंना नेहमीच आकर्षित करीत आहे. याचबरोबर हा परिसरदेखील प्रेक्षणिय ठरावा म्हणून विकास कामे झाली आहेत.

अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेल्या धार्मिक कार्यातून या मंदिराची स्थापना झाली असावी असे सांगितले जाते. नवसाला पावणारा देव म्हणून खंडेराव महाराज मानले जातात. येथील कालू बाबा हे खंडेरावांची निस्सीम सेवा, पूजाअर्चा करुनही मूल बाळ नव्हते म्हणून व्यथित होते. खंडेरावाला स्वत:चे शिर अर्पण करण्याचा नवस करून मूल होण्यासाठी त्यांनी साकडे घातले. त्यांनी शिर अर्पण केल्यावर रक्त न निघता भंडारा निघाला, अशी आख्यायिका आहे. नवस करुन देवाला साकडे घालून आपली मनोकामना पूर्तीसाठी यात्रेच्या काळात मान-मानता, नवस करणारे अनेक नवदाम्पत्य व भाविक येत असतात.

कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याच्या भीतीमुळे प्रशासनाने यंदा यात्रौत्सवाला परवानगी नाकारली होती़

Web Title: Yatra festival canceled due to corona, only Maha Aarti at Khanderao temple