धुळे जिल्ह्यातील ६५० विद्यार्थ्यांना अभ्यास दौऱ्याची संधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 18:56 IST2019-11-26T18:55:59+5:302019-11-26T18:56:19+5:30
६५ शाळांमधून होणार विद्यार्थ्यांची निवड : पालकांचे संमतीपत्र घेणार

धुळे जिल्ह्यातील ६५० विद्यार्थ्यांना अभ्यास दौऱ्याची संधी मिळणार
आॅनलाइन लोकमत
धुळे :शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, या उद्देशाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ६५ गुणवत्तापूर्ण शाळांमधून ६५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विविधांगी ज्ञानवर्धक स्थळांना भेटी देण्याची संधी मिळेल.
स्थानिक स्वराज्य संस्थांसह शासकीय शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना राज्यांतर्गत असलेल्या नामांकित शैक्षणिक संस्था, शाळा, ऐतिहासिक स्थळ, वैज्ञानिक केंद्र, वस्तू संग्रहालय, प्राणी संग्रहालय, तारांगण, अभयाराण्य,आदी ठिकाणी भेट देता येणार आहे. त्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाºया उच्च प्राथमिक शाळांची निवड करण्यात येईल. या शाळा शाळा सिध्दीत उपक्रमात ‘अ’ गटात असाव्यात. तसेच मागील दोन ते तीन वर्षांत शाळा शंभर टक्के प्रगत असावी, शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळविलेले असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातून ६५ शाळा व प्रत्येक शाळेतून दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.तीस विद्यार्थ्यांमागे एका शिक्षकाचा समावेश असेल. निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३० ते ४० विद्यार्थ्यांचा एक गट असेल.या गटाची जबाबदारी एका शिक्षकावर असेल. अभियानांतर्गत अभ्यास दौºयासाठी जाणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र घेण्यात येणार आहे. दरम्यान यासाठी १ लाख ३० हजार रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे.