डोळ्यात धूळ गेल्याने दुचाकी घसरली, पाठीमागे बसलेल्या सख्ख्या बहिणीचा मृत्यू; भावावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:07 IST2025-11-24T16:05:32+5:302025-11-24T16:07:59+5:30
धुळ्यात बहिणीच्या अपघाती मृत्यूप्रकरणी भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोळ्यात धूळ गेल्याने दुचाकी घसरली, पाठीमागे बसलेल्या सख्ख्या बहिणीचा मृत्यू; भावावर गुन्हा दाखल
Dhule Accident: धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमडाळे गावाजवळ अपघाताची एका हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात पाठीमागे बसलेल्या विवाहित बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुचाकी चालवणाऱ्या भावाच्या डोळ्यात अचानक धूळ गेल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. या प्रकरणी पोलिसांनी दुचाकीचालक भावाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
लामकाणी येथे राहणारा दुर्गेश सुनील बाविस्कर (वय २४) हा २० तारखेला दुपारी त्याची विवाहित बहीण नेहा मयूर कोठावदे (वय २५, रा. लामकाणी) हिला घेऊन एमएच-१८-सीएच-४२२४ या दुचाकीवरून प्रवास करत होता. निमडाळे गावाजवळून जात असताना अचानक दुर्गेशच्या डोळ्यांमध्ये धूळ गेली. धुळीमुळे त्याला पुढील रस्ता स्पष्ट न दिसल्याने त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्यावर घसरली.
उपचारादरम्यान बहिणीचा मृत्यू
दुचाकी घसरल्यामुळे झालेल्या या अपघातात पाठीमागे बसलेल्या नेहा कोठावदे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे बाविस्कर आणि कोठावदे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
भावावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
या घटनेनंतर, साहिल प्रवीण बाविस्कर यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार, पोलिसांनी दुचाकी चालवणाऱ्या दुर्गेश सुनील बाविस्कर याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दुचाकीवरून चक्कर येऊन पडल्याने मृत्यू
जळगावात दुचाकी चालवत असताना चक्कर येऊन पडल्याने गणेश प्रकाश गोनटे यांचा मृत्यू झाला. ही घटना २२ नोव्हेंबर रोजी रामेश्वर कॉलनीत घडली. दुचाकीवरून पडल्याने इसमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.