वाळू चोरांविरुध्द ‘महसलू’चे धाडसत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 10:04 PM2020-12-03T22:04:59+5:302020-12-03T22:05:18+5:30

धुळे : पांझरा नदीच्या पात्रातील वाळू चोरुन अवैध वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांच्या विरोधात महसूल विभागाने धुळे तालुक्यात धाडसत्र सुरू ...

‘Revenue’ raids against sand thieves | वाळू चोरांविरुध्द ‘महसलू’चे धाडसत्र 

dhule

Next

धुळे : पांझरा नदीच्या पात्रातील वाळू चोरुन अवैध वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांच्या विरोधात महसूल विभागाने धुळे तालुक्यात धाडसत्र सुरू केले आहे. धुळे ग्रामीणच्या तहसिलदार गायत्री सैंदाणे, शहराचे तहसिलदार संजय शिंदे, परिविक्षाधिन तहसिलदार तथा निवासी नायब तहसिलदार प्रथमेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू आहे.धुळे ग्रामीण तहसिल कार्यालयाच्या पथकाने गेल्या चार दिवसात पाच ट्रॅक्टर आणि एक डंपर जप्त केला आहे. त्यांच्याकडून सुमारे पावणेआठ लाख रुपयांचा दंड वसुल केला जाणार आहे. 
मंडळ अधिकारी पारधी, नेमाणे, सोनवणे, तलाठी पिंजारी, गजभिये, महिला तलाठी काळे यांच्या पथकाने वरखेडी कुंडाणे ता. धुळे शिवारात दोन ट्रॅक्टर पकडले. तसेच मंडळ अधिकारी सी. व्ही. पाटील, व्ही. बी. पाटील, तलाठी बांगर, बाविस्कर, आशा कुंभार यांच्या पथकाने आनंदखेडे ता. धुळे शिवारात वाळूचा एक डंपर पकडला आहे. त्यानंतर मंडळ अधिकारी देवरे, कुमावत, कांबळे, तलाठी भैरट, महेंद्र पाटील, अहिरराव यांच्या पथकाने नेर आैटपोस्ट येथे वाळूचे तीन ट्रॅक्टर पकडले. पाच ट्रॅक्टरला प्रत्येक सव्वा लाख याप्रमाणे ६ लाख २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे तर डंपरला दीड लाखांचा दंड केला आहे, अशी माहिती परिविक्षाधिन तहसिलदार प्रथमेश घोलप यांनी दिली.
धुळे शहर तहसिल कार्यालयाच्या पथकाने आठवडाभरात तीन ट्रॅक्टर पकडले असून त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच तहसिलदार संजय शिंदे, लिपिक चंद्रकांत इथापे, मोराणे कोतवाल शिवलाल यांच्या पथकाने गुरूवारी साक्री रोडवर एका खाजगी हाॅटेलजवळ वाळुचे आणखी एक ट्रॅक्टर पकडले. त्याला १ लाख ८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
धुळे शहराचे तहसिलदार संजय शिंदे यांनी सांगितले की, गाैण खनिजाची चोरी आणि अवैध वाहतूक रोखण्यासाठी पथके तयार करण्याच्या सूचना वरीष्ठांनी दिल्या होत्या. त्यानुसार धुळे शहर आणि तालुक्याच्या हद्दीत कार्यवाही करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून वाळू चोरांच्या विरोधात मोहिम उघडली आहे. वाहने पकडली जात आहेत. परंतु नदीपात्रामध्ये वाळू उपसा करणारे मजुर पथकाला पाहून पळ काढत असल्याने कारवाई करताना मर्यादा येत आहेत. 
पंरतु महसूल प्रशासन वाळू चाेरांच्या विरोधात आता कठाेर भूमिका घेणार आहे, असे तहसिलदार संजय शिंदे आणि गायत्री सैंदाणे यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: ‘Revenue’ raids against sand thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे