आरटीई आॅनलाईन प्रवेशाला तांत्रिक अडचणींचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:12 PM2020-02-22T23:12:26+5:302020-02-22T23:12:47+5:30

१३९६ अर्ज दाखल। स्क्रीनवर दिसणाऱ्या युजर आयडी, पासवर्डचा वापर करा

RTE Online Accessibility barriers to technical difficulties | आरटीई आॅनलाईन प्रवेशाला तांत्रिक अडचणींचा अडथळा

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे/दोंडाईचा : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत सुरू असलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचा अडथळा येत आहे़ दरम्यान, आतापर्यंत एक हजार ३९६ अर्ज दाखल झाले आहेत़
आरटीई पोर्टलवर आॅनलाईन अर्ज सादर करताना नविन नोंदणी केल्यावर मोबाईलवर एसएमएस येत नसल्याने गेल्या आठवडाभरापासून अर्ज सादर करण्याची प्रक्रीया ठप्प पडली आहे़ अर्ज सादर करण्यासाठी शेवटचे आठ दिवस शिल्लक राहिल्याने पालकांची चिंता वाढली आहे़ त्यामुळे आॅनलाईन अर्जासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे़
आरटीईसाठी १२ फेब्रुवारीपासून आॅनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाने सुरू केली आहे़ परंतु न्यू रजिस्ट्रेशन झाल्यावर पालकांच्या मोबाईलवर युझर आयडी आणि पासवर्डचा मॅसेज येत नसल्याने पुढील अर्ज भरता येत नाही़ तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने पालकांनी अर्ज सादर करु नये असा संदेश आॅनलाईन पोर्टलवर देण्यात आला होता़ आॅनलाईन अर्जासाठी २९ फेब्रुवारी शेवटचा दिवस असल्याने पालकांची चिंता वाढली आहे़ दरम्यान, तांत्रिक अडचणीमुळे पालकांना मोबाईलवर एसएमएस जात नाही़ न्यू रजिस्ट्रेशन केल्यावर स्क्रीनवर येणारा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड जतन करुन ठेवल्यास पालकांना अर्ज भरता येतील, असा नविन संदेश पोर्टलवर देण्यात आला आहे़ त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला असून अर्ज भरण्याची प्रक्रीया पुन्हा सुरू झाली आहे़
आरटीई अंतर्गत वंचीत व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. त्यानुसार आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया १२ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील १०३ शाळांमध्ये १ हजार २५९ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे़
शिक्षण हक्क कायदा अंतर्गत आर्थिक दुर्बल व वंचीत घटकांत मोडणाºया मुलांना सर्व माध्यमांच्या शाळेत एकूण प्रवेशाच्या २५ टक्के राखीव जागा या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतून भरण्यात येतात. परंतु अल्पसंख्यांक शाळांना हा कायदा लागू नाही़ जिल्ह्यात २०१३-१४ पासून आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानंतर मार्च-एप्रिल महिन्यात आॅनलाईन लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित करण्यात येतील़ यावेळी एकच लॉटरी काढली जाईल़ मेरीटनुसार प्रतिक्षा यादी तयार करुन प्रवेश दिले जातील़ आॅनलाईन लॉटरीत प्रवेश मिळाल्यावर देखील पालकांनी शाळेत जावून प्रवेश निश्चित केला नाही तर ती जागा रिक्त ठेवून अन्य बालकांना प्रवेश दिला जाईल़ पालकांना प्रवेश नोंदणी करतांना एक किलोमीटर, तीन किलोमीटर, व त्यापेक्षा अधिक अंतरातील केवळ १० शाळा निवडता येतील. परंतु प्रवेश एकाच शाळेत मिळणार आहे. आॅनलाईन नोंदणी करतांना पालकांनी उत्पन्नाच्या दाखल्यामधील बारकोड अर्जात नमूद करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याला आॅनलाईन प्रवेश मिळाल्यानंतर तसा एसएमएस शाळा व पालकांना पाठविण्यात येणार आहे. सबळ कारणाशिवाय कोणत्याही शाळेला प्रवेश नाकारता येणार नाही. प्रवेश नाकारणाºया शाळांवर कारवाई केली जाईल असा इशारा शिक्षण विभागाने दिलेला आहे.
जिल्ह्यातील १०३ शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश मोफत देण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी १०१३ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला होता. यावेळी १२५९ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. आरटीई प्रवेश अंतर्गत यावर्षी सहा शाळांची नव्याने भर पडलेली असून २२ जागा वाढल्या आहेत.गेल्यावर्षी फक्त ९७ शाळा होत्या. तर यावर्षी १०३ शाळांमध्ये हे प्रवेश दिले जातील. दरम्यान शहरातील नामांकित शाळांमध्येच आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालकांची धडपड सुरू आहे.
पूर्व प्राथमिकसाठी अर्ज सादर करताना शाळांची नावे येत नसल्याची तक्रार आहे़ या वर्गांसाठी शाळांनी नोंदणी केलेली नाही़
दोंडाईचात १४३ प्रवेश
दोंडाईचा शहर आणि परिसरातील विविध सात शाळांमध्ये आरटीई अंतर्गत १४३ बालकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
हस्ती गुरुकुलला पाच, हस्ती पब्लिक स्कूलला ५२, हस्ती वर्डला १०, स्वामी विवेकानंद स्कूलला ८, वसुधा पब्लिक स्कूलला ३०, रोटरी इंग्लिश स्कूलला ३०, प्रताप रॉयल स्कूलला ८ अशा विविध सात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे़ ११ आणि १२ मार्चला आॅनलाईन सोडत काढली जाईल़ १६ मार्च ते तीन एप्रिल दरम्यान कागदपत्रांची पडताळणी होईल़ त्यानंतर यादी प्रसिध्द होईल़ यावर्षी एकदाच लॉटरी काढली जाणार असल्याने शाळांनी ग्रामीण भागात या प्रवेश पक्रियेबद्दल जनजागृती करावी, असे आवाहन शिंदखेड्याचे विस्तार अधिकारी डी़ एस़ सोनवणे यांनी लोकमतला दिली़

Web Title: RTE Online Accessibility barriers to technical difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे