आता लक्ष साक्री नगरपंचायत निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:08 IST2021-02-21T05:08:00+5:302021-02-21T05:08:00+5:30
साक्री नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी वाॅर्डनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आता सर्वांचेच ...

आता लक्ष साक्री नगरपंचायत निवडणूक
साक्री नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी वाॅर्डनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आता सर्वांचेच लक्ष साक्री नगरपंचायत निवडणुकीकडे लागले आहे. साक्री नगरपंचायत निवडणूक ही धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. कारण या निवडणुकीआधी दोन्ही जिल्ह्यात बरीच राजकीय उलथापालथ झाली आहे.
शिवसेना - नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी शिवसेनेत गेले आहेत. आणि साक्री नगरपंचायतीच्या ऐन तोंडावर रघुवंशी यांनी आपले कट्टर समर्थक साक्री नगरपंचायतीचे सत्ताधारी ज्ञानेश्वर नागरे यांचा शिवसेनेत प्रवेश करवून घेतला. त्यामुळे आता नागरे हे शिवसेनेकडून ही निवडणूक लढविणार हे निश्चित आहे. ही निवडणूक जिंकणे हे आता नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना राजकीय दृष्ट्या खूप गरजेचे आहे. कारण शिवसेनेतर्फे धुळे जिल्ह्यातील सेनेत संघटन मजबूत करण्याची जबाबदारी पक्ष श्रेष्ठीने रघुवंशी यांना दिली आहे, त्यावर काम करण्यास रघुवंशीने काम करण्यास सुरुवात केली असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही घेतल्याचे समजते. या एक प्रमुख कारणासोबतच यानंतर
येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टीने देखील ही निवडणूक रघुवंशी यांच्यासाठी महत्त्वाची आहे. याशिवाय साक्री नगरपंचायत ही नंदुरबार लोकसभा मतदारसंघात येते. त्यामुळे या निवडणुकीतील कामगिरी नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. त्यामुळेही रघुवंशी याकडे विशेष लक्ष पुरवतील, यात कोणाचेही दुमत नाही. याशिवाय साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत हा शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे त्याची मदतही महत्त्वाची ठरणार आहे.
भाजप- भाजपच्या दृष्टीने साक्री नगरपंचायत निवडणूक महत्त्वाची आहे. कारण जिल्ह्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते आमदार अमरिशभाई पटेल, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, साक्री तालुक्यातील काँग्रेसचे माजी जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते हे भाजपत आल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि ग्रामपंचायतनंतर ही मोठी निवडणूक आहे. वरील नेत्यांचा साक्रीत चांगला प्रभाव आहे. यांच्यासोबत भाजपचे खासदार डाॅ.सुभाष भामरे, त्यांचे बंधू सुरेश पाटील यांचे हे ‘होम ग्राऊंड’ आहे. याशिवाय नंदुरबार लोकसभा मतदारसंघात साक्री नगरपंचायत येते. त्यामुळे नंदुरबारच्या खासदार डाॅ.हीना गावीत आणि शिंदखेडा विधानसभेेचे आमदार जयकुमार रावल यांच्या दृष्टीनेसुद्धा ही निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. कागदावर बघितले तर भाजपकडे साक्री नगरपंचायत निवडणुकीत प्रभाव टाकू शकतील, अशा मातब्बर नेतेमंडळीची यादी खूपच लांबलचक आहे. त्यामुळे या सर्वांना आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी साक्री नगरपंचायत निवडणूक महत्त्वाची आहे.
काँग्रेस - साक्री तालुक्यातील मातब्बर नेतेमंडळी भाजपमध्ये गेल्या नंतर काँग्रेसची अवस्था दयनीय होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. पण जिल्ह्यात धुळे तालुका वगळता साक्री तालुका सुस्थिती आहे. तालुक्यातून चार जि.प.सदस्य आणि पंचायत समिती १० सदस्य निवडून आणत सभापतीपदही मिळविण्यात काँग्रेसला यश आले. हे यश काँग्रेसचे माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार डी.एस. अहिरे, योगेश भोये यांच्यासह नवीन तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांच्या प्रयत्नांनीच मिळाले. त्यात आता आमदार कुणाल पाटील यांनी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक आहे. त्यामुळे आमदार पाटील यांच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण त्यांना आपला जिल्ह्यातील वर्चस्व सिद्ध करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची निवडणूक आहे. त्यामुळे ते निश्चितच याकडे सिरिअसली लक्ष देतील, हे स्पष्ट आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने यश संपादन केले असले तरी त्यात आदिवासी बहुल परिसर जास्त होता. त्याप्रमाणात शाहू भागात काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेले नाही, हे ही खरे आहे. पण साक्री नगरपंचायत निवडणुकीत गेल्यावेळेस काँग्रेसचे ११ सदस्य होते. पण त्यावेळेस ज्ञानेश्वर नागरे त्यांच्यासोबत होते. आता ते शिवसेनेत गेल्याने काँग्रेसला पुन्हा तो करिश्मा करता येईल का, हा ही एक प्रश्न आहे. काँग्रेसला या निवडणुकीद्वारे शहरी भागातील आपले वर्चस्व सिद्ध करण्याची ही संधी आहे.
महाविकास आघाडी - भाजपशी सरळ लढत देण्यासाठी साक्रीत महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या दृष्टीने शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल पाटील हे एकत्र येण्याचा निर्णय घेऊ शकतात. राष्ट्रवादीची तालुक्यात फार चांगली परिस्थिती नाही, म्हणून तेही यात सामील होऊ शकतात. पण यात जागा वाटपाचा आणि अन्य अनेक प्रश्न उद्भवतात. त्यामुळे या आघाडीवर आताच बोलणे कठीण आहे. या सर्व कारणामुळे साक्री नगरपंचायत निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणार आहे.